मुंबई : भाजपने काही नेत्यांवर केवळ आरोप होताच, घरचा रस्ता दाखविला आहे किंवा विरोधी पक्षात असताना त्यांच्या राजीनाम्यासाठी रान उठविले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरूद्धचे आरोप सिद्ध होवूनही त्यांची खाती काढली, तरी मंत्रीपद कायम ठेवून संरक्षण दिले आहे.
नैतिकतेचे दावे करणाऱ्या भाजपने राज्यात सत्तेसाठी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचार का विरोधात रान उठविले,त्यांच्या मांडीला मांडी लावून महायुती सरकार स्थापन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आदींनी टीकेची झोड उठविली होती व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांना तुरूंगात पाठविण्याचे दावे करण्यात आले होते.
माजी मुख्य मंत्री अशोक चव्हाण यांनाही ‘ आदर्श ‘ इमारत गैर व्यवहार प्रकरणी भाजपच्या दबावामुळे राजीनामा द्यावा लागला. पण पवार व चव्हाण भाजपबरोबर आल्यावर त्यांची पापे धुतली गेली आणि त्यांच्याविरोधातील न्यायालयीन कारवाई रेंगाळली. पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यात महार वतनाच्या जमीन खरेदीचा वादग्रस्त व्यवहार केला, त्यात पवार यांच्या राजीनाम्याची मागणी होवूनही त्यांनाच काय, पार्थ पवार यांच्याविरूद्धची कारवाई, तपास संथ गतीने होत असल्याने त्यांना संरक्षण मिळाले आहे.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये सरकार स्थापन झाल्यावर वर्षभराच्या आतच ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप झाले आणि फडणवीस यांना आव्हान देत असलेल्या खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. स्वपक्षीय नेत्याला भाजपने संरक्षण दिले नाही. अगदी १९९५ च्या भाजप शिवसेना युती सरकारच्या काळातही महादेव शिवणकर, शोभा फडणवीस, शशिकांत सुतार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर घरचा रस्ता दाखविण्यात आला होता.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात संजय राठोड यांच्यावर आरोप करून भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली व त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. तेच राठोड आता फडणवीस यांच्याबरोबर सरकारमध्ये आहेत. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधातही आरोप झाले आणि त्यांना काही काळ संरक्षण दिल्यानंतर राजीनामा घेण्यात आला. कृषी खात्याच्या खरेदीत उच्च न्यायालयाने ‘ क्लीन चीट ‘ देवूनही त्यांना अजून मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत भाजपने टीकेची राळ उठविली होती व त्यांना अटकही झाली होती. पण आता तेच भुजबळ फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असून न्यायालयीन प्रक्रिया रेंगाळली आहे.
फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर कुख्यात दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप केले आणि त्यांना अटक झाली. सध्या ते वैद्यकीय जामिनावर आहेत. त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली नाही, मात्र महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत लढणार असेल, तर युती करणार नाही, अशी भूमिका भाजपने जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे कुख्यात इक्बाल मिर्ची याच्याबरोबर आर्थिक संबंध असल्याचे आरोप भाजपने केले होते. पण भाजपला पटेल चालतात, त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांशी गाठीभेटी होतात. भाजपला पटेल चालतात, मात्र मलिकांशी वाकडे आहे. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावूनही फडणवीस यांनी मंत्रीपदी कायम ठेवले आहे. त्यामुळे व्यक्ती आणि पक्ष याबाबत भाजपची नैतिकतेची व्याख्या वेगवेगळी कशी, हा प्रश्न अनेकांना पडला असून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
