आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्याने शिवसेना शिंदे गटात मोठी खळबळ उडाली… बुलढाण्यातील ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला… माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदारकीची ऑफर देणाऱ्या शिंदेंच्या शिलेदाराचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला… पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान वैज्ञानिक असून त्यांनी नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, अशा खोचक टोला खासदार संजय राऊतांनी लगावला… महायुती सरकारने आतापर्यंत तब्बल एक कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

भाजपाच्या खेळीने शिंदे गटात खळबळ

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हाताशी धरून जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी अलिबागमध्ये आनंदोत्सवाची तयारी सुरू केल्याने शिंदे गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. जिल्हा परिषदेत १५ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या भाजपाला अध्यक्षपद, तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसे झाल्यास सर्वाधिक सदस्य निवडून आणणाऱ्या शिंदे गटाला मात्र विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. भाजपाला अध्यक्षपद देण्यामागे रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळण्याचे संकेत आहेत.

ठाकरेंच्या शिलेदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपताच शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा गळती लागल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पदांचा राजीनामा देऊन इतर पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या पक्षप्रवेशाची माहिती देण्यात आली आहे. संदीप शेळके ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उधाण आले होते. अखेर त्यांनी जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले आहे.

आणखी वाचा : प्रकाश आंबेडकर आक्रमक का झाले? आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा कशासाठी?

सुषमा अंधारे यांची नरेश म्हस्केंवर टीका

उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर जायचे असल्यास त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करावा, असा खोचक टोला शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला होता. संजय राऊत यांच्यामुळेच ठाकरेंवर ही वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ज्या माणसाने हसत हसत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यांना तुम्ही एका विधान परिषदेचे अमिष कसले दाखवताय. खरेतर नरेश म्हस्के यांना किती गांभीर्याने घ्यायचे हा प्रश्नच आहे. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्री केले. त्यांचे पुत्र श्रीकांत ठाकरे यांनादेखील खासदारकी ठाकरेंनीच दिली. उद्धवसाहेबांनी जर एकनाथ शिंदेंना ताकद दिली नसती तर नरेश म्हस्के यांना खासदारकीची उमेदवारी तरी मिळाली असती का, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

संजय राऊतांना पंतप्रधान मोदींनी टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान वैज्ञानिक असून त्यांनी नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. काही वर्षांपूर्वी नाल्यातून गॅस निर्मिती करण्याचा शोध पंतप्रधानांनी लावला होता. नाल्यात पाईप टाकून त्यातून निघणाऱ्या गॅसवर घरातील चुली पेटवता येतात, असे त्यांनी सांगितले होते. आता देशावर इंधनाचे संकट असताना मोदींच्या या संशोधनाचा फायदा देशाला व्हायला हवा, असे संजय राऊत म्हणाले. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर भारतात घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. केंद्र सरकारचे भारताला शंभर वर्षे मागे नेण्याचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे.मोदी आणि त्यांचे भक्त इंधनाच्या टंचाईवर एक शब्दही बोलायला तयार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा : मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर पुढे काय? नितीश कुमार कोणत्या वाटेवर? बिहारमध्ये काय घडणार?

रोहिणी खडसे यांचा महायुतीवर हल्लाबोल

राज्यातील महायुती सरकारने आतापर्यंत तब्बल एक कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले, असा आरोप शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला. शासनाची ही वागणूक म्हणजे ‘अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता’ अशी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली. रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करीत महायुतीला लक्ष्य केले. सरकारने आतापर्यंत तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे? २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही योजना सुरू केली होती, तेव्हा परिस्थिती काय होती? असा प्रश्न त्यांनी विचारला. लाडकी बहीण योजनेत सुरुवातीचे लाभार्थी २.५३ कोटी होते. सुरुवातीचे बजेट सुमारे ४५,००० कोटी रुपये होते. तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थी आता १,४८,६०,००० इतके शिल्लक राहिले आहेत. २०२६-२७ बजेटमध्ये यासाठी २६,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचाच अर्थ संभाव्य अपात्र महिला सुमारे १.०५ कोटी आहेत, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.