आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पक्षातील २५ कार्यकर्त्यांनी थेट भाजपात प्रवेश केला… कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभावशाली महिला नेत्याने आपल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला… रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत सर्व काही निश्चित झाले असून केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला… पंकजा मुंडे यांनी भाजपातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये यावे आणि ओबीसीचे नेतृत्व करावे, अशी खुली ऑफर आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली… शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार यांच्यातील वाद शिगेला पोहोचला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेसेनेला भाजपाकडून मोठा धक्का

कल्याण-डोंबिवली शहरांत भाजपा आणि शिंदेसेनेने एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेने भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात खेचून आणले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही शिंदेसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचा सपाटा लावला आहे. भाजपाच्या कल्याण डोंबिवली शाखेने शिंदेसेनेचे २५ युवा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेची युती आहे. पालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी भाजपाच्या भूमिकेमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता पसरली होती. वरिष्ठांनी या विषयाची गंभीर दखल घेतल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संगतमताने हा वाद मिटवला होता. मात्र, आता पुन्हा फोडाफोडीची स्पर्धा सुरू झाल्यामुळे भाजपा आणि शिंदेसेनेतील तणाव वाढला आहे.

ठाकरे गटातील महिला नेत्याचा राजीनामा

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभावशाली नेत्या वैशाली दरेकर राणे यांनी आज जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. २०२४ मध्ये वैशाली दरेकर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, अटीतटीच्या लढतीत शिंदे यांनी दरेकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्याकडे जिल्हा महिला संघटक पदाची जबाबदारी दिली होती. मात्र, आता दरेकर यांनी वैयक्तिक कारणांमुळे या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेला असला तरीही मी ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रायगडचे पालकमंत्रिपद शिंदेसेनेकडे?

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत सर्व काही निश्चित झाले असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचा दावा शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेकांनी त्याबाबत कयास बांधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी या पदावर आपापला दावा सांगितला आहे. यादरम्यान माणगाव येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना गोगावले यांनी पालकमंत्रिपदाबाबत सर्व काही निश्चित झाले असून केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे सांगितले आहे. सर्वकाही ठरलेले आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती गोगावले यांनी दिली आहे.

पंकजा मुंडेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्त व्हावेसे वाटते, असे विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना भाजपा सोडून थेट आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली. गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यानंतर ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याचे काम सुरू झाले. पंकजा मुंडे यांना पक्षात न्याय मिळत नाही, असे वाटत असेल, त्यामुळे त्या भावना उफाळून येतात. पंकजा मुंडे यांना आमची विनंती राहील की, तुम्ही भाजपामधून बाहेर पडून बिनधास्त नेतृत्त्व करा आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. भाजामधून बाहेर पडा आणि मैदानात या… आम्ही तुम्हाला काँग्रेसमध्ये घेऊ… त्या जर आमच्या पक्षात येत असतील तर नेतृत्वाला विचारून नक्की निर्णय घेऊ, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यावर पंकजा मुंडे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, काँग्रेसने ऑफरची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजपा-ठाकरे गटातील नेत्यांमध्ये वाद पेटला

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला. मंत्री गोरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राऊत यांच्यावर सोलापूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जयकुमार गोरे यांनी कोण संजय राऊत म्हणत? असे वक्तव्य केले होते. त्यावर संजय राऊत यांनीही गोरेंना दूर राहण्याचा सल्ला देत जवळ फिरकल्यास अडचणीत याल, असा इशारा दिला आहे. सोलापूरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत राऊतांना विचारण्यात आले असता, “राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असतात, कशासाठी गुन्हा दाखल झालाय? मला कल्पना नाही. सरकारमधील लोकं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानण्यास तयार नाहीत. त्यामुळे शब्दांनी अपशब्दाचे अवरण चढवून गुन्हे दाखल केले जातात,” अशी टीका राऊत यांनी केली. “गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य सभ्येत्याच्या कोणत्या चौकटीत बसते? उद्वव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, शिवसेनाप्रमुख आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही वक्तव्य करायचे आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर तुम्ही गुन्हे दाखल करायचं याला हुकूमशाही म्हणतात,” असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला.