२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपाला अपेक्षित असा लागलेला नाही. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींसहित सगळेच नेते ‘चारसौपार’ची घोषणा देत होते. मात्र, प्रत्यक्षात भाजपाला २४० जागांच्यावर मजल मारता आलेली नाही. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला असलेले स्पष्ट बहुमत हातातून गेले असून आता एनडीएतील घटकपक्षांच्या आधारावर भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत आला आहे. गेल्या रविवारी (९ जून) या नव्या मोदी सरकारचा शपथविधी पार पडला. त्यामध्ये भाजपाचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुन्हा एकदा आरोग्य खात्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. त्यामुळे आता भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार, याबाबतच्या चर्चा होताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी (११ जून) जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा पदभार ताब्यात घेतला. या महिन्यातच विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे एका नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची नियुक्ती लवकरच पक्षाकडून केली जाणार आहे. जे. पी. नड्डा यांना २०१९ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा पदभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी २०२० पासून ते पूर्णवेळ पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. जानेवारी २०२३ मध्येच त्यांच्या कार्यकाळाची मुदत संपणार होती. मात्र, भाजपाच्या कार्यकारी मंडळाने ही मुदत जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय एकमताने घेतला होता.

हेही वाचा : ‘मिले ना मिले हम’ म्हणत लोकसभेत पुन्हा भेटले; खासदार कंगना-चिरागची जोडी आता लोकसभेत

भाजपाला मिळणार नवा पक्षाध्यक्ष

सत्ताधारी भाजपा पक्षाध्यक्ष पदासाठी सध्या नव्या व्यक्तीच्या शोधात आहे. त्यासाठीच्या बैठका आता सुरू झाल्या आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, ‘जी सेव्हन समिट’साठी इटलीला रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर या नव्या पक्षाध्यक्षाची निवड करण्यात येईल. एकीकडे भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दिलेल्या कानपिचक्या ताज्या असतानाच त्याचा पक्षाध्यक्ष निवडीवर काही परिणाम होतो का, हे पाहणे निर्णायक ठरेल. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाचे झालेले नुकसान तसेच मणिपूर हिंसाचाराकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष याकडे मोहन भागवत यांनी लक्ष वेधले आहे. सरसंघचालकांनी सार्वजनिक व्यासपीठावरून भाजपाला खडेबोल सुनावण्याची ही तशी पहिलीच वेळ मानली जात आहे. त्यामुळे, संघामध्ये आणि भाजपामध्ये सगळं काही आलबेल आहे, असे चित्र दिसत नाही. या सगळ्याचा विचार करता, संघाला अनुकूल असा वा सुसंवादी असा पक्षाध्यक्ष निवडला जाईल का, अशी चर्चा होताना दिसत आहे. भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षाची निवड पक्षाच्या संसदीय मंडळाकडून केली जाईल. या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षाने वर्षाच्या अखेरीपर्यंत पक्षातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काम करणे अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे जे. पी. नड्डा पूर्णवेळ पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहत होते, अगदी त्याचप्रमाणे नवनियुक्त पक्षाध्यक्षदेखील पुढील जानेवारीपर्यंत पूर्णवेळ काम करणाराच असेल, अशी शक्यता आहे. भाजपा आपल्या पक्षाध्यक्ष पदासाठी एखाद्या महिलेची अथवा दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती निवडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. त्यातील धर्मेंद्र प्रधान आणि शिवराज सिंह चौहान यांसारख्या नेत्यांना याआधीच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असल्याने या चर्चेमधून त्यांची नावे बाहेर पडली आहेत.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, विनोद तावडे, के. लक्ष्मण, सुनील बन्सल आणि ओम माथूर यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री होते आणि सध्या ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पक्षाध्यक्ष पदासाठी तावडे यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. के. लक्ष्मण हे भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे प्रमुख आहेत. त्यामुळे ओबीसी मतदारांवर अधिक प्रभाव टाकण्यासाठी या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. सुनील बन्सल हे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचे प्रभारी आहेत, त्यांचेही नाव चर्चेत आहे. ओम माथूर हे राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचेही नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, त्यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. आजवर भाजपाच्या पक्षाध्यक्षपदी कधीही महिलेची निवड झालेली नाही, त्यामुळे पहिल्यांदाच एखाद्या महिलेची निवड करून धक्कातंत्राचा वापर भाजपाकडून केला जाऊ शकतो. या प्रकारचे धक्के भाजपाने याआधीही दिले आहेत.

हेही वाचा : मोहन भागवतांच्या कानपिचक्या संघ आणि भाजपामधील अंतर वाढल्याच्या निदर्शक आहेत का?

भाजपाचे आजवरचे राष्ट्रीय अध्यक्ष

१. अटलबिहारी वाजपेयी – १९८०-८६
२. लालकृष्ण आडवाणी – १९८६-९१
३. मुरली मनोहर जोशी – १९९१-९३
४. कुशाभाऊ ठाकरे – १९९८-२०००
५. बंगारु लक्ष्मण – २०००-०१
६. जन कृष्णमूर्ती – २००१-०२
७. व्यंकय्या नायडू – २००२-०४
८. लालकृष्ण आडवाणी – २००४-०५
९. राजनाथ सिंह – २००५-०९
१०. नितीन गडकरी – २००९-१३
११. अमित शाह – २०१४-२०
१२. जगत प्रकाश नड्डा – २०२० – विद्यमान

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president bjp looking for a woman or dalit leader jp nadda vsh