संतोष मासोळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच स्थानिक पातळीवर मित्रपक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी आपले संपर्क दौरे वाढविल्याने ठिकठिकाणी भाजपची डोकेदुखी वाढली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघही यास अपवाद ठरलेला नाही. नाशिकचे पालकमंत्री शिंदे गटाचे दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या नावाचे “भावी खासदार” या मुख्य शीर्षकाखाली शंभरहून अधिक फलक धुळ्यातील चौकांमध्ये झळकले आहेत. विशेष म्हणजे वाढदिवस मागील महिन्यातच झाल्यावरदेखील हे फलक अजूनही कायम असल्याने स्थानिक भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांतर्गत राजकीय रणनीतीला चालना दिली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या-त्या भागातील नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करून स्थानिक लोकांशी संपर्क वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपने दिलेल्या सहकार्यामुळे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्यासाठीही आगामी सगळ्याच निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ म्हणून राज्यात आपला किती आणि कुठे अधिक प्रभाव आहे, हे प्रत्यक्ष निकालांतूनच अधोरेखित करावे लागणार आहे. शिंदे गट आणि भाजप राज्यात सत्तेत असले तरी आगामी निवडणुकांसाठी अशीच मैत्री राहील की नाही याबद्दल दस्तुरखुद्द शिंदे गट आणि भाजपही आश्वस्त नाही.

हेही वाचा: श्रीशैल्य उटगे : ग्रामीण जनतेचा आवाज

आविष्कार भुसे यांनी धुळे लोकसभा मतदार संघातील जवळपास सर्वच विधानसभा मतदार संघांमध्ये गेल्या वर्षभरात युवकांचे मोठे संघटन करण्यावर भर दिला आहे. अनेक खासगी आणि सार्वजनिक अशा अनेक कार्यक्रमांना आविष्कार यांची प्रत्यक्ष उपस्थिती असते. यामुळे त्यांच्याबद्दल प्रामुख्याने युवकांमध्ये आकर्षण वाढले आहे. आगामी निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदार संघात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतर्फे विविध प्रकारे राजकीय अंदाज घेणे सुरू झाले आहे. प्रस्थापितांसमोर मतांची बेरीज-वजाबाकी नेमकी कशी ठेवावी लागेल, याचे गणित आतापासूनच मांडले जात आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुक रिंगणात भुसे पुत्र आविष्कार हे उमेदवार म्हणून असतील, अशी वातावरण निर्मिती भुसे समर्थकांकडून करण्यात येत असली तरी मंत्री भुसे यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. आविष्कार यांच्या समर्थकांनी फलक लावले असतील,तसे असेल तर ते फलक काढून घ्यावेत, असे आपण सांगितले असल्याचे मंत्री भुसे यांनी नमूद केले असले तरी अजूनही फलक जागेवरच असणे, याला वेगळा अर्थ प्राप्त होत आहे. अविष्कार भुसे यांचे आणि संसदभवनाचे छायाचित्र या फलकांवर लावण्यात आल्याने शिंदे गटाने विरोधकांना सूचक इशारा दिल्याचे म्हटले जात आहे. यामुळे धुळे मतदार संघातून दोन वेळा खासदार राहिलेले डाॅ. सुभाष भामरे यांच्या गोटात धाकधुक वाढली आहे.

हेही वाचा: “काँग्रेसप्रमाणे आमचे नेते सहकाऱ्यांना ‘गद्दार’ म्हणत नाहीत”; राजस्थान भाजपाचा काँग्रेसला खोचक टोला

धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण अशा सहा मतदारसंघाचा समावेश होतो. त्यापैकी मालेगांव बाह्यमध्ये मंत्री दादा भुसे यांची मोठी ताकद आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून भुसे हे चार वेळा निवडून आले आहेत. मालेगाव शहर मतदारसंघातही भुसे यांच्या समर्थकांची चांगली फळी आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भुसे यांनी याआधी काम केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात त्यांचा मोठा संपर्क राहिला आहे. जिल्ह्यातील तरुण वर्गात मराठा कुणबी समाजाचे लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्ववादी नेते अशी भुसे यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. याचा राजकीय फायदा उचलण्याचे प्रयत्न आविष्कार भुसे यांच्या माध्यमातून होत असल्याचे संकेत आहेत. अविष्कार यांचा विवाह शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या कन्येशी झाला आहे. त्यामुळे त्याचाही राजकीय लाभ अविष्कार यांना मिळू शकतो, असे गणित आहे.

असे असले तरी भाजप-सेना युतीत धुळे लोकसभा मतदारसंघ कायम भाजपच्या वाट्याला आलेला आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे हे भाजपकडून विजयी झाले.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युती झालीच, तर शिंदे गटाला या मतदार संघात तडजोडीच्या बोलणीपूर्वी आपली राजकीय ताकद दिसणे गरजेचे वाटते. दोघांत युती झालीच नाही तर, निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आपण कुठेही कमी पडू नये, म्हणून शिंदे गट आतापासून कामाला लागल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर धुळ्यात अविष्कार यांचे नाव चर्चेत आणले जात असल्याचा कयास लावला जात आहे.

हेही वाचा: काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आलेल्या जयवीर शेरगील यांना मिळाली राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी!

धुळे लोकसभा मतदार संघ आमच्या वाटेचा आहे. आमचा उमेदवार निवडून येतो. लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भाजपा यांच्यात युती झाली तर वाटाघाटीत येणाऱ्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे संयोजक बबन चौधरी यांनी म्हटले आहे. प्रत्येक राजकीय नेता आपल्या घरातील सदस्यांना राजकारणात पुढे आणण्यासाठी धडपडत असतो. घराणेशाहीचे कितीही आरोप झाले तरी, हे प्रकार सर्वच पक्षांमध्ये सुरू आहेत. त्यात दादा भुसे अपवाद कसे राहतील ?

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp prepares lok sabha maharashtra bjp is under tension due to birthday boards of dada bhuse son avishkar bhuse dhule print politics news tmb 01
First published on: 04-12-2022 at 11:10 IST