BJP vs Shinde Sena Maharashtra 2026 : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्यातील सत्ताधारी महायुतीत पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळून आला आहे. भाजपाकडून आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शिंदे सेनेतील काही मंत्र्यांनी केला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास आम्हाला तातडीने राजीनामे द्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिल्याची माहिती आहे. अर्थातच शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी केलेले सर्व आरोप भाजपाने फेटाळून लावले आहे. सध्या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न करीत असले तरीही स्थानिक पातळीवरील महायुतीतील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा व शिंदे सेनेतील वादाचे नेमके कारण काय? त्याविषयीचा हा आढावा…
शिंदे गटाचा नेमका आरोप काय?
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले होते. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला होता. तेव्हापासून भाजपा व शिंदे गटात सातत्याने वाद होत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीवरून हा वाद आणखीनच उफाळून आला आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने आपल्याला दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप शिंदे गटातील नेत्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाने शिंदे गटाच्या राजकीय विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
परभणीत शिंदे गट-भाजपात तीव्र संघर्ष
भाजपाने परभणी जिल्हा परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर कब्जा केला. परिणामी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले. या निवडणुकीत भाजपाच्या लता वाकळे यांची अध्यक्षपदी; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत विटेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सत्तेच्या या समीकरणात आपल्याला स्थान मिळत नसल्याचे पाहून शिंदे गटाने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. या निवडीनंतर भाजपा व शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले. भाजपाने आपल्या पाठीत खंजीर खुपसला अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेच्या नेत्यांनी दिली; तर शिंदे गटाने अध्यक्षपदासाठी मित्रपक्षाविरोधात कुरघोड्या सुरू केल्याच्या आरोप भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केला.
आणखी वाचा : ठाकरे गटाच्या दाव्याने महायुतीत खळबळ; शिंदे सेनेच्या मंत्र्यांची राजीनाम्याची तयारी? वाचा ५ घडामोडी…
छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडले?
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील इतर महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्येही महायुतीतील मित्रपक्षांमध्ये तीव्र मतभेद आणि राजकीय चुरस पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि शिंदे गट हे दोन सर्वात मोठे पक्ष असूनही अध्यक्षपदाच्या कार्यकाळावरून त्यांच्यात एकमत होऊ शकले नाही. पहिले अडीज वर्षे कोणाचा अध्यक्ष असावा यावरून सुरू असलेली दोन्ही पक्षांतील नेत्यांची बोलणी फिस्कटली. अखेर भाजपाने अपक्ष आणि इतर छोटेखानी पक्षांच्या मदतीने अध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घेतले आणि शिंदे सेनेला सत्तेपासून दूर ठेवले. सांगलीमध्ये शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी आणि बदलत्या राजकीय समीकरणाचा परिणाम दिसून आला. येथील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार संगीता पाटील यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला. आपल्या सदस्यांवर दबाव टाकण्यात आल्याने त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याचा आरोप शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला.
साताऱ्यात भाजपा-शिंदे गटात काय घडले?
सातारा जिल्हा परिषदेत पुरेसे संख्याबळ नसताही भाजपाने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर आपले उमेदवार निवडून आणले. विजयासाठी आवश्यक असलेला ३३ मतांचा आकडा भाजपाने सहजपणे गाठला; तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त उमेदवाराला केवळ ३० मतेच मिळवता आली. या घडामोडीनंतर शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजपावर ‘ऑपरेशन लोटस’ यांसारख्या तंत्राचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यादरम्यान निर्माण झालेल्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली. या झटापटीमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. या गोंधळाचे प्रतिबिंब विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. सभागृहात दिवसभर वेगवेगळ्या प्रकारे सातारा जिल्हा परिषदेचा प्रश्न उपस्थित होत राहिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या एका बैठकीत मंत्री शंभूराज देसाई यांनी असाच प्रकार सुरू राहिला तर आम्हाला राजीनामे द्यावे लागतील, असा सूचक इशारा दिला. बैठकीला उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा : अशोक खरातला पाठिशी घालणारे तीन अधिकारी कोण? विरोधकांचा खळबळजनक आरोप; विधानसभेत काय घडले?
महायुतीतील संघर्ष आणखीनच वाढणार?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवल्यानंतर लगेचच महायुतीत खटके उडायला सुरुवात झाली होती. महत्त्वाची खाती आणि जिल्ह्यांचे पालकमंत्री पद कोणाकडे असावे, यावरून दोन्ही पक्षांत अनेकदा रस्सीखेच झाली. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या करून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी भेटही घेतली. राज्यातील भाजपाच्या नेत्यांकडून टाकला जाणारा दबाव कमी करण्यासाठी शिंदे यांनी या रणनीतीचा वापर केल्याचे सूत्रांनी सांगितले. यादरम्यान जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोन्ही पक्षांत दबावाचे राजकारण आणखीनच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात शिंदे यांची भूमिका नेमकी काय असणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
