अलिबाग : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच कोकणात पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. यंदा १३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात असले तरी लढत ही भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश कीर यांच्यात होत आहे. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा मतदारांची संख्या १ लाख २० हजाराने वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या सुशिक्षीत मतदारांचा कौल कोणाला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात २६ जून रोजी मतदान आहे. या मतदार संघात पालघर , ठाणे , रायगड , रत्‍नागिरी , सिंधुदुर्ग अशा पाच जिल्‍हयांचा समावेश आहे. यंदा मतदारसंघासाठी सुमारे २ लाख २३ हजार २२२ मतदारांची नोंदणी झाली आहे. गेल्या वेळेसच्या तुलनेत यंदा १ लाख २० हजार अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदारांचा कौल कोणाला मिळणारे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूण मतदारांपैकी सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील आहेत. , त्याखालोखाल रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघात निम्याहून अधिक मतदार हे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे निवडणूक निकालात रायगड आणि ठाणेकरांचा कौल निर्णायक भुमिका बजावणार आहे.

हेही वाचा…चंद्रपूरमध्ये भाजपच्या ओबीसी जनाधाराला ओहोटी

गेल्या वेळेस या मतदारसंघासाठी तिरंगी लढत पहायला मिळाली होती. शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला आणि भाजपचे निरंजन डावखरे यांच्यात लढत झाली होती. यात निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले निरंजन डावखरे विजयी झाले होते. यंदा पुन्हा एकदा भाजपकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. रत्नागिरीचे काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष आणि कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष रमेश कीर यांचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. निरंजन डावखरे यांचा राष्ट्रवादीत असतानाचा एक अपवाद सोडला तर या मतदारसंघावर भाजपचे कायमच वर्चस्व राहीले आहे. त्यामुळे या निवडणूकीत काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा निवडणूकीत कोकणाने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. राज्यातील इतर भागात महा विकास आघाडीचा प्रभाव दिसून आला असला तरी कोकणाने प्रवाहाविरोधात मतदान केले होते. त्यामुळे हा कल या सुशिक्षित मतदार कायम ठेवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोकणातील सुशिक्षित मतदार कोणाच्‍या बाजूनं कौल देतोय हे निकालानंतर स्‍पष्‍ट होणार आहे.

हेही वाचा…डॉ. प्रशांत पडोळे (भंडारा-गोंदिया, काँग्रेस)

जिल्हा निहाय मतदारांची आकडेवारी

जिल्हा मतदार २०२४ मतदार २०१८

पालघर २८ हजार ९२५ १५ हजार १३५

ठाणे ९८ हजार ८६० ४६ हजार ७५७

रायगड ५४ हजार २०८ १९ हजार ९१८

रत्नागिरी २२ हजार ६८१ १६ हजार १८६

सिंधुदूर्ग १८ हजार ५४८ ५ हजार १३५

एकूण २ लाख २३ हजार २२२ १ लाख ३ हजार ६८

हेही वाचा…काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले वसंतराव चव्हाण (नांदेड, काँग्रेस)

उमेदवार कोण

रमेश श्रीधर कीर (काँग्रेस), निरंजन वसंत डावखरे (भाजपा), विश्वजीत तुळशीराम खंडारे (भिमसेना), अमोल अनंत पवार, अरुण भिकन भोई, अक्षय महेश म्हात्रे, गोकुळ रामजी पाटील, जयपाल परशुराम पाटील, नागेश किसनराव निमकर, प्रकाश वड्डेपेल्ली, मिलिंद सिताराम पाटील, शैलेश अशोक वाघमारे, श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती असे एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.