आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : खुलताबाद पंचायत समितीत भाजपाने ठाकरे गटाशी हातमिळवणी करून सत्तास्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने संताप व्यक्त केला… रायगड जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकूनही अध्यक्षपदावरून दूर राहावे लागल्याने महायुतीत शिंदे गटाची फरफट होत असल्याची चर्चा रंगली… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगात कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिली नसल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली… विधान भवन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा अमेरिका व इराण यांच्यातील युद्धाशी काही संबंध आहे का? असा प्रश्न काँग्रेसच्या आमदाराने विधानसभेत उपस्थित केला… काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहित टिळक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक करताना लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती माध्यमांना दिली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

भाजपा-ठाकरे गटाच्या युतीवर राष्ट्रवादीचा संताप

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने थेट ठाकरे गटाशी हातमिळवणी केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपावर टीकेची झोड उठवली. भाजपाने पंचायत समितीच्या सत्तेतून राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचे काम केले आहे. भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी आमच्याशी कुठलीही चर्चा न करता हा निर्णय घेतला. आम्ही काय बांगड्या घालून बसलो नाही आणि याचे उत्तर त्यांना नक्कीच दिले जाईल, असा संताप आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला. खुलताबाद पंचायत समितीत भाजपाकडे सभापतीपद तर राष्ट्रवादीकडे उपसभापतीपद येणार होते. मात्र आमदार प्रशांत बंब यांनी ऐनवेळी ठाकरे गटाला हाताशी धरून पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी बंब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला उपसभापती पद दिले. त्यावरून आमदार सतीश चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

महायुतीत शिवसेना शिंदे गटाची फरफट?

सगळ्यांचेच लक्ष लागून असलेल्या रायगड जिल्हा परिषदेचा अखेर तिढा सुटला आहे. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदासंदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. याच बैठकीत रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीने एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, भाजपाला अध्यक्षपद तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार आहे. दुसरीकडे सत्तेत सहभागी असूनही शिवसेना शिंदे गटाला अध्यक्ष व उपाध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले होते. त्यानंतर मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अध्यक्षपदावर आपापल्या पक्षाचा दावा सांगितला होता. यादरम्यान शिंदे गटाला अध्यक्षपदावरून दूर ठेवल्याने महायुतीत शिंदे गटाची फरफट होत असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आणखी वाचा : १५ दिवस उलटले, तरीही भाजपा आमदाराचे पार्थिव शवागृहातच; अंत्यविधी न होण्याचे कारण काय?

संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगात कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिली नसल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना केली. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे देशात घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतही गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून राऊत यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. फक्त जय श्रीराम सिलेंडर म्हणा, घरपोच सिलेंडर मिळणार. नमो नमो हा मंत्र जपल्यास पेट्रोल आणि डिझेलही दारात येणार असा चिमटा त्यांनी काढला. आपल्या देशात अंधभक्ती पराकोटीला गेल्याचे राऊत म्हणाले. देशात गॅस टंचाईचे संकट असताना पंतप्रधान मोदी मात्र केरळ, तमिळनाडू आणि आसाममध्ये निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहे. त्यांना या जगात कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिली नसल्याची खोचक टीकाही राऊत यांनी केली.

विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सध्या अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा या धमकीशी सबंध आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यादरम्यान धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला? त्यामागे कोणाचा हात आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर अशा महत्त्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याच्या धमक्या येत असतील, तर हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे का? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले माजी राष्ट्रपतींचे नाव भाजपाने हटवले; कोण होते फखरुद्दीन अली अहमद?

काँग्रेसचा नेता शिंदे गटात प्रवेश करणार

काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहित टिळक माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. लवकरच आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. एकनाथ शिंदे हे सर्वांना ताकद देणारे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेते असल्याचे टिळक यांनी म्हटले आहे. शिंदे यांना आपण जेव्हा-जेव्हा भेटलो, तेव्हा आमच्यात कधीच राजकीय चर्चा झाली नाही. लोकमान्य टिळक संस्थेचे काम आणि आजोबा जयंतराव टिळक यांच्याविषयीच आमच्यात अधिक चर्चा व्हायची. आमच्या पक्षात या किंवा पक्ष फोडाफोडीच्या चर्चा कधीच झाल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित टिळक हे मागील तीन वर्षांपासून काँग्रेसपासून काहीसे अलिप्त होते. टिळक स्मारक ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आल्यानंतर काँग्रेसने आपल्याला दूर ठेवले, असा आरोपही त्यांनी केला. या घडामोडींमुळेच आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.