Fakhruddin Ali Ahmed Medical College Rename : आसामच्या बरपेटा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी केली. राज्यातील भाजपा सरकारने या वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. बरपेटा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला भारताचे माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांचे नाव देण्यात आले होते. देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणारे ते आसाममधील पहिले व्यक्ती होते. राज्य सरकारकडून त्यांच्या सन्मानार्थ एखाद्या दुसऱ्या संस्थेला त्यांचे नाव देण्यात येईल, असे मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर कोण होते फखरुद्दीन अली अहमद? त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती? त्याविषयीचा हा आढावा…

कोण होते फखरुद्दीन अली अहमद?

भाजपा सरकारने बरपेटा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आसामचे सुपुत्र असलेले फखरुद्दीन अली अहमद भारताचे पाचवे राष्ट्रपदी होते. त्यांनी २४ ऑगस्ट १९७४ ते ११ फेब्रुवारी १९७७ या कालावधीत राष्ट्रपतिपद भूषवले. झाकीर हुसेन यांच्यानंतर ते या पदावर विराजमान होणारे दुसरे मुस्लीम नेते होते. दुर्दैवाने झाकीर हुसेन यांच्याप्रमाणेच अहमद यांचेही राष्ट्रपती पदावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. फखरुद्दीन अली अहमद यांची आठवण प्रामुख्याने १९७५ च्या आणीबाणीशी जोडली जाते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या आणीबाणीच्या निर्णयावर त्यांनी स्वाक्षरी केली होती. त्या संदर्भात ‘दी इंडियन एक्सप्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेले अबू अब्राहम यांचे एक व्यंगचित्र आजही ऐतिहासिक मानले जाते, ज्यामध्ये अहमद हे आणीबाणीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दाखवण्यात आले होते.

भारत छोडो आंदोलनात सहभाग

राष्ट्रपतिपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी अहमद हे स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी म्हणूनही सक्रिय होते. त्यांनी १९४० मध्ये ब्रिटिश सरकारने भारतीय नेत्यांची कुठलीही संमती न घेता भारताला दुसऱ्या महायुद्धात सहभागी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या निषेधार्थ अहमद यांनी तत्कालीन आसाम सरकारमधून आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. या कृतीसाठी त्यांना एक वर्ष कारावास भोगावा लागला. भारत छोडो आंदोलनादरम्यानही ब्रिटिशांनी अहमद यांना पुन्हा ताब्यात घेतले होते. मात्र, एप्रिल १९४५ मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर झालेल्या आसामच्या निवडणुकीत मुस्लीम लीगच्या उमेदवाराकडून अहमद यांना पराभव स्वीकारावा लागला; परंतु पुढच्याच वर्षी १९४६ मध्ये त्यांची आसामचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी फखरुद्दीन अली अहमद यांनी महत्वाची भूमिका बजावली. तत्कालीन केंद्रीय मंत्री म्हणू त्यांनी लेबनॉन, इराक आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या मुस्लीम बहुल देशांचा दौरा केला आणि जगासमोर भारताची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली.

आणखी वाचा : भाजपाच्या खेळीने शिंदे गटात खळबळ; ठाकरेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा, काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

१९३१ मध्ये केला काँग्रेसमध्ये प्रवेश

१३ मे १९०५ रोजी दिल्लीत जन्मलेल्या फखरुद्दीन अली अहमद यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे कुटुंब मूळचे आसाममधील गोलाघाट भागातील कखारीहाट येथील होते. अहमद यांनी आपले प्राथामिक शिक्षण उत्तर प्रदेशातील गोंडा आणि त्यानंतर दिल्लीतून पूर्ण केले. १९२१ मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. भारतात परतल्यानंतर त्यांनी पंजाब उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९२८ मध्ये अहमद पुन्हा आसामला परतले आणि तिथेच आपली राजकीय कारकीर्द घडवली. १९३१ मध्ये अहमद यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९३५ मध्ये त्यांनी राखीव मुस्लीम जागेवरून निवडणूक जिंकली. १९३६ पासून ते १९७४ मध्ये राष्ट्रपती होईपर्यंत ते आसाम प्रदेश काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीशी जोडलेले होते.

Who Was Fakhruddin Ali Ahmed
माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद (छायाचित्र दी इंडियन एक्स्प्रेस)

१९६६ मध्ये मिळाले होते मंत्रिपद

१९३८ ते १९३९ या कालावधीत त्यांनी आसाममधील गोपीनाथ बोरदोलोई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थ आणि महसूल मंत्री म्हणून काम केले. त्यावेळी जमीन महसुलात ५० टक्के सवलत देण्याचा धाडसी निर्णय अहमद यांनी घेतला होता. स्वातंत्र्यानंतर अहमद यांची राष्ट्रीय राजकारणावरील पकड अधिकच घट्ट झाली. १९५२ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आणि १९५५ मध्ये त्यांनी भारतीय वकिलांच्या शिष्टमंडळाचे सोव्हिएत युनियनमध्ये नेतृत्व केले. १९५७ मध्ये अहमद यांनी संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. १९६६ मध्ये राज्यसभेवर निवड झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये त्यांच्याकडे सिंचन व ऊर्जा मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. पुढे त्यांनी शिक्षण मंत्री म्हणूनही धुरा सांभाळली.

हेही वाचा : प्रकाश आंबेडकर आक्रमक का झाले? आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा कशासाठी?

१९७४ मध्ये मिळाले देशातील सर्वोच्चपद

१९६७ मध्ये अहमद यांनी आसाममधील बरपेटा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली. या काळात त्यांनी औद्योगिक विकास आणि कृषी मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे काम पाहिले. १९७१ च्या निवडणुकीनंतरही अहमद यांनी कृषी मंत्री म्हणून आपले पद कायम राखले होते. राजकारणाव्यतिरिक्त अहमद यांना खेळांची प्रचंड ओढ होती. त्यांनी आसाम आणि राष्ट्रीय स्तरावर क्रीडा संघटनांचे नेतृत्व केले. सुरुवातीला त्यांनी आसामच्या फुटबॉल आणि क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते ऑल इंडिया लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष झाले. २४ ऑगस्ट १९७४ साली अहमद यांनी राष्ट्रपतिपदाचा कार्यभार स्वीकारला. ११ फेब्रुवारी १९७७ मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आसाममधील बरपेटा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले होते. मात्र भाजपा सरकारने या विद्यालयाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर राज्यातील विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे.