संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी रविवारी (११ ऑगस्ट) भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये संघ-भाजपामधील ताणलेल्या संबंधांची चर्चा महत्त्वाची ठरली. त्याशिवाय आगामी काळात काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि बांगलादेशातील अराजकावरदेखील चर्चा करण्यात आली आहे. मात्र, अधिकृत सूत्रांनी ही 'नियमित बैठक' असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने अपेक्षित कामगिरी केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या कानपिचक्या आणि संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या 'ऑर्गनायझर' मासिकातून केलेली टीका यांमुळे संघ आणि भाजपामधील सहसंबंध दुरावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक फारच महत्त्वाची मानली जात आहे. हेही वाचा : ‘माझ्याभोवती बहिणींच्या राख्यांचे सुरक्षा कवच’; महिला मेळाव्यात अजित पवार भावनिक संघाशी निगडित संघटनांनी 'नीट' परीक्षेत झालेल्या घोटाळ्यावरूनही खरमरीत टीका केली होती. तसेच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कामकाजामध्ये सुधारणा करण्याचे आवाहनही केले होते. दुसऱ्या बाजूला बांगलादेशमधील अराजकाचे विविध परिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे. विशेषत: बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिकच चर्चेत आहे. संघाकडून याबाबतही अधिक चिंता व्यक्त केली जात असून, संघ बांगलादेशमधील परिस्थितीवर नजर ठेवून आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे भाजपाला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. भाजपा आणि संघामधील अनेक जण याबाबतच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. ऑगस्टअखेर होणाऱ्या समन्वय बैठकीपूर्वी ही घोषणा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही समन्वय बैठक केरळमध्ये संघाशी निगडित संघटनांसोबत होणार आहे. भाजपा आणि संघ यांच्यामध्ये झालेल्या या बैठकीला भाजपाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष व आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; तर संघाकडून दत्तात्रेय होसबळे व अरुण कुमार उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वरिष्ठ नेत्यांनी भाजपा आणि संघामधील संबंध आणि समन्वय सुधारण्याबरोबरच विविध मुद्द्यांवरही चर्चा केली. भाजपामध्ये संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. या बदलांबाबत झालेल्या चर्चेशिवाय केरळमध्ये होणाऱ्या संघाच्या आगामी बैठकीबाबतही चर्चा झाली. केरळमधील या बैठकीतही ते भाजपा आणि संघ यांच्यातील समन्वयाबाबतच प्रदीर्घ चर्चा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेबाबतची चिंता आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न याविषयीही या बैठकीमध्ये चर्चा झाली. संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, "जेव्हा अशी बैठक होते तेव्हा अनेक मुद्द्यांवर चर्चा होते. मी तुम्हाला एवढेच सांगेन की, नजीकच्या भविष्यातील निवडणुकांबाबत चर्चा झाल्या. बांगलादेशमधील परिस्थिती हा संघासाठी चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळे अर्थातच त्याविषयीही चर्चा झाली." बांगलादेशमधील अराजकाबाबत संघाला असलेली चिंता व्यक्त करताना या वरिष्ठ नेत्याने म्हटले, "फक्त अल्पसंख्याकांचे संरक्षण एवढ्यापुरता बांगलादेशचा मुद्दा मर्यादित नाही. हा राष्ट्रीय सुरक्षेचाही मुद्दा आहे. तिथल्या सत्ताबदलाचे परिणाम आपल्या सीमा आणि आपल्या अंतर्गत सुरक्षेवरही होऊ शकतात. तसेच, आपल्या देशांतर्गत असलेल्या सामाजिक-राजकीय मुद्द्यांवरही त्याची छाया पडू शकते." सायंकाळी सुमारे पाच तास चाललेल्या या बैठकीत सध्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, असे कळते आहे. ज्या दिवसापासून पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या राजवटीच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनामुळे त्या देश सोडून पळून गेल्या; तेव्हापासूनच बांगलादेशच्या संकटावर चिंता व्यक्त करण्यामध्ये संघ आघाडीवर आहे. हेही वाचा : लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी? दुसऱ्या बाजूला संघ आणि भाजपाचे संबंधही बरेच दुरावलेले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या प्रचारावरून मोहन भागवत यांनी एक प्रकारे सावधगिरीचा इशाराच भाजपाला दिला होता. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला, त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती. एकीकडे मोहन भागवत यांनी केलेली वक्तव्ये चर्चेत असतानाच दुसरीकडे ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रामधूनही भाजपाला खडेबोल सुनावण्यात आले होते. या लेखामध्ये असे म्हटले होते की, या लोकसभा निवडणुकीकरिता भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते संघाकडे मदत मागण्यासाठी आलेच नाहीत; त्याचाच परिणाम म्हणून पक्षाने इतकी खराब कामगिरी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा हा निकाल अतिआत्मविश्वासात असलेल्या भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजपामध्ये समन्वयाचा अभाव निर्माण झाला असून, आता त्यांच्यामधील संबंध ताणले गेल्याची जोरदार चर्चा झाली होती. आता महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे चांगल्या कामगिरीसाठी या दोघांमध्येही चांगला समन्वय असणे गरजेचे आहे. त्यासाठीच ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.