आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : ठाकरे गट व भाजपातील संघर्ष टोकाला गेला असताना रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील दोन्ही पक्षाच्या छुप्या युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली… महाराष्ट्र सदन व तळोजा गृहप्रकल्प गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने क्लीन चीट दिल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली… शिंदे गटात खांदेपालटाचे संकेत मिळत असून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन मुंबईत शिवसेनेचा महापौर करावा, अशी साद ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी घातली… मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाची एकहाती सत्तास्थापनेची खेळी फोल ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरे गट आणि भाजपात छुपी युती?
महापालिका निवडणुकांचा गुलाल फिका पडताच राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात एकीकडे ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा संघर्ष टोकाला गेला असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र दोन्ही पक्षांतील युतीच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. दापोली तालुक्यात भाजपासह ठाकरे गट व अजित पवार गटात छुपी युती झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दापोली तालुक्यातील हर्णै व पालगड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने उमेदवार दिले आहेत, तर केळशी व कोळबांद्रे या दोन गटांत ठाकरे गटाने उमेदवार उभे केले आहेत. त्याशिवाय जालगाव व दाभोळ येथे भाजपाने थेट लढत दिली आहे. या विभागणीमुळे ही लढत एकमेकांविरुद्ध नसून एकमेकांसाठीच आहे का? असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपाशी काडीमोड घेऊन शिंदेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने त्यांना पराभूत करण्यासाठीच ही युती असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.
गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद जाणार?
शिवसेना शिंदे गटात खांदेपालटाचे संकेत मिळत असून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. महापालिका निवडणुकीतही भाजपाने आपल्या मित्रपक्षांना कित्येक पटीने मागे टाकले. त्या तुलनेत शिंदे गटाला समाधानकारक यश मिळाले असले तरीही त्यांना अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी राज्यातील काही महत्त्वाच्या नगर परिषदांमध्ये आणि महापालिकांच्या अनेक प्रभागांमध्ये शिंदे गटाची कामगिरी मर्यादित राहिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल खासकरून शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटात खांदेपालटाचे संकेत मिळत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान मंत्रिपदावरून काढले तरी मला काही फरक पडणार नाही. शेवटी ज्यांनी मंत्रिपद दिले त्यांना ते काढण्याचा अधिकार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा : अजित पवार भाजपाला नकोसे? महायुतीतील तणावात वाढ? नेमकं काय घडतंय?
कल्याण डोंबिवलीमधील गेम पालटणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाची एकहाती सत्तास्थापनेची खेळी फोल ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर बैठक पार पडेल. काहीही झाले तरी कल्याण डोंबिवली महापालिकेत एक हजार एक टक्के हा भाजपा-शिवसेना महायुतीचाच महापौर बसेल, असे नंदू परब म्हणाले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत युती म्हणून लढलेल्या भाजपा व शिंदे गटात महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. महापालिकेत भाजपाचे ५१ तर शिंदे गटाचे ५४ नगरसेवक निवडून आले आहेत. यादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा घेतल्याने शिंदे गटाने स्वबळावर सत्तास्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यातच नंदू परब यांनी केलेल्या या विधानामुळे कल्याण-डोंबिवलीतील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
छगन भुजबळ यांना ईडीकडून क्लीन चीट
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन व तळोजा गृहप्रकल्प गैरव्यवहार प्रकरणात भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणामध्ये आता भुजबळ यांची सुटका झाली आहे. याआधीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात भुजबळांना क्लीन चीट दिली होती. छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोखरक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप ईडीने केला होता. २०१६ मध्ये त्यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात भुजबळ यांना दोन वर्ष तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना क्लीन चीट दिली होती. यादरम्यान ईडीनेही क्लीन चीट दिल्यानंतर भुजबळ यांनी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे.
हेही वाचा : मी चहावाला ही तर मोदींची ड्रामेबाजी; काँग्रेस अध्यक्षांच्या विधानावर भाजपाचा संताप; नेमकं काय घडलं?
ठाकरेंना पाठिंबा देण्याची शिंदेंना मागणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन मुंबईत शिवसेनेचा महापौर करावा, अशी साद ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी घातली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी त्यांना हीच खरी श्रद्धांजली असेल, असेही भास्कर जाधव म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळा उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महापौरपदाबाबत मोठे विधान केले होते. देवाची इच्छा असेल तर आपला महापौर बसेल, असे ते म्हणाले होते. यादरम्यान महापौरपदाबाबत राजकीय वर्तुळात हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या नेत्यांकडून देण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन शिवसेनेचा महापौर करावा, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
