उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना भाजपाला मोठा धक्का बसला. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वाराणसीसह लखनौमध्ये सत्ताधारी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही जागांवर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीने (सपा) दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे हे निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ११ जागांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान घेण्यात आले होते. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक भाजपा आणि सपा दोघांसाठीही प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीची मतमोजणी २७ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. गुरुवारी तब्बल ५५ तासांच्या मतमोजणीनंतर या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये भाजपाने सहा तर समाजवादी पक्षाने पाच जागांवर विजय मिळवला. या निकालांमुळे समाजवादी पार्टी आणि भाजपा यांच्यातील विधान परिषदेतील संख्याबळाचे चित्र बदलले. सपाने आपले अस्तित्व अधिक मजबूत केले असून, भाजपाने मात्र आपले एकूण संख्याबळ कायम राखले.
समाजवादी पार्टीचा किती जागांवर विजय?
या निकालानंतर विधान परिषदेत समाजवादी पार्टीचे संख्याबळ १२ इतके झाले आहे. विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी आवश्यक असलेल्या १० जागांपेक्षा हे संख्याबळ दोनने अधिक आहे. विशेष म्हणजे समाजवादी पार्टीने वाराणसीतील दोन्ही जागांवर पुन्हा विजय मिळवला आहे. तसेच भाजपाकडील लखनऊ पदवीधर मतदारसंघाची जागाही आपल्याकडे खेचून आणली आहे. याशिवाय अपक्षाच्या ताब्यात असलेली आग्रा शिक्षक मतदारसंघाची जागाही सपाने जिंकली आहे. दुसरीकडे भाजपाने सहापैकी चार शिक्षक मतदारसंघांच्या जागा कायम राखल्या आहेत. तसेच मेरठ आणि आग्रा पदवीधर मतदारसंघांतील दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे. २०२० मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने सहा, सपाने तीन, तर अपक्ष उमेदवारांनी दोन जागा जिंकल्या होत्या.
वाराणसीत भाजपाचा पुन्हा पराभव
वाराणसी पदवीधर मतदारसंघात समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार आशुतोष सिन्हा यांनी भाजपाचे उमेदवार केदारनाथ सिंह यांचा पराभव केला. या मतदारसंघातील मतमोजणी बराच काळ सुरू होती. मतमोजणीला ५५ तासांपेक्षा अधिक वेळ लागला. निकालावरून वाद निर्माण झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये नेते आणि कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर ठाण मांडून होते. वाराणसी शिक्षक मतदारसंघात सपाचे विद्यमान आमदार लाल बिहारी यादव यांनी पुन्हा विजय मिळवला. या दोन्ही जागांवरील पराभवामुळे भाजपाची चिंता वाढली आहे. समाजवादी पार्टीने या मतदारसंघांतील आपले विद्यमान प्रतिनिधित्व कायम राखले. त्याचबरोबर इतर मतदारसंघांतही नव्या जागा जिंकल्या.
सपाला कोणकोणत्या जागांवर मिळाला विजय?
समाजवादी पार्टीला सर्वात महत्त्वाचा विजय लखनऊ पदवीधर मतदारसंघात मिळाला. या मतदारसंघात सपाच्या कांती सिंह यांनी भाजपाचे उमेदवार अवनीश कुमार सिंह यांचा तब्बल १४ हजार ८५५ मतांनी पराभव केला. कांती यांना ५१ हजार १६८ मते मिळाली, तर अवनीश यांना ३६ हजार ३१३ मतांवरच समाधान मानावे लागले, तर सपाला दुसरा मोठा विजय आग्रा शिक्षक मतदारसंघात मिळाला. या जागेवर आकाश अग्रवाल यांनी १४ हजार ४६ मते मिळवून विजय साकारला. २०२० मध्ये ही जागा अपक्ष उमेदवाराकडे होती. समाजवादी पार्टीने पदवीधर मतदारसंघांच्या पाच पैकी तीन जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. त्यामध्ये अलाहाबाद-झाशी, वाराणसी आणि लखनऊ या मतदारसंघांचा समावेश आहे. दुसरीकडे, भाजपाने मेरठ आणि आग्रा पदवीधर मतदारसंघांतील जागा कायम राखल्या. मेरठ पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे दिनेश कुमार गोयल, तर आग्रा पदवीधर मतदारसंघातून मानवेंद्र प्रताप सिंह यांनी विजय मिळवला.
शिक्षक मतदारसंघांमध्ये भाजपाची सरशी
पदवीधर मतदारसंघांत पराभव झाला असला तरी शिक्षक मतदारसंघांमध्ये भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. एकूण सहा जागांपैकी चार जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे, तर उर्वरित दोन जागा समाजवादी पार्टीने जिंकल्या आहेत. भाजपाने उमेश द्विवेदी यांच्या माध्यमातून लखनऊ शिक्षक मतदारसंघातील जागा कायम राखली आहे. श्रीचंद शर्मा यांनी मेरठ शिक्षक मतदारसंघातून, तर हरिसिंग ढिल्लन यांनी बरेली-मुरादाबाद शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला आहे. याशिवाय, गोरखपूर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघात ध्रुव कुमार त्रिपाठी यांनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली आहे. या विजयामुळेच लखनऊ पदवीधर मतदारसंघातील जागा गमावूनही भाजपाला विधान परिषदेतील आपले एकूण संख्याबळ सहावर कायम राखण्यात यश मिळाले आहे.
उत्तर प्रदेशात भाजपासाठी धोक्याची घंटा?
या निवडणुकीतील सपाच्या वाढलेल्या संख्याबळामुळे भाजपाच्या चिंतेत भर पडली आहे. कारण, २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. देशातील सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ असलेल्या या राज्यात भाजपाची एकहाती सत्ता आहे. यापूर्वी २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने भाजपाला मोठा धक्का दिला होता. दरम्यान या निकालानंतर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव लवकरच वाराणसीला भेट देणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे. गुरुवारी निकालावर प्रतिक्रिया देताना अखिलेश यादव म्हणाले की, भाजपचा पराभव म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणाबाबतच्या पक्षाच्या धोरणांचा पराभव आहे. सुशिक्षित बेरोजगार पदवीधरांनीही भाजपाविरोधात आपला कौल दिला आहे. या निकालांमुळे भाजपावर राजकीय अस्तित्वाचे संकट निर्माण झाल्याचा दावाही अखिलेश यादव यांनी केला.
अखिलेश यादव नेमके काय म्हणाले?
भाजपाने गैरप्रकार करून विजय मिळवल्याचे सर्वांनाच माहीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे सरकारच्या दोन्ही घटकांमधील तणाव आणखी वाढल्याचेही ते म्हणाले. आमच्या एकाही उमेदवाराचा प्रत्यक्षात पराभव झालेला नाही. भाजपाने केलेल्या गैरप्रकारांमुळे त्यांना विजय मिळवता आला नाही, असा टोला अखिलेश यांनी लगावला. दुसरीकडे वाराणसी पदवीधर मतदारसंघात भाजपाचा पराभव झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचक विधान केले. “जनतेने त्यांचा कौल दिला आहे. हा सुशिक्षित लोकांचा कौल असून आम्ही त्याचा स्वीकार करतो. मात्र, ही मते केवळ सुशिक्षित लोकांची आहेत, सर्वसामान्य जनतेची नव्हे. आगामी विधानसभा निवडणुकीत हेच सुशिक्षित मतदार मतदानासाठी बाहेर पडणार नाहीत. तेव्हा केवळ सर्वसामान्य मतदारच मतदान केंद्रांवर दिसतील,” असे राजभर म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे भाजपाकडून पदवीधर मतदारांचा अपमान केला जात असल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे.
