सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद: विरोधकांच्या मतदारसंघात घुसण्यासाठी स्वतंत्र रणनीती आखली जात असून एमआयएमच्या ताब्यात असणारा व शिवसेनेचे वर्चस्व असणारा औरंगाबादचा लोकसभा मतदारसंघ बांधण्यासाठी भाजपकडून समाजकार्यात पदवी मिळविलेल्या ४०० जणांची नियुक्ती केली जाणार आहे.

विविध योजनेतील ‘लाभार्थी मतदार व्हावेत’ अशी रचना आखली जात असून विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी हा चमू काम करणार आहे. यातील काही कार्यकर्त्यांना मानधन देण्यात येणार आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून आमदार प्रशांत बंब यांची नियुक्ती झाल्यानंतर गंगापूर मतदारसंघात बाह्यस्रोतातून कार्यकर्ता ( कार्यकर्त्यांचे आऊटसोर्सिंग ) करण्याचा प्रयोग जिल्हाभर हाती घेतला जाणार आहे. राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आता लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी १८ महिन्यात कोणते कार्यक्रम हाती घ्यायचे याचे नियोजन भाजपने केले असून त्याचा एक भाग म्हणून एमआयएमच्या ताब्यात असणाऱ्या व शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची बांधणी हाती घेण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅसची वाहिनीचे टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय मुद्रासह विविध कर्ज प्रकरणात तसेच बचतगटांच्या माध्यमातूनही भाजपने ‘ पेरणी’ सुरू केली आहे. लाभार्थी वाढविणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेत त्यांचे मेळावे हेही मतदारसंघ बांधणीचाच भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यांच्या योजनांना गती देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असून योजनांच्या अमंलबजावणीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आता औरंगाबाद जिल्ह्यात ४०० कार्यकर्ते नियुक्त केले जाणार आहेत. योजनांची अमंलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक स्तरावर हे कार्यकर्ते स्वतंत्रपणे लक्ष देतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक घरापर्यंतचा संपर्क करण्याबरोबर आरोग्याच्या क्षेत्रात लागणारी मदतही हे कार्यकर्ते करतील. गंगापूर विधानसभेची बांधणी करताना आमदार प्रशांत बंब यांनी औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहकार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. तसाच प्रयोग आता लोकसभा मतदारसंघात हाती घेतला जाणार आहे. मतदारसंघ बांधणीसाठी पुढील १८ महिने समाजसेवा क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करुन गरज आणि मदत याचा साकव तयार करणारा एक पथदर्शी प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ बांधणीचे प्रभारी आमदार प्रशांत बंब यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. दरम्यान आता राज्यातील सत्ताबदलानंतर तसेच घरघर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने कार्यकर्ते पुन्हा मतदारांपर्यंत पाठविण्याची घोषणा झाली आहे. मात्र, आता सामाजिक महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या व्यक्तींना राजकीय कामात गुंतविले जाणार आहे.

दौरे, बैठका आणि विकास कार्यक्रमाचा पहिला टप्पा

केंद्रीय मंत्र्यांचे दौरे ठरविण्याबरोबर प्रभारी नेमणूक केलेल्या व्यक्तींनी विधानसभा निहाय मुक्कामी दौरे करावयाचे असून पुढील १८ महिन्यात कोणत्या योजना हाती घ्यावयाच्या त्यातील कोणत्या योजना पूर्ण करणार याचेही नियोजन आखण्यात आले आहे. पण हे सारे करताना अगदी उत्पनाचा दाखला काढण्यापासून ते कर्ज मिळेपर्यंत प्रत्येक बाबीचा पाठपुरावा करण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच हे ४०० नियुक्त कार्यकर्तेही काम करणार असल्याचे सांगण्यात येते.

जिल्हाभर कार्यकर्त्यांची फौज

‘औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी आता विशेष प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. या मतदारसंघाचे प्रभारीपद मिळाल्यानंतर गंगापूरमधील बांधणीचा पॅटर्न आता संपूर्ण लोकसभा मतदारसंघात करणार असून योजनांची अंमलबजावणी नीट व्हावी म्हणून यंत्रणा उभी केली जाणार आहे. पूर्वी अशा पद्धतीने उभ्या केलेल्या कामातून यश मिळत असल्याने जिल्हाभर कार्यकर्ते नेमले जाणार आहे.
प्रशांत बंब, आमदार गंगापूर व प्रभारी लोकसभा मतदारसंघ

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will appoint 400 social workers for the preparation of lok sabha constituency print politics news asj
First published on: 04-07-2022 at 09:44 IST