भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना दिसून येते. राजकीय वर्तुळात यासंदर्भात अनेक दावेही केले जात आहेत. मात्र आता यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मोठं भाष्य केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये जे. पी. नड्डा यांनी सध्याच्या परिस्थितीत उद्भवलेल्या राजकीय स्थितीबाबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांना भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये नेमके कसे संबंध आहेत, याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे, असं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे. पी. नड्डा यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचाही तर्क लावला जात आहे. उद्धव ठाकरेंना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी “आता मला आरएसएससाठी भीती वाटायला लागली आहे. भाजपा आता संघावरही बंदी आणेल”, असं विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या इतर शीर्ष नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले जे. पी. नड्डा मुलाखतीमध्ये?

अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राजकारणातील अस्तित्व कसं बदलत गेलं आहे? असा प्रश्न नड्डा यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आता स्वयंपूर्ण झाला असून आपला कारभार स्वतंत्रपणे करतो, असं भाष्य केलं.

“काशी-मथुरेतील वादग्रस्त जागी मंदिर बांधण्याचं कोणतंही नियोजन नाही”, जे. पी. नड्डांनी स्पष्ट केली भाजपाची भूमिका!

“सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते. हा या दोन्ही कालखंडातला फरक आहे”, असं जे.पी. नड्डा म्हणाले.

भाजपाला आता संघाच्या पाठिंब्याची गरज नाही?

दरम्यान, यावेळी नड्डा यांना आरएसएसच्या पाठिंब्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. भाजपाला आता संघाच्या पाठिंब्याची गरज पडत नाही का? असं विचारलं असता नड्डा म्हणाले, “पक्षाची आता वाढ झाली आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्य आणि भूमिका आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. इथे गरजेचा प्रश्न नाही. आरएसएस ही एक वैचारिक शाखा आहे. ते वैचारिक दृष्टीने आपलं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं कामकाज पाहतो. हेच तर राजकीय पक्षांनी करायला हवं”.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president j p nadda on rss says party is more capable now pmw
First published on: 18-05-2024 at 12:55 IST