सांंगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी गेल्या सात-आठ महिन्यापासून जोरदार तयारी केली असतानाच भाजपचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मैदानात उतरण्याची तयारी असल्याचे सांगितल्याने राजकीय उमेदवारीच्या गोंधळात महागोंधळ दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपामध्ये खानापूर मतदार संघ कोणाला मिळणार हे अनिश्‍चित असताना देशमुखांची घोषणा म्हणजे अडवाअडवीचे राजकारण तरी नाही ना ,अशी शंकास्पद स्थिती निर्माण झाली आहे.

आटपाडीचे मातब्बर घराणे म्हणून देशमुखांच्या गढीला राजकीय क्षेत्रातही मानाचे स्थान मानले जाते. खानापूर तालुक्यातील उमेदवाराला निवडणुकीत उतरण्यापुर्वी देशमुखांच्या वाड्यावर जाउन आशीर्वाद घ्यावे लागतात. आटपाडीची ताकद सोबतीला असेल तरच या मतदार संघात विजय संपादन करता येउ शकतो अशी आजवरची समजूत आहे. मात्र, याच देशमुख घराण्यातील राजेंद्रअण्णाा देशमुख यांनी १९९५ मध्ये अपक्ष मैदानात उतरून काँग्रेसचे उमेदवार स्व. अनिल बाबर यांचा २० हजार २९० मतांनी पराभव केला होता. यानंतर मात्र या घराण्यातून राजकीय वारसा खानापूर तालुक्यात फारसा रूजला नसला तरी याच घराण्यातील अमरसिंह बापू देशमुख यांना राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले होते. तर भाजपच्या उमेदवारीवर हर्षवर्धन देशमुख यांना पंचायत समितीचे सभापती पद मिळाले.

हेही वाचा >>>हरियाणामध्ये ‘आप’ला बळ; केजरीवाल यांच्या सुटकेमुळे नेते, कार्यकर्त्यांची भावना

एकवेळ अपक्ष म्हणून निवडून आलेल्या देशमुखांनी यानंतर कधीही विधानसभा निवडणूक लढवली नाही. मात्र, २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विट्याच्या सदाशिवराव पाटील यांना साथ देत बाबर यांना पराभूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. खानापूर-आटपाडी मतदार संघात सातत्याने बाबर पाटील असाच राजकीय संघर्ष आतापर्यंत पाहण्यास १९९५ चा अपवाद वगळता राहिला आहे. यामुळे मतदार संघालाही बाबर-पाटील अशीच लढत पाहण्याची सवय झाली आहे.

गेल्या तीन दशकाच्या काळात माणगंगेच्या पात्रातून बरेच पाणी वाहून गेले आहे. आटपाडीच्या राजकारणात गोपीचंद पडळकर, तानाजी पाटील आदी राजकीय कार्यकर्ते उदयाला आले आहेत. टेंभूसारखी महत्वकांक्षी सिंचन योजना कार्यान्वित होण्यास बाबर यांचा आग्रह आणि चिकाटी महत्वाची ठरली. आज माणदेशात या पाण्याने समृध्दीचा मार्ग खुला केला आहे. बदलत्या परिस्थितीत माणगंगा साखर कारखाना निवडणुकीत देशमुख गटाला माघार घ्यावी लागल्याने कारखाना तानाजी पाटील यांच्या हाती गेला. आटपाडी बाजार समितीमध्येही सत्ता राखता आली नाही, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही देशमुखांचा पराभव करून पाटील यांनी संचालकपद मिळवले. या सर्व घडामोडी पाहता देशमुख गटाला मतदार संघात राजकीय ताकद कोणाची मिळणार हा प्रश्‍नच आहे.

हेही वाचा >>>कारण राजकारण : भाजपकडून खडकवासला मतदारसंघ अजित पवारांना?

दुसर्‍या बाजूला स्व. अनिल बाबर यांच्या अकाली निधनानंतर बाबर गट एकसंघ ठेवत सुहास बाबर यांनी निवडणुकीची तयारी सुरूच ठेवली असून विरोधक म्हणून विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेच असतील असे गृहित धरून त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाबर यांच्या गटाला ताकद देण्याचे काम विकास निधी देउन केले आहे. तर माजी नगराध्यक्ष पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष असून महायुतीतून उमेदवारी मिळाली नाही तरी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. दोन गट ताकदीने निवडण्ाुकीच्या रणांगणात उतरले असताना आटपाडीतील देशमुख वाड्यावरील धावपळ ही कोणाच्या तरी सांगण्यावरून आहे का असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. कारण कडेगावमध्ये राहूल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकतीर्थ स्मृती स्थळ लोकार्पण सोहळ्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची घेतलेली भेट कळीचा मुद्दा ठरणार आहे. यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि देशमुख यांनी एकाच वेळी खा. पवार यांची भेट घेतली होती. ही भेट घडवून आणण्यात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा पुढाकार होता. यामुळे विट्यातील राजकीय डावपेचात निवडून आणण्यापेक्षा पाडापाडीचे राजकारण होते की काय अशी रास्त शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मुळात देशमुख हे भाजपमध्ये आहेत. आता त्यांनी भाजप त्यागाचा विचार केला आहे का हे अजून स्पष्ट नाही. खानापूरच्या जागेवर शिंदे शिवसेनेचा दावा राहणार हे स्पष्ट आहे. तर दुसर्‍या बाजूला महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभव पाटील हेही दावा सांगत आहेत. जागा वाटपात ही जागा कोणाला मिळणार हे अस्पष्ट असले तरी भाजप याठिकाणी दावा सांगण्यास फारसा इच्छुक दिसत नसला तरी गोपीचंद पडळकर यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा सर्व गोंधळाच्या स्थितीत महायुतीमध्येच महागोंधळाची स्थिती निर्माण झाली असल्याने समजूत कोणाची आणि कोण काढणार हाही प्रश्‍नच आहे. विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा डाव तरी आघाडीतील नेत्यांचा नाही ना असा संशय बळावतो आहे.