दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दोनदिवसीय कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. नव्या कार्यकारिणीमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलले गेले आहे. यामागे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. पक्ष बांधणी, कार्यकारिणीमध्ये सुधारणा न केल्यास वेगळा निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जुन्या कार्यकर्त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संघटनात्मक निवडी जाहीर करण्यात आल्या. कोल्हापूर महानगर अध्यक्ष निवडी बरोबरच जिल्ह्याला यावेळी प्रथमच दोन लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले. त्याचबरोबर तालुका निहाय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या निवडी जाहीर होताच कोल्हापूर भाजप मधील नवा – जुना कार्यकर्त्यांमधील वाद उफाळून आला आहे. एकापाठोपाठ एक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपल्यावरील अन्याय झाल्याचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> शिंदे-पवारांच्या कुरघोडीने भाजप नेत्यांची पंचाईत

ग्रामीण भागातही संघर्ष

सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, करवीर, शिरोळ या तालुक्यातील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या निवडीत जाणीवपूर्वक डावलले गेले असल्याची भूमिका तावातावाने मांडली. गडहिंग्लज येथे तर पक्ष कार्यालयास कुलूप लावण्यात आले. पक्षाचा फलक उतरवण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली. यामुळे शिस्तबद्ध पक्ष अशी प्रतिमा असणाऱ्या भाजपच्या कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले गेले. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी जाऊन मध्यस्थी केल्यानंतर तेथील वाद काही प्रमाणात शमला आहे. मात्र अजूनही तेथे अंतर्गत वाद धुमसत असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा >>> सूत्रे अजित पवारांकडे, पण बोलविता धनी भाजप?

कोल्हापूर तापले

कोल्हापूर शहरातील निवडीबाबत मोठ्या प्रमाणात संघर्ष होताना दिसत आहे. गुरुवारी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, गोकुळचे माजी संचालक बाबा देसाई, शिवाजी बुवा, अनिल देसाई , अजितसिंह चव्हाण यांच्यासह जुन्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत अन्याय चे कसे शिकार झालो आहोत याचा तपशील पुरवला.त्याांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. १९८० पासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये भाजप रुजावा यासाठी आयुष्याची माती केली. पण अलीकडे भाजपची पक्षीय संरचना माहित नसणाऱ्यांकडे महत्त्वाचे पदे सोपवली जातात. परिणामी कमालीचा संघटनात्मक विस्कळीतपणा आला आहे. पूर्वी पक्षांमध्ये समन्वयाची भूमिका असणारी माणसे असायची.

हेही वाचा >>> अजित पवारांची बारामतीमध्ये कसोटी

पण आता ती दूर झाली असून मनमानी कारभार केला जात आहे. अशा पद्धतीचे भाजपचे काम चालणार असेल तर पक्ष संपायला वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांची ही भूमिका पक्षाला विचार करायला लावणारी ठरली आहे. समरजितसिंह घाटगे हे एका वेगळ्या वातावरणातून राजकारणात वाढले आहेत. त्यांना भाजप म्हणजे काय हे समजून देण्याची जबाबदारी पार पाडली गेली नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडूनही चुका होत केल्या. आता नव्या निवडीत तर चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप केल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांचे नामोनिशाण पुसून काढण्याचे काम सुरू झाले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

बावनकुळेंच्या कोर्टात चेंडू

कोल्हापूर जिल्ह्यात भाजप पदाधिकारी निवडीबद्दलची नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कळविण्यात आली आहे. त्यावर भाजपच्या वतीने मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह काहींनी येऊन बाबा देसाई वगैरेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, जोपर्यंत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेऊन संघटनात्मक बदल केला जाणार नाही; तोपर्यंत आमचा विरोध कायम राहणार आहे. कोल्हापूर दौऱ्यामध्ये बावनकुळे यांच्याशी भेट झाली ,पण त्यांनी सुद्धा संघटनात्मक निवडीमध्ये बदल केला नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील नव्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उफाळलेला हा संघर्ष मिटवणे हे कोल्हापूर दौऱ्यात बावनकुळे यांच्यासमोर एक आव्हान असणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president chandrasekhar bawankule visit signs of rebellion from old workers kolhapur visit print politics news ysh
First published on: 05-10-2023 at 16:40 IST