अमरावती : भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या महापालिका निवडणुकीतील भूमिकेमुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि सोबतच मतदारांचाही गोंधळ उडाला आहे. काही प्रभागांमध्ये त्या आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताहेत. तेही भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य अजूनही त्यांना आहे. पराभवासाठी जे लोक कारणीभूत ठरले, त्यांना धडा शिकवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. सूड उगवण्यासाठी या निवडणुकीच्या संधीचा वापर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
महापालिकेच्या दोन प्रभागातील निवडणूक सध्या चर्चेत आहे. साईनगर प्रभागातून माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय हे भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत. विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांचे ते बंधू आहेत. त्यांनी रवी राणांच्या विरोधात अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. म्हणून राणा दाम्पत्याचा त्यांच्यावर राग. त्याआधीही दोघांमध्ये खटके उडालेले. राणांनी त्यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार उभा केला. इथपर्यंत ठिक होते. पण, जेव्हा नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडला, तेव्हा अनेक जण आश्चर्यचकित झाले. सूडचक्राची ही सुरूवात होती.
नंतर विलासनगर-मोरबाग प्रभागात त्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी पोहचल्या. भाजपच्या एका उमेदवाराला वगळून इतर तीन उमेदवारांना त्यांनी त्या ठिकाणी बोलावले. तीन ठिकाणी भाजपच्या आणि एका ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन नवनीत राणांनी केले. तेव्हा मतदारही संभ्रमित झाले.
खोडकेंना पाठिंबा दिल्याची शिक्षा
विधानसभा निवडणुकीत अमरावतीची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटलेली. त्यामुळे नैसर्गिक युतीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोडकेंना मदत करण्याचा स्वाभाविक प्रयत्न. पण, खोडकेंना पराभूत करा, असा दबाव आपल्यावर राणांनी आणला, असा आरोपच भाजपचे उमेदवार राजेश साहू यांनी केला. खोडकेंना पाठिंबा दिल्याची शिक्षा म्हणून राणांनी आपला विरोध चालवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विलासनगर प्रभागातून राणा यांना मिळालेली सर्वाधिक मते फलकांवर प्रदर्शित करून त्यांनी ‘हेचि फळ काय मम तपाला!’ असा प्रश्न साहूंनी विचारला आहे.
राणांचा हट्ट कायम
भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत युवा स्वाभिमान पक्षासोबत युती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी नऊ जागा सोडण्याची तयारी होती. पण, राणांनी अचानकपणे ४१ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने भाजपची गोची झाली. आता भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. राणांनी तीसहून अधिक जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधातच युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत. भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी दसरा मैदान येथील सभेत जुने विसरून जा, भगव्यामध्ये फूट पाडू नका, असा सल्ला नवनीत राणा यांनी दिला खरा, पण राणा ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. मी भगव्याशी निष्ठावंत आहे, मला निष्ठा कुणी शिकवू नये, असे सुनावले. ‘कमळा’शी गद्दारी करणाऱ्यांना मी सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. आता भाजपचे नेतेही हतबल झाले आहेत. त्यांना आता मूग गिळून राहण्याखेरीज उपाय नाही.
