अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका व नगर पंचायतीमध्ये सत्ता समीकरण जुळवतांना नेत्यांची चांगलीच कसरत होत आहे. काँग्रेस व ‘एआयएमआयएम’चे नगरसेवक सोबत घेतल्याने भाजपची नाचक्की झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अभ्रद युतीवर फुली मारली. आता त्या दोन पक्षांच्या नगरसेवकांना सोडून बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान असेल. यामध्ये अकोला व वाशीम जिल्ह्यात भाजपच्या मदतीला ‘मविआ’तील काही घटक पक्ष येणार असल्याची माहिती आहे.

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार थेट जनतेतून निवडून आले. ज्या पदाचा नगराध्यक्ष निवडून आला, त्याच पक्षाच्या नगरसेवकाचे बहुमत आले, असे अनेक ठिकाणी झालेले नाही. आता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या पहिल्या सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवड करतांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजपने विकास मंचाची स्थापना केली होती. यामध्ये ‘एआयएमआयएम’च्या पाच नगरसेवकांचा देखील समावेश करण्यात आल्याने राज्यात चांगलाच गदारोळ झाला. अखेर मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देऊन ती युती तोडण्याचे आदेश द्यावे लागले.

‘एआयएमआयएम’शी जवळीक साधणे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना चांगलेच अंगलट आले. पक्षाने त्यांना जाब विचारला. आता अकोटमध्ये भाजपला महाविकास आघाडीतील घटक शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व इतर पक्षांची साथ घेऊन बहुमत सिद्ध करावे लागेल. मंचामध्ये या पक्षांचा समावेश होताच. तेल्हारा व हिवरखेड येथे भाजपकडे बहुमत असून मूर्तिजापूरमध्ये काठावर असल्याने त्यांना अपक्ष व राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ मिळू शकते. बाळापूरमध्ये काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या आघाडीकडे बहुमत आहे, तर बार्शीटाकळीमध्ये त्रिशंकू स्थिती आहे.

वाशीम जिल्ह्यात वाशीम नगरपालिका वगळता इतर ठिकाणी बहुमत स्पष्ट झाले. कारंजामध्ये नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे बहुमत ‘एआयएमआयएम’कडे आहे. मंगरुळपीरमध्ये भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे १५ नगरसेवक असल्याने बहुमताचे समीकरण जुळते. रिेसोडमध्ये महायुती बहुमतात आहे, तर मालेगावमध्ये नगराध्यक्षपदासाठी जरी विरोध लढले तरी आता भाजप व शिंदे सेना एकत्रित येऊन गणित जुळवेल. वाशीममध्ये ३२ पैकी १४ जागा मिळवून भाजप बहुमतापासून दूर राहिला. याठिकाणी बहुमताचे समीकरण जुळवणे भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

भाजपला शिवसेना ठाकरे गटाची साथ?

वाशीम नगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट १३, काँग्रेस दोन, ‘एआयएमआयएम’ दोन आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. जादुई १७ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला तीन नगरसेवकांची गरज राहील. मुख्यमंत्र्यांनी ताकीद दिल्याने काँग्रेस व ‘एआयएमआयएम’चे पर्याय संपले. भाजपपुढे शिवसेना ठाकरे गटाचा एकमेव पर्याय असून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आज बैठक झाल्याची माहिती आहे. वाशीममध्ये भाजपला शिवसेना ठाकरे गटाची साथ मिळू शकते.