सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात येऊन भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी बेरजेचे राजकारण करण्याचा घाट घातला असल्याचे दिसून आले. आमदार जयंत पाटलांना शह देण्यासाठी त्यांचे वर्चस्व असलेल्या आणि वाळव्यातील ४८ गावांचा समावेश असलेल्या शिराळा मतदार संघामध्ये ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन तावडे यांनी याचा मुहूर्त केला असल्याचे मानले जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शिराळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक हे करत आहेत. २०१४ मध्ये या मतदार संघाचे नेतृत्व शिवाजीराव नाईक यांच्या रूपाने भाजपकडे होते. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी शिराळ्यात झालेल्या जाहीर सभेत शिवाजीराव नाईक यांना निवडून दिले तर मंत्री करण्याचा शब्द दिला होता. मात्र, राज्याची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्याने गडकरींचा शब्द राहूनच गेला. २०१९ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे सम्राट महाडिक यांच्या बंडखोरीमुळे नाईकांचा पराभव झाला. आणि आमदार जयंत पाटील यांच्या सहकार्याने मानसिंगराव नाईक यांच्याकडे आमदारकी आली.

हेही वाचा…Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?

दरम्यानच्या काळात भाजपकडून शिवाजीराव नाईक यांच्याकडे दुर्लक्ष तर झालेच पण अपेक्षित राजकीय ताकदही मिळाली नाही. राजकीय विजनवासात जाण्याची वेळ आली. सहकारी संस्था कर्जविळख्यात अडकल्याने त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांना पक्ष त्यागापासून रोखण्याचे भाजपकडून प्रयत्नही झाले नाहीत. अथवा त्यांचे नेमके दुखणे काय याची विचारपूसही केली गेली नाही. आता मात्र बदलत्या काळानुसार त्यांच्या ताकदीचा अंदाज आल्याने भाजपकडून पुन्हा पायघड्या घालण्याचे प्रयत्न तर सुरू नाहीत ना, अशी शंका तावडे-नाईक भेटीमुळे येऊ लागली आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला पर्यायाने महायुतीला काँग्रेस आणि शरद पवार गटाशीच लढत द्यावी लागणार आहे. यासाठीची मोर्चेबांधणी सध्या सुरू असून राष्ट्रीय महासचिव तावडे यांचा सांगली दौरा हा त्याचीच परिणीती आहे, असे म्हणावे लागेल. तावडे यांनी जिल्ह्यातील शिराळा, पलूस, तासगाव आणि मिरज या चार विधानसभा मतदार संघाचा दौरा करत पक्षाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. उर्वरित चार म्हणजेच वाळवा, खानापूर-आटपाडी, जत आणि सांगलीसाठी ते पुन्हा पुढील महिन्यात दौरा करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह अन्य ठिकाणी मराठा मतदार भाजपपासून दूर जात असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले असून सांगलीची जागा भाजपने गमावली आहे. यामुळे मराठा समाज पुन्हा पक्षाकडे खेचण्यासाठी तावडेंचे नेतृत्व पुढे करून भाजपने बेरजेचे राजकारण करण्याचा घाट तर घातला नाही ना, अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा…अहमदपूरमध्ये अजित पवार गटाबरोबर मैत्रीपूर्ण लढतीची भाजपची मागणी

तावडे यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाची नस जाणणारे संघटन मंत्री मकरंद देशपांडे होते. यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या बालेकिल्ल्यात कोणाची किती ताकद आहे, हे तावडे यांनी जाणून घेतले असावे. चार विधानसभा मतदार संघाचा आढावा अद्याप बाकी आहे. येत्या काही दिवसांत पक्षाला अनुकूल स्थिती निर्माण झाली तर उर्वरित मतदार संघामध्ये राजकीय फेरमांडणी केली जाईल, अन्यथा आहे त्या शिलेदारावरच पक्षाची भिस्त राहणार, असे दिसते.