BJP Rajya Sabha picks Maharahtra भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपाच्या वतीने बुधवारी महाराष्ट्रातून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नगरसेविका माया इवनाते व माजी आमदार रामराव वडकुते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निवडींमध्ये भाजपाने संघटनात्मक निष्ठा आणि कामगिरीसोबतच राज्यातील जातीय समीकरणे संतुलित करण्यावर भर दिल्याचे दिसून येते. या चार नावांच्या निवडीमागे भाजपाची रणनीती काय? जाणून घेऊयात…

महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना उमेदवारी अन् नव्या चेहऱ्यांनाही संधी

भाजपच्या एका सूत्राने सांगितले, “या चार उमेदवारांची निवडीतून एनडीएचा ‘युती धर्म’ आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन अधोरेखित होतो.” राज्यातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. भाजपा आपल्या चारही उमेदवारांची निवड निश्चित करण्याच्या स्थितीत आहे; तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका उमेदवाराला निवडून आणू शकतात.

महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणखी दोन जागांवर दावा करण्याची शक्यता आहे; पण या जागांबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. त्यामुळेच राज्यातील राजकीय हालचालींबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. सातवी जागा विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वाट्याला जाणार आहे. भाजपा सूत्रांनुसार, “चारपैकी तीन निवडी भाजपाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला अधोरेखित करतात. त्यात इवनाते हे अनुसूचित जमाती (एसटी), वडकुते हे अनुसूचित जाती (एससी) आणि तावडे हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

विनोद तावडे

भाजपाच्या सात राष्ट्रीय सरचिटणीसांपैकी एक असलेले विनोद तावडे मराठा समाजातील आहेत आणि त्यांचे मूळ कोकणात आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री राहिलेल्या तावडेंना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. मात्र, नंतर २०२१ मध्ये त्यांचा केंद्रीय भाजपा संघात समावेश करण्यात आला. बिहार विधानसभा निवडणूक आणि चंदिगड महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या त्यांच्याकडे आगामी केरळ निवडणुकीची जबाबदारी आहे.

पक्षाच्या एका नेत्याने सांगितले, “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उदभवलेले राजकीय संकट आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकांच्या काळात राज्यातील पक्षीय व्यवहार हाताळण्यात तावडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यांची पदोन्नती हे त्यांच्या संघटनात्मक कार्याचे फळ आहे.”

रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री आहेत. ते अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करतात. मुंबई येथील आठवले २०१६ पासून केंद्रीय मंत्री आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाराज होऊन, त्यांनी भाजपाशी युती केली होती. २०१४ आणि २०२० मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. आठवलेंना पुन्हा संधी देणे अपेक्षित होते. कारण- ते केवळ मित्रपक्षाचे नेतेच नाहीत, तर दलित समाजाचा मोठा चेहराही आहेत.

माया इवनाते

या यादीतील एकमेव महिला उमेदवार माया चिंतामण इवनाते या नागपूरच्या माजी महापौर आहेत आणि राज्यातील अनुसूचित जमातीचा (एसटी) प्रमुख चेहरा आहेत. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. विदर्भातील माया इवनाते यांनी नागपूर महानगरपालिकेत नगरसेविका आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य म्हणूनही काम केले आहे.

रामराव वडकुते

राज्यातील धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामराव वडकुते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. वडकुते हे मराठवाड्यातील हिंगोलीचे रहिवासी आहेत. वडकुते यांना २०१९ व २०२४ मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. मात्र, आता त्यांची निष्ठा आणि संघटनात्मक कार्य हे यांसाठी त्यांना ही संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

१६ मार्च रोजी १० राज्यांतील ३७ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या वर्षाच्या उर्वरित काळात राज्यसभेत आणखी ३४ जागा रिक्त होणार आहेत. मार्चमधील निवडणुकीनंतर एनडीएच्या जागा १९ ने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४५ सदस्यीय राज्यसभेत एनडीएचे १३३ खासदार होतील. मुख्य म्हणजे त्यात एकट्या भाजपाकडे १०३ खासदार असतील.