Vaishno Devi Medical College controversy भारतीय जनता पक्षाने (भाजपा) एका वैद्यकीय महाविद्यालयातील जागा हिंदू विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवावी, या स्वरूपाची भूमिका मांडल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वादळ उठले आहे. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)चे ज्येष्ठ नेते अली मोहम्मद सागर म्हणाले की, आरक्षणाची मागणी करणाऱ्या जम्मूतील उजव्या विचारसरणीच्या गटांना पाठिंबा देऊन भाजपाने संविधानावर आणि माँ वैष्णोदेवीच्या पावित्र्यावरही आघात केला आहे. नेमका हा वाद काय आहे? भाजपाच्या भूमिकेने हा वाद कसा चिघळला? विरोधकांनी भाजपावर काय आरोप केले? जाणून घेऊयात…
प्रकरण काय?
श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी रद्द केली जावी या मागणीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनांनी जम्मू परिसरात आंदोलन केले. या मागणीचे कारण म्हणजे या प्रवेश घेतलेल्यांमध्ये ९० टक्के विद्यार्थी हे काश्मीर येथील मुस्लीम विद्यार्थी आहेत. भाजपाचे उधमपूर येथील आमदार आर. एस. पठानिया यांनी व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आंदोलनाचे समर्थन केले. वैष्णोदेवी मंदिराला देण्यात आलेली देणगी वापरून उभारलेल्या या इन्स्टिट्यूटमध्ये मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांचा दबदबा असू नये, हिंदुंसाठी जागा राखीव असल्या पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
जम्मू आणि काश्मीर बोर्ड ऑफ प्रोफेशनल एंट्रन्स एक्झामिनेशन (JKBOPEE)कडून वैष्णोदेवी मेडिकल इन्स्टिट्यूटसाठी ५० उमेदवारांच्या यादीला मंजुरी देण्यात आल्यानंतर आंदोलन सुरू झाले. या उमेदवारांमध्ये ४२ काश्मिरी आणि आठ जम्मूचे उमेदवार होते. त्यातील काश्मीरच्या ३६ जणांनी आधीच प्रवेश घेतला आहे आणि जम्मूच्याही तीन जणांनीही प्रवेश घेतला आहे.
विरोधकांची भाजपावर टीका
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व आमदार तन्वीर सादिक यांनी भाजपावर जम्मू-काश्मीरमधील शैक्षणिक संस्थांना श्रद्धेचे रणक्षेत्र केल्याचा आरोप केला. पक्षाचे मुख्य प्रवक्ते असलेले सादिक यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले, “तुम्ही एक टाइम बॉम्ब लावत आहात, जो एकदा फुटला की, अशी फूट पाडेल, जी कोणीही कधीही दुरुस्त करू शकणार नाही.” मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने ‘दरबार मूव्ह’ प्रथा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाच्या काही दिवसांतच हा वाद सुरू झाला आहे.
दरबार मूव्ह ही फार जुनी प्रथा आहे. त्यानुसार नागरी सचिवालयासह सरकारी कार्यालये दर सहा महिन्यांनी म्हणजेच उन्हाळ्यात राजधानी श्रीनगर आणि हिवाळ्यात राजधानी जम्मूमध्ये स्थलांतरित होत असत. लेफ्टनंट गव्हर्नर प्रशासनाने २०२१ मध्ये ही प्रथा रद्द केली होती. ‘दरबार मूव्ह’ सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने अब्दुल्ला सरकारला भाजपाच्या बालेकिल्ल्यात चांगली सहानुभूती मिळाली होती. मात्र, आताचा हा नवा वाद जम्मूतील हिंदू-मुस्लीम विभाजनाला खतपाणी घालण्याची शक्यता आहे.
या वादावर भाजपाची भूमिका काय?
भाजपाने आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, देशभरातील हिंदू भाविक वैष्णो देवी ट्रस्टला दान करतात. हेच ट्रस्ट जम्मूच्या रियासी जिल्ह्यात श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स चालवते. या देणग्यांचा एकमेव उद्देश सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे. यंदा या संस्थेत एमबीबीएस विद्यार्थ्यांची पहिली बॅच दाखल झाली. जम्मू-काश्मीर बोर्ड ऑफ प्रोफेशनल एन्ट्रन्स एक्झाम्सने दिलेल्या अधिसूचनेनुसार, गुणवत्ता यादीनुसार ५० पैकी ४२ जागा मुस्लीम विद्यार्थ्यांना मिळाल्या, ज्यापैकी बहुतेक जण काश्मीरमधील आहेत.
संस्थेतील प्रवेश राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियंत्रित होतात. त्यानुसार ८५ टक्के जागा जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत, तर उर्वरित १५ टक्के जागा देशातील इतर उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. भाजपा नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने रविवारी (२३ नोव्हेंबर) संध्याकाळी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि या जागा केवळ हिंदू विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली. या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा करीत होते.
शर्मा म्हणाले, “हे आम्हाला मान्य नाही. येथे इतर धर्मांचे विद्यार्थी आणि लोक असणे देणगीदार आणि मंदिर मंडळासाठी चांगले ठरणार नाही. त्यामुळे आम्ही लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती केली आहे की, केवळ माता वैष्णोदेवीवर श्रद्धा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावा.” त्यांनी असा दावा केला की, जम्मू-काश्मीर प्रशासनातील ज्या अधिकाऱ्यांची त्यांनी या विषयावर भेट घेतली, त्या सर्वांनी या जागा केवळ हिंदू विद्यार्थ्यांसाठी राखीव असाव्यात यावर सहमती दर्शवली आहे. ते पुढे म्हणाले, “आम्हाला सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले आहे.”
विद्यालयातील प्रवेशावरून आंदोलन
गेल्या आठवड्यात राष्ट्रीय बजरंग दल वैद्यकीय संस्थेच्या रियासी कॅम्पसमध्ये घुसल्यानंतर हा वाद उफाळून आला. त्या वादात त्यांच्याबरोबर विश्व हिंदू परिषद आणि इतर संघ परिवाराशी संबंधित संघटनाही सामील झाल्या. त्यांनी मुस्लीम विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याच्या मागणीसाठी वैष्णोदेवी मंदिर मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा पुतळा जाळला. २०१४ पासून जम्मू भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यावेळी पक्षाने या प्रदेशातील लोकसभेच्या जागा जिंकल्या आणि भाजपा जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत २५ जागांसह तो दुसरा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला.
