केंद्रीय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फारसे महत्त्व न देता भाजपने महायुतीतील दोन्ही मित्र पक्षांना सूचक इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीतही या दोन्ही मित्र पक्षांना त्यांची जागा दाखविली जाईल, अशीच चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने ३० तर काँग्रेस बंडखोराने एक जागा जिंकली. राज्यात भाजपची अवस्था फारच दयनीय झाली. २३ खासदारांवरून संख्याबळ नऊवर घटले. १४ खासदारांचे संख्याबळ कमी झाले. मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निर्धार केलेल्या भाजपची मते मित्र पक्षांकडे हस्तांतरित झाली. पण त्याच वेळी शिवसेना शिंदे गट वा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांची मते भाजपकडे हस्तांतरित झालेली दिसत नाहीत, असे भाजप नेत्यांचे निरीक्षण आहे. भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा फटका होता.

हेही वाचा…गडचिरोलीत आदिवासी, ओबीसी मतदार भाजपपासून दुरावले!

लोकसभा निकालावरून भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन्ही मित्र पक्षांना सूचक इशारा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून येऊनही त्यांच्या पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार हे पद दिले. शिंदे यांच्यापेक्षा कमी खासदार असलेल्या चिराग पासवान, कुमारस्वामी वा जतीन मांझी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. यावरून मोदी वा भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांना फारसे महत्त्व दिलेले नाही. अजित पवार गटाचीही राज्यमंत्रीपदी बोळवण करण्यात आली. पण अजित पवार गटाने कॅबिनेटचा आग्रह कायम धरला. शिंदे यांनी मिळाले त्यात समाधान मानले. कॅबिनेट मंत्रिपदासाठी फार काही आग्रह धरलेला दिसत नाही.

हेही वाचा…२६ व्या वर्षी राजकारणात तर ३६ व्या वर्षी मंत्री; कोण आहे मोदी सरकारमधील सर्वांत तरुण मंत्री?

महाराष्ट्रात साऱ्यांचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. लोकससभेला कमी जागा मिळाल्या तरी त्याची भरपाई विधानसभेत केली जाईल, असा दावा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. राष्ट्रवादीला ८० ते ९० जागा देण्याचा शब्द पाळला जावा, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. शिंदे गटालाही जागावाटपात अधिक जागा हव्या आहेत. पण केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे वा पवार यांची भाजपकडून ज्या पद्धतीने कोंडी करण्यात आली त्यावरून भाजप अधिक जागा सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. अजित पवार गटाचा भाजपला फारसा उपयोग झाला नाही. शरद पवार यांना शह देण्यासाठी भाजपकडून अजित पवारांचा वापर करण्यात आला. पण काका-पुतण्याच्या लढाईत काका शरद पवार यांनी बाजी मारली. अजित पवार गट कोठेच प्रभावी ठरला नाही. अगदी अजित पवारांना बारामतीची जागा जिंकता आली नाही. याशिवाय अजितदादांच्या बारामती विधानसभा मतदारंसघातही सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले हे सारे मुद्दे अजितदादांसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणारे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sends warning to mahayuti allies eknath shinde and ajit pawar offering ministry of state in narendra modi 3 0 cabinet after lok sabha setback print politics news psg
First published on: 10-06-2024 at 11:12 IST