पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बरोबर घेतल्याने भाजपची विश्वासार्हता कमी झाली असून, महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांना महायुतीपासून तात्पुरते वेगळे होऊन स्वतंत्र निवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे सोमवारी केला. निवडणूक स्वतंत्र लढविल्यानंतर भाजप आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील, असेही त्यांनी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. या वेळी संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आणि सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते. पाटील म्हणाले, की विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचे षड्यंत्रही सुरू आहे. अजित पवार यांना बरोबर घेतल्याने भाजपची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक अजित पवार यांनी स्वतंत्र लढवावी, असे त्यांना कदाचित सांगितले जाऊ शकते. देशात, राज्यात भाजपची लोकप्रियता कमी झाल्याने सध्या तुम्ही लांब राहा, निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ, असे अजित पवार यांना सांगितले जाईल.

हेही वाचा >>> इम्तियाज जलील यांच्यासह पाच उमेदवारांची एमआयएमकडून घोषणा, मतदारसंघाचा संभ्रम कायम

सरकारला खुर्ची लाडकी झाली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील की नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, पैशांची खरी गरज कोणाला आहे, हे न ओळखता सरकसट निधीचे वाटप सुरू आहे. हा सर्व प्रकार निवडणुकीपुरताच आहे, असे सत्ताधारी पक्षाचे आमदारच सांगत आहेत. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यास ज्यांना आवश्यकता आहे, त्यांनाच मदत केली जाईल. मदतीची रक्कमही कदाचित वाढविण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

छगन भुजबळांकडून पाठराखण

नाशिक : अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढवतील. ते आमचे कर्णधार असल्याने मधेच शस्त्र टाकणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री भुजबळ यांनी, महायुतीला आगामी निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर एकमेकांवर टीका करू नका, असा सल्ला दिला. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. निवडणुकीत प्रचारासाठी आम्हांला जे नेते हवे आहेत, त्यांना आम्ही बोलवणार आहोत, असे भुजबळ यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेसाठी अन्य योजनांचे पैसे अडवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. वास्तविक काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असतांनाही काही योजनांचे पैसे दोन-तीन वर्ष रखडले होते. सरकारचा अग्रक्रम ठरलेला असतो. सरकार सर्वांचे पैसे देणार. जसे पैसे जमा होतील, तसे त्या त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील, असे भुजबळ यांनी नमूद केले.

शरद पवारांच्या मनातले कळत नाही

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनातील काही कळत नाही. मात्र, अजित पवार यांच्या मनात काय आहे, हे मला कळते. अजित पवार काय करू शकतात आणि काय नाही, याचा अंदाज आहे. मात्र, मला ते बोलायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी लोकांची इच्छा आहे. शरद पवार यांची भूमिका त्यागाचीच राहिली आहे. महाविकास आघाडी एकसंध राहायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीतील सांगलीच्या जागेवरून सुरू असलेला वादही संपुष्टात आला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पुन्हा बोलणे योग्य ठरणार नाही. त्या वेळी झालेले गैरसमज आता दूर झाले आहेत. सांगलीमध्ये कोणी कोणाचा कार्यक्रम केलेला नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांविषयी आदर

राज्यपाल सोमवारी नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित राहिल्याने विविध तर्क-वितर्क करण्यात येऊ लागल्याने भुजबळ यांनी, विविध कामांमुळे राज्यपालांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना हजर राहता आले नसल्याचे सांगितले. आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने विकासकामांचे उद्घाटन होणे गरजेचे आहे. राज्यपालांविषयी आदर आहे. परंतु, अनेक ठिकाणी जाणे आवश्यक होते, असे भुजबळ यांनी सांगितले.