मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या चार उमेदवारांपैकी रामराव वडकुते हे अन्य पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले असल्याने अन्य पक्षातून आलेल्यांना महत्त्वाची पदे देण्याची परंपरा भाजपने यंदाही कायम ठेवली.
राज्यसभेची उमेदवारी जाहीर करताना भाजपने मराठा, दलित, आदिवासी आणि धनगर असे जातींचे समीकरण साधले आहे. रामदास आठवले यांना राज्यसभेची आणखी एक संधी देऊन दलित समाजात पक्षाचे बळ वाढेल याची खबरदारी घेतली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या रुपाने मराठा समाज व कोकणाला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. नागपूरच्या माजी महापौर माया ईवनाते या आदिवासी समाजातील आहेत. रामराव वडकुते हे धनगर समाजातील असून, या समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे.
राज्यसभेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांपैकी धैर्यशील पाटील हे शेकापमधून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांना दोन वर्षांचीच खासदारी मिळाली. पक्षाने पाटील यांना पुन्हा संधी दिलेली नाही. त्याऐवजी हिंगोली जिल्ह्यातील रामराव वडकुते यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली. वडकुते यांना मिळणारी खासदारकी हा साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का मानला जातो. भाजपच्या धक्कातंत्राच्या राजकारणात कोणाचे नशीब कधी फळफळेल याचा काही अंदाज नसतो. अशाच प्रकारे वडकुते यांना लाॅटरी लागली आहे.
वडकुते हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. २०१४ मध्ये विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून वडकुते यांना आमदारकी मिळाली होती. पुढे त्यांनी आमदारकीची मुदत संपण्यापूर्वी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या वतीने वडकुते हे विधान परिषदेत सक्रिय असायचे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपची वाट पत्करली होती. त्याचा त्यांना आता फायदा झाला आहे. आमदारकी मिळविण्यााठी वडकुते यांनी प्रयत्न केले होते. पण त्यात त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादीने विधान परिषदेवर संधी दिली तर भाजपकडून त्यांना राज्यसभा मिळणार आहे.
आयारामांना संधी
भाजपमध्ये याआधीही राज्यसभा तसेच विधान परिषदेसाठी अन्य पक्षातून आलेल्यांना संधी मिळाली आहे. विधान परिषदेवर कोळी समाजाचे नेते रमेश पाटील, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निलय नाईक, निरंजन डावखरे, अमरिश पटेल, चित्रा वाघ, राजसंह सिंह आदींना आमदारकीची संधी देण्यात आली. त्याच वेळी पक्षातून जुन्या जाणत्या नेत्यांना डावलण्यात आल्याची जुन्या कायर्कर्त्यांची तक्रार असते. वडकुते यांना राज्यसभेची खासदारकी देऊन भाजपने धनगर समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीनेही याच निकषावर त्यांना आमदारकी दिली होती.
