नागपूर : पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीनेच लढविल्या जातील, असे जाहीर केले आहे.भाजपने तूर्तास एक पाऊल मागे घेतले असले तरी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या जागावाटपासाठी चर्चेचे अधिकार स्थानिक पातळीवरच देण्यात आले आहेत. मुंबई वगळता भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांची युती होणार नसल्याचेच संकेत वरिष्ठ भाजप नेत्यांनी दिले आहेत.
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील नेत्यांचे मतभेद उघड झाले. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून भाजप व शिवसेनेत स्थानिक पातळीवर मतभेद आहेत. मुंबई वगळता ठाणे,कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर आदी बहुतांश महापालिकांमध्ये स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये जुंपली असून युती होणार नाही व जागावाटप शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार असले तरी तीनही पक्ष एकमेकांविरोधात भांडत व लढत असल्याचे चित्र आहे. सरकारमध्ये करण्यात येत असलेली कोंडी आणि विरोधात निवडणुका लढून शिवसेनेची ताकद खच्ची करण्याचे भाजपकडून सुरु असलेले प्रयत्न यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे यांनी आपली नाराजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यामुळे शिंदे यांची भेट घेवून महायुतीची चर्चा करावी, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी चव्हाण यांना केली. भाजपने एक पाऊल मागे घेवून शिवसेनेशी युतीची तयारी दाखविली आहे.
शिंदे हे राज्य सरकारमध्ये सहभागी असून केंद्र सरकारलाही शिवसेना खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सत्ता मिळाल्यावर भाजपकडून सहकारी पक्षांचे खच्चीकरण होते, असा संदेश जनतेमध्ये जाणे योग्य नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने लढवाव्यात, अशी भूमिका घेवून भाजपने युतीसाठी प्रयत्न केले व जागावाटपाची चर्चा केली, असे चित्र उभे करण्याच्या सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत. बहुतांश महापालिकांमध्ये भाजपचा महापौर निवडून यावा, यादृष्टीने पक्षाने चंग बांधला आहे. मात्र चव्हाण यांनी शिंदे यांची भेट घेवून भाजप महायुतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होतील. पण स्थानिक पातळीवरही जागावाटपाच्या चर्चा महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर सुरु झालेल्या नाहीत. युती होणे अवघड असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.
