शिवसेनेत फूट पाडून सरकार स्थापन केलेला शिंदे गट आणि भाजपाचा राज्यातील संसार सुखनैव सुरु असल्याचे वरकरणी दिसत आहे. दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेतृत्वांकडूनही सारे काही आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील स्थिती याउलट असल्याची प्रचिती येत आहे. भाजपाचे खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी ओल्या दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मालेगाव येथे नुकत्याच घेतलेल्या बैठकीत शिंदे गटाचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्यावर ज्या पध्दतीने टिकास्त्र सोडले गेले, ते पाहाता या दोन्ही पक्षांमध्ये टोकाचा विरोध असल्याचेच अधोरेखित होत आहे.

हेही वाचा- शशी थरूरांचे ठरले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, अनेकांचा पाठिंबा असल्याचा दावा

ओल्या दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी बैठक

सतत तीन-चार वर्षे कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर गेली तीन वर्षे मालेगाव आणि आसपासच्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे संकट झेलावे लागत आहे. यावर्षी तर त्याची भीषणता तुलनेने अधिकच आहे. असे असले तरी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देताना शासनाने हात आखडता घेतल्याचा आक्षेप घेतला जात आहे. यंदा या भरपाईसाठी तालुक्यातील केवळ २२ गावांना पात्र ठरविले गेले. त्यामुळे वंचित ठरलेल्या अन्य गावांमधील शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, असा आग्रह त्यांच्याकडून धरला जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीस भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, युवा नेते अद्वय हिरे, महापालिकेतील भाजपाचे माजी गटनेते सुनील गायकवाड यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे खातेप्रमुख, शेतकरी प्रतिनिधी, भाजपाचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी प्रांताधिकारी डाॅ. विजयानंद शर्मा हे स्वागताची औपचारिकता म्हणून डाॅ. भामरे यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी पुढे सरसावले. परंतु, अतिवृष्टीमुळे शेतकरी दु:खात असताना तुम्ही माझा सत्कार कसा करता, असा उद्वेग प्रकट करत हा सत्कार त्यांनी नाकारला. त्यावरुन या बैठकीचा रोख कसा असेल, याची सुरुवातीलाच उपस्थितांना झलक पाहावयास मिळाली.

हेही वाचा- मुख्यमंत्री पुत्रामुळे चव्हाणांचे ठाण्याचे पालकमंत्री पद हुकले ?

खासदार संतापतात तेव्हा..

अतिवृष्टीमुळे पिकांची कशी दाणादाण उडाली आणि सरकारी यंत्रणा कशी बेफिकीर आहे, याबद्दलचा पाढा बैठकीस उपस्थित शेतकरी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी वाचला. पीक विमा कंपन्यांच्या नाकर्तेपणावरही अनेकांनी बोट ठेवले. अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पंचनाम्यासंदर्भात महसूल, तालुका पंचायत समिती आणि कृषी खाते या तीन यंत्रणा प्रामुख्याने जबाबदार असतात. परंतु, ज्या पंचायत समितीत ही बैठक पार पडली, त्या कार्यालयाचे प्रमुख असलेले गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे हेच बैठकीस अनुपस्थित होते. ते वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याची माहिती दिली गेली. स्वत: डाॅक्टर असलेल्या भामरे यांचे त्यामुळे समाधान होऊ शकले नाही. बैठकीस उपस्थित रहावे लागू नये, म्हणून देवरे हे मुद्दाम रजेवर गेल्याचा ठपका ठेवत भामरे यांनी संताप व्यक्त केला. या आजारपणाची चौकशी करुन गटविकास अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना केली.

हेही वाचा- नाशिकमध्ये पक्षांतराचे नव्याने वारे

मालेगावमधील सर्व वरिष्ठ अधिकारी मंत्री दादा भुसे यांच्या तालावर नाचतात. म्हणूनच ते पदोपदी आमची अवहेलना करतात, असा सूर लावत भाजपाच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मनातील खदखद यावेळी बोलून दाखवली. अधिकाऱ्यांच्या वर्तनावरुन मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाचे मंत्री भुसे हे भाजपाकडून ठळकपणे ‘लक्ष्य’ केले गेल्याने दुष्काळाच्या विषयावरील ही बैठक चांगलीच गाजली. राज्याच्या सत्तेत आता कुणाची हुकूमत चालते याची अधिकाऱ्यांनी खूणगाठ बांधून घ्यावी आणि यापूढे दुजाभाव करणे टाळावे, असा सल्ला देत मालेगावमधील नाठाळ अधिकाऱ्यांचा लवकरच करेक्ट कार्यक्रम केला जाईल, अशा आशयाचा गर्भित इशारा भाजपा नेत्यांकडून देण्यात आला. राज्याच्या सत्तेत एकत्र नांदणाऱ्या भाजपा आणि शिंदे गटाचे स्थानिक पातळीवरील संबंध किती ‘मधुर’ आहेत, यावर बैठकीच्या निमित्ताने जणू काही शिक्कामोर्तब झाल्याचे पाहावयास मिळाले.