नागपूर जिल्हा परिषदेत निधी अडवून भाजपने केली सत्ताधारी काँग्रेसची कोंडी | BJP uphold a dilemma for the ruling Congress with holding funds in Nagpur Zilla Parishad | Loksatta

नागपूर जिल्हा परिषदेत निधी अडवून भाजपने केली सत्ताधारी काँग्रेसची कोंडी

सुमारे ७०० कोटी रुपयांच्या कामांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस अवस्थ आहे. निधीच नसेल तर सत्तेचा उपयोग काय? असा स्वाभाविक प्रश्न नेत्यांना पडला.

नागपूर जिल्हा परिषदेत निधी अडवून भाजपने केली सत्ताधारी काँग्रेसची कोंडी
नागपूर जिल्हा परिषदेत निधी अडवून भाजपने केली सत्ताधारी काँग्रेसची कोंडी ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

राजेश्वर ठाकरे

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची अवस्था सत्ता आहे पण पैसा नाही, अशी झाली आहे.

महाविकास आघाडी सरकार उलथवून शिंदे-फडणवीस सरकार आले. या सरकारने महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या योजनांना स्थगिती दिली. प्रत्येक विभागाला पूर्वपरवानगीशिवाय निधी खर्च करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचा फटका नागपूर जिल्ह्यातील विकासकामांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रस्ते दुरुस्ती, सिंचन, आरोग्य असो वा इतर कामे ठप्प पडली आहेत. महिला व बाल कल्याण खात्याचा मंजूर तीन टक्के निधी खर्च करण्यास पूर्वपरवानगी हवी आहे. अशाप्रकारे सुमारे ७०० कोटी रुपयांच्या कामांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस अवस्थ आहे. निधीच नसेल तर सत्तेचा उपयोग काय? असा स्वाभाविक प्रश्न नेत्यांना पडला. या विरोधात काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांनी आंदोलन करून शिंदे-भाजप सरकारचा निषेध केला. जिल्हा नियोजन समितीमधील तीन टक्के निधी महिला व बाल कल्याण विभागाला मिळतो. या निधीला मंजुरी देखील आहे. पण त्या खर्चाला देखील पूर्वपरवानगी घेण्याचे बंधन टाकण्यात आले. गेल्या पाच महिन्यांपासून निधी खर्च झालेला नाही आणि ३१ मार्चपर्यंत तो खर्च करायचा आहे. पण तो भाजपच्या जनता विरोधी राजकारणामुळे होऊ शकत नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजनमधील निधी खर्च केला जातो. त्यामुळे नागपूर जिल्ह्याला वाढीव निधी मिळणे आणि वेगाने विकास होण्याची अपेक्षा आहे. पण तसे घडत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेत निधी खर्चास स्थगिती देऊन भाजपने काँग्रेसची कोंडी केली आहे.

हेही वाचा… अभिजीत फाळके : विधायक कामातून राजकारणात

निधीअभावी वर्गखोली बांधकाम, रुग्णवाहिका खरेदी, पौष्टिक आहार पुरवठा यासारख्या बाबी देखील उपलब्ध होऊ शकत नसल्याने कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता भरडली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी ७०० कोटी रुपयांच्या विकासकामांना दिलेली स्थगितीमागे घ्यावी, अशी मागणी नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:21 IST
Next Story
अभिजीत फाळके : विधायक कामातून राजकारणात