महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद यश मिळवले. या विजयासह पक्षाने २०२९ च्या विधानसभा निवडणुकांसाठी ‘शत प्रतिशत भाजपा’ हे महत्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केल्याचे दिसते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ही रणनीती आखल्याचे चित्र आहे. राज्यातील पुढील मोठी निवडणूक सुमारे साडेतीन वर्षांवर असली तरीही पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना कठोर परिश्रम सुरू ठेवण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपामध्ये काम २४ तास चालते आणि इथे कोणताही विसावा नसतो. शहरी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमुळे आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते अधिक निर्धाराने मैदानात उतरतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

भाजपाचे नेमके ध्येय काय?

भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की- राज्यात स्वबळावर बहुमत मिळवण्याचे पक्षाचे ध्येय आव्हानात्मक असले तरीही अशक्य नाही. सध्या आमचा मतांचा वाटा २६–२७ टक्क्यांच्या आसपास आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी त्यात आणखी १० ते १५ टक्क्यांची वाढ करावी लागेल. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने २८८ पैकी १५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बहुमताचा आकडा १४५ आहे आणि सध्या आम्ही त्यापेक्षा केवळ १३ जागा दूर आहोत. मात्र हे लक्षात घ्यायला हवे की- भाजपाने महायुतीचा भाग म्हणून निवडणूक लढवली होती. स्वबळावर निवडणूक लढवल्यास गणिते बदलतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे पक्षाचा पाया आणखीनच भक्कम झाला आहे. आता हे यश आगामी विधानसभा निवडणुकीत मतांमध्ये रूपांतरित करणे हे खरे आव्हान आहे.

ग्रामीण मतदार भाजपाकडेच

गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाने आपली शहरी-केंद्रित प्रतिमा पुसून टाकली आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांच्या अनेक बालेकिल्ल्यांमध्ये भाजपाने शिकराव केल्याचे दिसून येत आहे. राज्यातील २८८ पैकी एकूण १६० विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागातील आहे. सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपा १२ पैकी सहा जिल्हा परिषदांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला. सिंधुदुर्ग (कोकण), सातारा (पश्चिम महाराष्ट्र), सोलापूर (दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र), परभणी (मराठवाडा), धाराशिव (मराठवाडा) आणि छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) जिल्हा परिषदेत भाजपाचाच अध्यक्ष होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

आणखी वाचा : ठाकरे गटाच्या पाठिंब्याने भाजपाचा महापौर; शिंदेंच्या शिवसेनेत सुप्त संघर्षाच्या ठिणग्या, काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

पंचायत समित्यांमध्येही भाजपाला यश

पंचायत समितीच्या निकालांमध्येही भाजपाचेच वर्चस्व दिसून आले. १२५ पैकी ५५ पंचायत समित्यांमध्ये पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुक्रमे २६ आणि २५ जागा जिंकल्या. दुसरीकडे- विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना प्रत्येकी केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले; तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ तीनच जागांवर विजय मिळवता आला.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाला निर्विवाद यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्रासह राज्य सरकारने केलेल्या विकासकामांना जनतेने कौल दिला आहे. हा प्रतिसाद आहे. विरोधकांमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता आणि ते जनतेपासून तुटल्यासारखे वाटत होते. तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडण्यात ते अपयशी ठरले आणि यामुळे भाजपाचा विजय सुखकर झाला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यादरम्यान राज्यातील ३५५ तालुके आणि सुमारे २८ हजार गावांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि बूथस्तरीय यंत्रणेला जवळपास एक लाख बूथवर प्रत्येकी ५० टक्के मते मिळवण्याचे लक्ष्य देण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपाची शतप्रतिशतकडे वाटचाल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच आव्हानात्मक होत्या. कारण- विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळूनही ग्रामीण भागात पक्षाला चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. याआधीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासातून हेच दिसून येते, असे भाजपामधील एका अंतर्गत सूत्राने सांगितले. महाराष्ट्रात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवण्याची भाजपाची संकल्पना प्रथम २००५ मध्ये मांडण्यात आली होती. अविभाजित शिवसेनेसोबत युती करून राज्यात पहिल्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर जवळपास १० वर्षांनी ही मागणी जोर धरू लागली होती. मात्र, राज्याच्या ग्रामीण भागावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या असलेल्या वर्चस्वामुळे हे स्वप्न अपुरे राहिले होते, असेही या सूत्राने सांगितले.

हेही वाचा : लोकसभा अध्यक्षांना पदावरून कसे हटवता येते? ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव कशासाठी?

शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीचा भाजपाला फायदा

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपाने आपला जनाधार सातत्याने वाढवला आहे. राज्यातील बदलत्या आघाड्या आणि राजकीय परिस्थिती असूनही २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये पक्षाने अनुक्रमे १२२, १०५ आणि १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. यादरम्यान एकसंध शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीचाही भाजपाला मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाबरोबरची युती तोडून उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील झाले. त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आणि म्हणूनच जनतेने त्यांना नाकारले, असे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यातील मराठा नेतृत्वावर शरद पवार यांची असलेली पकड ढासळली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) केवळ सांगली जिल्हा परिषदेतच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांची पकड फक्त पुणे आणि कोल्हापूर या दोनच जिल्हा परिषदांपुरती मर्यादित राहिली आहे, असेही एका सूत्राने सांगितले.