पुणे : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी (३१ ऑगस्टला) पुण्यात होणार आहे. या बैठकीला भाजपचे राज्यातील मंत्री, खासदारांपासून ते मंडल अध्यक्षांपर्यंतचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाने मरगळलेल्या काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असताना, भाजपविरोधात वातावरण तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ‘जेन-झी’ची नाराजी आणि काँग्रेसच्या वाढत्या प्रभावाला रोखून भाजपविरोधातील धार कमी करण्यासाठी भाजपने पुणे शहराची निवड करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर काँग्रेसने मरगळ झटकली आहे. काँग्रेसमुळे निर्माण झालेली विरोधाची धार बोथट करण्यासाठी आणि पकड मजबूत ठेवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीच्या बैठक आयोजित केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री, खासदार, आमदार आणि मंडल अध्यक्षांपर्यंतची संघटनात्मक फळी हजेरी लावणार आहे.
राहुल गांधी यांनी पुण्यात घेतलेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला तरुणींचा आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. परीक्षांचे निकाल, वसतिगृहांचे प्रश्न आणि रोजगाराच्या संधी या मुद्द्यांवरून तरुण वर्गात केंद्र आणि राज्य सरकारबद्दल नाराजी आहे. राहुल गांधींच्या दौऱ्याने या अस्वस्थतेला राजकीय व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे काँग्रेसच्या या वाढत्या प्रभावाला वेळीच चाप लावणे आणि विद्यार्थ्यांची ही गूंज भाजपविरोधी लाटेत रूपांतरित होण्याआधीच रोखणे, या हेतूने भाजपने बैठकीसाठी पुण्याची निवड केल्याचे सांगण्यात येते.
भाजपचे डावपेच अपयशी?
राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या दिवशीच भाजपने सामूहिक ‘वंदे मातरम्’ उपक्रम घेऊन गांंधी यांच्या कार्यक्रमाची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाला तरुणांनी गर्दी केली. मात्र, गांधी यांच्या कार्यक्रमावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. तेथेही तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्रमाच्या पूर्वसंधेला कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणेच्या (सीओइपी) वसतिगृहात काँग्रेसप्रणित ‘एनएसयूआय’ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ‘एनएसयूआय’ मरगळलेल्या स्थितीत होती. वसतिगृहातील वादानंतर ‘एनएसयूआय’ने आक्रमक पवित्रा घेतल्याने या संघटनेला जाग आली आहे. त्यामुळे भाजपचे राजकीय डावपेच अपयशी झाल्याची चर्चा आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप आगामी काळात कोणती भूमिका घेणार, हे स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येते.
दोन ठराव कोणते ?
या बैठकीत राज्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीबाबत दोन महत्त्वाचे ठराव होणार आहेत, ते ठराव कोणते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
