हिमाचल प्रदेशमध्ये २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवून सत्ता स्थापन केली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्या पक्षाने किती रुपये खर्च केले, याचा तपशील निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार भाजपाने काँग्रेसपेक्षा दुप्पट रक्कम खर्च केल्याचे निदर्शनास आले आहे. भाजपाने या निवडणुकीत ४९ कोटी ६८ लाख ७१ हजार ५३३ रुपये खर्च केल्याचे जाहीर केले आहे. तर काँग्रेसने २७ कोटी १ लाख ७८ हजार ८१९ रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा घालून दिलेली असली तरी राजकीय पक्षाला खर्च करण्याचे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाने २६.६५ कोटी रुपये पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च केले, ज्यामध्ये १५.१९ कोटींच्या स्टार प्रचारकांचा प्रवास खर्चाचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे प्रमुख स्टार प्रचारक होते. ८.५० कोटी रुपये जाहीरातींवर आणि १.४९ कोटी रुपये जाहीर सभा आणि मिरवणुकीवर खर्च करण्यात आले आहेत.

भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांमार्फत किंवा प्रदेश संघटनेच्या माध्यमातून सदर खर्च केला आहे. भाजपाच्या ४९.८० कोटी खर्चांपैकी २८ कोटी रुपये प्रदेश संघटनेकडून खर्च करण्यात आले आहेत. काँग्रेसच्या २७ कोटींपैकी १४.८० कोटी उमेदवारांच्या प्रचारावर खर्च केले आहेत. उरलेले १२.२१ कोटी रुपये काँग्रेसने पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च केले आहेत. यापैकी स्टार प्रचारक जसे की, राजीव शुक्ला, आनंद शर्मा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि सुखविंदर सिंह सुक्कु यांच्या प्रवास खर्चावर ५.२८ कोटी खर्च करण्यात आले आहेत. सुक्कु हे काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले आहेत.

८ डिसेंबर २०२२ रोजी हिमाचल प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला, ज्यामध्ये काँग्रेसने ४० जागा जिंकल्या, तर भाजपाला २५ जागांवर विजय मिळवता आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात निवडणुकीतील भाजपाचा खर्च गुलदस्त्यात

हिमाचल प्रदेशसह डिसेंबर २०२२ साली गुजरातच्याही विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या होत्या. त्याठिकाणी काँग्रेसने १०३.६२ कोटी खर्च केल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केली. भाजपाने मात्र गुजरातच्या निवडणुकीसाठी किती पैसे खर्च केले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. निवडणूक आयोगाने भाजपाची आकडेवारी जाहीर केलेली नाही.