scorecardresearch

Premium

भाजपाचे ‘मिशन ओडिशा’ सुरू; BJD चे मैत्रीपूर्ण संबंध बाजूला सारत २०२४ ची निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २६ मार्च रोजी ओडिशा राज्यातील भद्रक या ठिकाणी भेट देणार आहेत. याठिकाणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा द्वितीय क्रमाकांवर होता.

Amit Shah in Odisha
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सदासर्वकाळ निवडणुकांच्या तयारीत असलेला पक्ष म्हणून भाजपाकडे पाहिले जाते. निवडणूकांचे योग्य नियोजन, उमेदवारांची निवड आणि मतदारसंघातील प्रश्नांवर वेळीच लक्ष घालत निवडणूक जिंकण्याकडे भाजपाचा कल असतो. ओडिशा राज्यात पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने आतापासूनच निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ मार्च रोजी ओडिशा राज्यातील भद्रक लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून २०२४ च्या निवडणुकीची पायाभरणी करण्यात येईल. तसेच आतापर्यंत सत्ताधारी असलेल्या बिजू जनता दलासोबत (BJD) असणारे सौहार्दपूर्ण संबंध बाजूला सारत निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती भाजपा नेत्यांनी दिली.

भाजपाच्या लोकसभा प्रवास कार्यक्रमातंर्गत अमित शहांच्या रॅलीसाठी ओडिशाचा किनारपट्टीला लागून असलेला हा मतदारसंघ निवडण्यात आला आहे. पश्चिम ओडिशामध्ये भाजपाचा जनाधार असून याठिकाणी २०१९ मध्ये भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या. ओडिशातील भाजपा नेत्यांनी सांगितले की, भद्रक लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या धामनगर विधानसभा मतदारसंघात अमित शहा यांची जाहीर सभा होईल. तसेच याचठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठकही होईल. तसेच भद्रक मधील अराडी येथे असलेल्या प्रसिद्ध अखंडलामणी या भगवान शिवाच्या मंदिरालाही शहा भेट देणार आहेत.

jp nadda
भाजपच्या निवडणूक तयारीला वेग; केंद्रीय मंत्र्यांचे क्लस्टर दौरे, संघटनात्मक नियोजनाचा आढावा
IPL 2024 and Loksabha Election 2024
IPL 2024 : लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएलचं अर्धच वेळापत्रक जाहीर, उर्वरित सामने कधी होणार?
gadchiroli bjp marathi news, bjp leaders, lok sabha ticket
गडचिरोली लोकसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये अंतर्गत कुरघोड्या; आमदारांपाठोपाठ माजी मंत्र्याच्या भावाचाही दावा
karnataka Chief Minister Siddaramaiah
कर्नाटक अन् केरळवरील अन्यायाच्या आरोपातून काँग्रेसचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन, भाजपच्या खासदारांनाही सहभागी होण्याची विनंती

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात धामनगर येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अविमन्यू सेठी (Avimanyu Sethi) यांचा अवघ्या २८, ८०३ मतांनी बिजू जनता दलाच्या (BJD) मंजुलता मंडळ यांच्याकडून पराभव झाला होता. भद्रक लोकसभेत येणाऱ्या सात विधानसभा मतदारसंघापैकी भाजपाकडे सध्या फक्त धामनगर ही एकच विधानसभेची जागा आहे.

हे वाचा >> आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ओडिशा सरकारचा मोठा निर्णय; २२ जातींचा SEBC यादीत समावेश; राजकीय फायदा होणार?

आपला दौरा आटोपून दिल्लीला निघण्यापूर्वी अमित शहा हे भुवनेश्वरमधील भाजपाचे वरिष्ठ नेते, पक्षाचे खासदार व आमदार यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरविण्यात येईल, असे सांगितले जाते. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लेखश्री सामंतसिंघर यांनी सांगितले की, अमित शहा यांचा दौरा भाजपा कार्यकर्त्यांना बीजेडीविरोधात लढण्यासाठी नवे बळ देईल. त्यांचे पाठबळ कार्यकर्त्यांसाठी आवश्यक आहे.

अमित शाह यांची वर्षभरातली ही दुसरी भेट आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही त्यांनी ओडिशाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर आणि कटकमधील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जन्मस्थळाला भेट दिली होती. तसेच त्यादिवशी इतरही काही कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र या भेटीदरम्यान त्यांनी कोणतीही राजकीय बैठक घेतली नव्हती.

राज्यातील मुख्य विरोधी पक्षनेता असूनही केंद्रीय भाजपा नेतृत्वाने नवीन पटनायक यांच्या सरकारबाबत २०१९ पासून मवाळ भूमिका घेतलेली दिसते. त्याबदल्यात बीजेडीनेही अनेक अडचणीच्या प्रसंगात संसदेच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी केंद्र सरकारला पाठिंबा दिला. मात्र आता अमित शहा यांची २६ मार्च रोजीची भेट ही २०२४ च्या निवडणुकीच्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांना निर्णायक संदेश देणारे असेल, असे सांगितले जाते. ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबकिशोर दास यांची एका पोलीस कर्मचाऱ्यानेच हत्या केली. यावर अमित शहा काय बोलतात, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. याविषयावर नवीन पटनायक सरकारवर राज्य भाजपाने जोरदार हल्ला चढविला होता.

हे वाचा >> भाजपाची २०२४ लोकसभा निवडणुकीची ‘ब्लू प्रिंट’ तयार; मोदींच्या १०० सभा, दक्षिणेतील राज्ये आणि ओडिशा-बंगालवर विशेष लक्ष

ओडिशातील भाजपाच्या एका नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, बिजू जनता दलासोबत आता कोणतेही सौहार्दाचे संबंध ठेवले जाणार नाहीत. २०१९ पेक्षा २०२४ साठी पक्षाने वेगळे नियोजन केले आहे. दुसऱ्या एका नेत्याने सांगितले की, भाजपा यावेळी राज्यातील पटनायक यांच्या विरोधातील (anti-incumbency) जनमताचा वापर करेल. यासाठी वरिष्ठ नेत्यांनी तयारी केली आहे. २०१९ साली पक्षाने आठ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या, २०१४ साली तर एकच जागा जिंकली होती. २०१९ साली लोकसभेसोबतच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २२ जागा जिंकल्या होत्या.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल म्हणाले की, त्यांना ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेंलगणा राज्याचे प्रभारी बनविण्यात आले आहे. तेव्हापासून ते तीनही राज्यातील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेत असून पदाधिकाऱ्यांना नवीन कार्यक्रम देत आहेत. भाजपाच्या उत्तर प्रदेशातील विजयाचा शिल्पकार म्हणून सुनील बन्सल यांची ओळख आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी विधानसभा स्तरावरील नेत्यांसमवेत बैठक घेऊन स्थानिक नेत्यांना बुथ स्तराची तीन भागात वर्गीकरण करायला सांगितले. यापैकी मजबूत, मध्यम आणि कमकुवत अशा तीन गटात वर्गवारी करून प्रत्येक बुथसाठी समिती तयार करण्यास सांगितली.

आणखी वाचा >> ओडिशाच्या मंत्र्यांवर गोळी झाडणारा पोलिस कर्मचारी मानसिक रुग्ण; पत्नी म्हणाली, “त्यांना लगेच राग यायचा”

भाजपाने २०२४ साठी जास्तीत जागा जिंकण्याचे लक्ष्य तर ठेवले आहेच, त्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाने यावेळी लक्ष घातले आहे. ज्या विधानसभेत भाजपाचा पाच ते सात हजार मतांनी पराभव झालेला होता, अशा मतदारसंघात विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp victory strategy through amit shah visit to bhadrak set to turn heat on friendly bjd as polls near in odisha kvg

First published on: 14-03-2023 at 17:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×