पुणे : लोकसभा आणि विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये यश मिळाल्यानंतर भाजपने आता गेल्या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागलेल्या राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन पदवीधर मतदार संघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मतदार संघांच्या मतदार नोंदणीसाठी ‘मतदार नोंदणी प्रमुख’ यांची नियुक्ती केल्यानंतर आता हक्काच्या मतदारांची नोंदणी करण्याची जबाबदारी पक्षाच्या नगरसेवकांवर सोपविण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात प्रत्येक नगरसेवकाने किमान १५००, तर पिंपरीत ५०० मतदारांची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे.

राज्यामध्ये सात पदवीधर मतदारसंघ आहेत. त्यापैकी पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन पदवीधर मतदारसंघांतील आमदारांचा कालावधी या वर्षी संपणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. आता राजकीय पातळीवर हालचाली केल्या जात आहेत. प्रामुख्याने भाजपने तयारी सुरू केली आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचा आढावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे बैठका घेऊन घेतला. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक नगरसेवकावर मतदार नोंदणीची जबाबदारी सोपविली आहे. याबाबचे आदेश त्यांनी दिले आहेत.

नगरसेवकांची जबाबदारी काय?

पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन पदवीधर मतदार संघांमध्ये मतदार नोंदविण्यासाठी भाजपने मतदार नोंदणी प्रमुख नेमले आहेत. पुणे पदवीधर मतदार संघासाठी पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी आमदार संजय केनेकर यांची, तर नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य सुधाकर कोहळे यांची गेल्या वर्षी नियुक्ती करण्यात आली. आता या कामासाठी या तिन्ही मतदार संघांमध्ये असलेल्या महापालिकांच्या नगरसेवकांकडे मतदार नोंदणीचे काम देण्यात येणार आहे.

नगरसेवकांवर पक्षाची करडी नजर?

पदवीधर मतदार संघांसाठी मतदार नोंदणीचे काम नगरसेवक करतात की नाही, याकडे पक्षाची करडी नजर असणार आहे. संबंधित नगरसेवकांवर केवळ मतदारांची नोंदणीच नव्हे; तर त्याबाबतची कागदपत्रे जमा करण्याचे काम असणार आहे. नगरसेवकांकडून हे काम करण्यात येत आहे की नाही, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी दर दिवसाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. याबाबतची माहिती नगरसेवकांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि गटनेत्यांकडे सादर करावी लागणार आहे. त्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत नगरसेवकांना जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी करावी लागणार आहे.

तीन मतदार संघातील पराभवाची सल

पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तिन्ही पदवीधर मतदार संघांमध्ये २०२० च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. त्याची सल भाजपच्या मनामध्ये आहे. पुण्यातून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, नागपूरमधून काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि छत्रपती संभाजीनगरमधून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हे विजयी झाले होते. आता हे तिन्ही मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने नियोजन सुरू केले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्याबरोबरच सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. २०२० च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड विजयी झाले. त्यावेळी महाविकास आघाडीतील तत्कालीन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून निवडणूक लढविल्याने लाड विजयी झाले.

भाजपकडून या मतदार संघाचे नेतृत्त्व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आता पुन्हा या मतदार संघावर कब्जा मिळविण्यासाठी भाजप तयारीला लागले आहे.