Tripura student killing डेहराडूनमध्ये वर्णद्वेषातून एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या हत्येने संपूर्ण देशाला हादरवले आहे. त्रिपुरातील अँजेल चकमा असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मुख्य म्हणजे हत्या केल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांनी मद्य खरेदी करून पार्टी केल्याचीही माहिती समोर आली आहे. अँजेल चकमाच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे; तर एक आरोपी फरारी आहे.
तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीत, तर दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. आता या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावरून भाजपा-काँग्रेसमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. काय आहे नेमके प्रकरण? भाजपा-काँग्रेसमध्ये संघर्ष का पेटला? जाणून घेऊयात…
राजकारण का तापले?
त्रिपुरातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून भारतीय जनता पार्टीने (भाजपा) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. पक्षाच्या वरिष्ठांवर अहंकार आणि ‘कॅज्युअल रेसिझम’चा (वर्णद्वेष) आरोप भाजपाने केला आहे. त्रिपुरातील २९ वर्षीय अँजेल चकमा हा एमबीएच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. डेहराडूनमध्ये झालेल्या वांशिक चाकूहल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. अनेक राजकारण्यांनी या वांशिक हल्ल्याचा निषेध केला असून, उत्तराखंड प्रशासनाला आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केला आणि सत्ताधारी भाजपाच्या द्वेष पसरवणाऱ्या नेत्यांमुळे अशा घटना सामान्य झाल्याचा आरोप केला. त्यांनी ‘एक्स’वर म्हटले, “द्वेष रातोरात निर्माण होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दररोज द्वेषपूर्ण मजकूर आणि बेजबाबदार कथनांमुळे अशा घटना घडत आहेत. सत्ताधारी भाजपाच्या द्वेष पसरवणाऱ्या नेतृत्वामुळे हे आता सामान्य झाले आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारत हा आदर आणि एकतेवर आधारलेला आहे; भीती आणि छळावर नाही. आपला देश प्रेम आणि विविधतेचा देश आहे. आपल्या सहकारी भारतीयांना लक्ष्य केले जात असताना आपण मूक प्रेक्षक बनू नये. आपला देश कोणत्या दिशेला चालला आहे याचा आपण विचार करायला हवा. माझ्या संवेदना चकमा कुटुंब आणि त्रिपुरा व ईशान्य भारतातील जनतेबरोबर आहेत.”
राहुल गांधींना भाजपाचे प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी स्पष्ट केले की, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मृत विद्यार्थ्याचे वडील तरुण प्रसाद चकमा यांच्याशी वैयक्तिकरीत्या संवाद साधला आहे. पाच संशयितांना अटक करून, जलद कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. ते म्हणाले, “आता याची तुलना तुमच्या इकोसिस्टीमशी करा. तुमचे राजकीय मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांनी ईशान्येतील लोकांना ‘चिनी’ म्हणून हिणवले होते. त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही, कोणतीही सुधारणा नाही आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातून केवळ अहंकार आणि वांशिक द्वेषच पाहायला मिळतो.”
हे विधान पित्रोदा यांनी गेल्या वर्षी केलेल्या धक्कादायक वक्तव्याच्या संदर्भात होते. राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेल्या पित्रोदा यांनी म्हटले होते की, पूर्व भारतातील लोक चिनी दिसतात आणि दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन दिसतात. या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता.
विद्यार्थ्याच्या वडिलांची आर्त हाक
डेहराडूनमधील वांशिक हल्ल्यात प्राण गमावलेल्या अँजेल चकमाच्या वडिलांनी प्रशासनाला प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ईशान्येतील इतर कोणत्याही व्यक्तीला अशा प्रसंगातून जावे लागू नये, अशी त्यांची मागणी आहे. ‘CNN-News18’शी बोलताना तरुण प्रसाद चकमा म्हणाले की, त्यांच्या मुलाला वांशिक शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली आणि चाकूने वारंवार वार केले गेले.
त्यांनी सांगितले की, अँजेल भाजी आणायला गेला असताना ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर वर्णद्वेषी टीका केली आणि त्याने विरोध केल्यावर त्याला मारहाण करण्यात आली. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि मुख्यमंत्री धामी यांना डेहराडूनमध्ये राहणाऱ्या ईशान्येतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री देण्याची विनंती केली. “ईशान्येतील इतर कोणत्याही मुलाला किंवा विद्यार्थ्याला हे भोगावे लागू नये, अशी माझी इच्छा आहे,” असे तरुण म्हणाले.
अँजेलबरोबर नक्की काय घडले?
त्रिपुराच्या उनाकोटी जिल्ह्यातील २९ वर्षीय अँजेल व त्याचा भाऊ मायकेल यांना ९ डिसेंबर रोजी डेहराडूनच्या स्थानिक बाजारात अडवण्यात आले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्या टोळीने या भावांना चिनी म्हटले. अँजेलने शांतपणे त्याला उत्तर दिले, “आम्ही चिनी नाही, आम्ही भारतीय आहोत. हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणते प्रमाणपत्र दाखवावे लागेल?” त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि आरोपींनी चाकूने हल्ला केला.
अँजेलच्या मानेला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा भाऊ मायकेलदेखील जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी अँजेलचा मृतदेह आगरतळा येथे नेण्यात आला. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण त्रिपुरासह ईशान्य भारतात संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे. उत्तराखंड पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यापैकी एक आरोपी नेपाळला पळून गेल्याचे समजते.
