BJP Rajyasabha Candidates राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच सात जागा रिक्त होणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. भाजपाने मंगळवारी सहा राज्यांतील नऊ उमेदवारांची घोषणा केली, तर बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावे जाहीर केली. सात राज्यांमधून भाजपाने कोणकोणत्या नेत्यांना संधी दिली आहे? जाणून घेऊयात…
महाराष्ट्र
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली असून रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सरुवातीला विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर आणि भागवत कराड यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, या नावांमधून रामदास आठवले आणि विनोद तावडे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाला आहे आणि त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी दिली आहे.
महाराष्ट्रात रिक्त होणाऱ्या सात जागांपैकी सहा जागांवर महायुतीचा (एनडीए) विजय निश्चित मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते शरद पवार यांच्या रिक्त होणाऱ्या जागेबाबतच्या घडामोडींवर महायुतीचे बारीक लक्ष आहे. राज्यसभेच्या बहुतांश जागांचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे, आता राज्यपालांच्या नियुक्त्या, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनात्मक फेरबदल हे पुढील टप्पे असतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.
बिहार
बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागा रिक्त आहेत, जिथे विजयासाठी ४१ हा आकडा आवश्यक आहे. जेडीयू आणि भाजपा प्रत्येकी दोन जागा जिंकण्याच्या स्थितीत आहेत. पाचव्या जागेसाठी महायुतीकडे ३८ मते असून त्यांना आणखी तीन मतांची गरज आहे.
- नितीन नबीन : भाजपाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नबीन हे बिहारच्या बांकीपूरमधून पाच वेळा आमदार राहिले आहेत आणि ते नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. सूत्रांच्या मते, नबीन यांना राज्यसभेत पाठवल्यामुळे त्यांना संसदीय कामकाजाचा थेट अनुभव मिळेल आणि भविष्यात सरकारमध्ये ते मोठी जबाबदारी सांभाळू शकतील.
- शिवेश राम : सासारामचे माजी भाजपा खासदार मुनीलाल राम यांचे पुत्र असलेले शिवेश राम हे राज्यातील पक्षाचा प्रमुख दलित चेहरा आहेत. सध्या ते बिहार भाजपामध्ये सरचिटणीस आहेत. यापूर्वी त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
आसाम
विधानसभा निवडणुका जवळ येत असताना भाजपाने आसाममधील प्रभावशाली समुदायातील दोन विद्यमान आमदारांना राज्यसभेसाठी निवडले आहे. आसाममधील राज्यसभेच्या तीन जागा रिक्त होत आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या ‘यूपीपीएल’ या बोडो पट्ट्यातील प्रादेशिक पक्षाने तिसऱ्या जागेसाठी रस दाखवला आहे.
- जोगेन मोहन : ताई अहोम समुदायाचे नेते असलेले मोहन सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांच्याकडे डोंगराळ क्षेत्र विकास, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी संस्कृती यांसारखी महत्त्वाची खाती आहेत. ते सध्या महमोरा विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत.
- तेराश गोवाला : तेराश गोवाला हे दुलियाजानचे आमदार असून आदिवासी चहा उत्पादक समुदायातून येतात.
पश्चिम बंगाल
- राहुल सिन्हा : आरएसएस प्रचारक ते राजकारणी असा प्रवास असलेले सिन्हा हे पश्चिम बंगाल भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. एका निर्वासित कुटुंबातून आलेले सिन्हा दक्षिण कोलकाता येथील विजयगड या निर्वासित वसाहतीत लहानाचे मोठे झाले. त्यांनी यापूर्वी अनेक विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत, मात्र त्यांना यश मिळाले नाही.
ओडिशा
ओडिशातील चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपाचे संख्याबळ पाहता पक्ष दोन जागा सहज जिंकू शकतात, तर बीजेडी एका जागेवर विजय मिळवू शकते. चौथी जागा कोणाकडे जाणार याकडे लक्ष आहे.
- मनमोहन सामल : मनमोहन सामल हे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पहिल्यांदाच विजय मिळवून दिल्याबद्दल ही उमेदवारी त्यांचे बक्षीस मानली जात आहे. ते माजी राज्यसभा खासदार आणि माजी मंत्री आहेत. २००४ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी २००० मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
- सुजित कुमार : सुजित कुमार यांना दुसऱ्या टर्मसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. ते २०२० मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. त्यांनी २०२४ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती, मात्र काही महिन्यांनंतर पुन्हा राज्यसभेवर निवडून येण्यासाठी ते पक्षात परतले. कुमार हे माजी बीजेडी नेते असून ते त्यांच्या निवडणूक व्यवस्थापन धोरणांसाठी ओळखले जातात.
हरियाणा
हरियाणात दोन जागा रिक्त होणार आहेत आणि भाजपा या दोन्ही जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे.
- संजय भाटिया : केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाटिया यांनी यापूर्वी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केले आहे. कर्नालचे माजी खासदार असलेल्या भाटिया यांनी हरियाणा खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांना राज्यातील पक्ष विस्तार आणि संघटन मजबूत करण्याचे श्रेय दिले जाते. मुख्य म्हणजे जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या अंतर्गत प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
छत्तीसगड
- लक्ष्मी वर्मा : लक्ष्मी वर्मा या सध्या छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. १९९४ मध्ये रायपूर महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून येत त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी रायपूर जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०२१ मध्ये त्यांची छत्तीसगड भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. सध्या त्या अखिल भारतीय पंचायत परिषदेच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत.
