आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे सहा नगरसेवक फुटल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या भेटीची चर्चा रंगल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली… अजित पवार यांच्या विमानासाठी अगोदर नियुक्त केलेले दोन पायलट आता नेमके कुठे आहेत, असा प्रश्न आमदार अमोल मिटकरांनी उपस्थित केला… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलताने कदाचित काम केले असावे, असे मत काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले… ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मोठे नेते असून त्यांची मला भीती वाटते आणि ते काहीही करू शकतात, अशी उपरोधिक टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

भाजपाचे सहा नगरसेवक फुटले

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या भिवंडी महापालिकेतील महापौरपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर नारायण चौधरी यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने महापौरपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली; तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे नगरसेवक तारीक मोमीन यांची निवड झाली. त्यामुळे भाजपाच्या महापौरपदाच्या अधिकृत उमेदवार स्नेहल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. भिवंडी महापालिकेतील ९० प्रभागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक ३० नगरसेवक निवडून आले. त्यापाठोपाठ भाजपाचे २२, शिंदेसेनेचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १२, समाजवादी पक्षाचे सहा, कोणार्क विकास आघाडीचे चार, भिवंडी विकास आघाडी तीन आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. बहुमताचा आकडा ४६ असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार नगरसेवकांची आवश्यकता होती. त्यामुळे काँग्रेसने नाराज नारायण चौधरी यांना गळाला लावून भाजपाचा एक गट फोडला आणि महापालिकेवर सत्तास्थापन केली. या निवडणुकीची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.

राज ठाकरे शिंदेंना का भेटले?

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा गुलाल फिका पडताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (१९ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बंद दाराआड चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या भेटीचे फोटोही शेअर केले होते. यादरम्यान या भेटीमागचे नेमके कारण काय होते, याचा उलगडा खुद्द राज ठाकरे यांनीच केला. आपल्याकडे आता पूर्वीसारखे निकोप राजकारण राहिलेले नाही. कुठलेही नेते एकमेकांना भेटले की त्यामागून काही तरी राजकारण शोधून काढले जाते. एकनाथ शिंदे हे सत्तेवर असल्याने आम्हाला त्यांचे काही सल्ले द्यायचे असतील, काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील, तर भेट घ्यायला नको का? उद्या मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, असे राज यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा : काँग्रेसला सोडचिठ्ठी देताच भूपेन बोरा यांचा गंभीर आरोप; राहुल गांधींबद्दल नेमके काय म्हणाले?

‘ते’ दोन पायलट कुठे? मिटकरींचा प्रश्न

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या चौकशीवर काही आमदारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अजित पवार यांच्या विमानासाठी अगोदर नियुक्त केलेले ते दोन पायलट कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. अजितदादांच्या विमानासाठी अगोदर नियुक्त केलेले साहिल मदन आणि यश नावाचे दोन पायलट त्यादिवशी कुठे अडकले होते? आता ते कुठे आहेत? बस इतकीच माहिती मिळावी. ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर झाल्यावर मिळाला तरी हरकत नाही, असे मिटकरी म्हणाले. पायलट का बदलले गेले? विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल संबंधित कारणांवर शासकीय कारवाई व निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने झाली? असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांनी अगोदरच उपस्थित केले आहेत.

शिवरायांच्या आदर्शावरच टिपू सुलतानचे काम : शाहू छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच प्रत्येकाने पुढे गेले पाहिजे. टिपू सुलतान यांनीही शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन काम केले असावे. त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला. आता ब्रिटिशांना कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे, असे मत काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलनाची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्यानंतर राज्यात मोठा वादंग निर्माण झाला होता. यापार्श्वभूमीवर गुरुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात माध्यमांनी खासदार शाहू छत्रपती यांच्याशी संवाद साधला. आताच्या राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा विचारांचा आदर्श घेऊन काम करणे गरजेचे आहे. शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी काम केले असावे, असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : अविश्वास ठरावावर मॅच फिक्सिंग? लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवणे कठीण? चर्चेमागची कारणे काय?

शंभूराज देसाई यांचा जयकुमार गोरे यांना टोला

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मोठे नेते असून त्यांची मला भीती वाटते आणि ते काहीही करू शकतात, अशी उपरोधिक टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याने सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून महायुतीतील अंतर्गत वाद आणखीनच चव्हाट्यावर आला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने साताऱ्यात गांधी मैदानावरून निघालेल्या पदयात्रेत एका बाजूला शिवेंद्रसिंहराजे भोसले व दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे चालत होते. मला मधोमध चालण्यास सांगितल्यावर खरे तर मला भीती वाटत होती, अशी कोपरखळी देसाई यांनी भाजपाच्या दोन्ही नेत्यांना मारली. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याची मलादेखील उत्सुकता असून, आम्ही राष्ट्रवादी-शिवसेना निवडणूकीपुर्वी एकत्र आलो आहे आणि यापुढेही एकत्रच राहणार असल्याचे मंत्री शंभुराज देसाईंनी सूचक वक्तव्य केले आहे.