पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पराभूत केल्यानंतर भाजपने आता अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्याला वेढा देण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने अजित पवार यांच्या शिलेदारांना हेरून एकेक तालुक्यावर कब्जा करण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे.
काँग्रेसचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे या काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या दोन तालुक्यांवर शिरकाव केल्यानंतर आता अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना प्रवेश देऊन आणखी दोन तालुक्यांमध्ये भाजपने चंचुप्रवेश केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज, बुधवारी (२१ जानेवारी) अंतिम मुदत आहे. बंडखोरी रोखण्यासाठी इच्छुक उमेदवारांना आज पक्षाचे ‘एबी’ अर्ज दिले जाणार आहेत.
पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवार यांची अनेक वर्षांपासून सत्ता आहे. तसेच पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असताना, अजित पवार यांनीही अन्य पक्षांना बरोबर घेत निवडणुका लढण्याची जुळणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जुन्नर, खेड आणि शिरूर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येऊन ‘घड्याळ’ चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाबरोबर आघाडी केली जाणार आहे.
अजित पवार यांच्याकडून बेरजेचे राजकारण करण्यात येत असताना भाजपने पवार यांची कोंडी करण्यासाठी त्यांचे जवळचे साथीदार फोडण्यास सुरुवात केली आहे.
इंदापूरच्या राजकारणाला वळण
नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारल्याने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’च्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’तर्फे निवडणूक लढविणारे प्रदीप गारटकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. गारटकर यांच्या साथीला भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण माने हे आहेत.
या ठिकाणी अजित पवार यांचे विश्वासू साथीदार राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून या पक्षात प्रवेश केला. नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार भरत शहा रोखण्यासाठी हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे एकत्र आले. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गारटकर आणि माने हे बरोबर असून, दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र निवडणूक लढविणार असल्याने हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार यांच्याबरोबर काम करावे लागण्याची शक्यता आहे. दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय वैर आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोघांचे मनोमीलन झाल्यास इंदापूरच्या राजकारणाला वेगळे वळण लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
५० वर्षांचा राजकीय वारसा असलेले शिरुरमधील गावडे कुटुंब भाजपमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेच्या टाकळी हाजी गटावर गेल्या ६४ वर्षांपासून गावडे कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. तसेच सलग सुमारे ५० वर्षे जिल्हा परिषदेत या कुटुंबाने प्रतिनिधित्व केले आहे. राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिरूरच्या राजकारणातील समीकरणे बदलली आहेत.
