अमरावती : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासोबत असलेली युती तोडण्याची घोषणा भाजपने केली. या पक्षासाठी सोडलेल्या सहा जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यातून रवी राणा यांची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न असला, तरी अनेक ठिकाणी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार हे समोरासमोर असल्याने मतविभाजनाचा फटका बसण्याच्या शक्यतेने भाजपमध्ये अस्वस्थता आहे.
महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आधीच वेगळी चूल मांडली होती. पण, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्षासोबत युती करण्याच्या संदर्भात चर्चा सुरू होती. अखेरच्या क्षणी शिंदे गटासोबत जागावाटपावरून पेच निर्माण झाल्याने युती होऊ शकली नाही. त्यानंतर भाजपने युवा स्वाभिमान पक्षासोबत युती केली. नऊ जागा या पक्षासाठी सोडण्याची तयारी दर्शवली, पण याचवेळी रवी राणांनी ४१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करून भाजपला अडचणीत आणले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवी राणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भाजपने आपल्या तीन अधिकृत उमेदवारांऐवजी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. अशा नऊ जागा युवा स्वाभिमानला मिळणार होत्या, पण रवी राणांनी आपला हट्ट कायम ठेवला. अखेरीस काल-परवा भाजपने युवा स्वाभिमानसोबतची युती संपुष्टात आल्याची घोषणा केली आणि त्या जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे रवी राणा यांची कोंडी झाली आहे. यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही, हे त्यांनी आपल्या भाषणातूनही निक्षूण सांगितले.
नवनीत राणांची भूमिका काय?
या संपूर्ण प्रकरणात भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या भूमिकेची चर्चा रंगली आहे. त्या भाजपच्या नेत्या असल्या, तरी साईनगर प्रभागात युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभांरभ करणे, विलासनगर-मोरबाग प्रभागात भाजपच्या एका उमेदवाराचा उघडपणे विरोध करून ‘तीन कमळ एक पाना (युवा स्वाभिमान)’ची घोषणा करणे यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य अजूनही त्यांना आहे. त्यामुळे पराभवासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तींना धडा शिकवायचा, हा चंग त्यांनी बांधला आहे. राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी जुने विसरून जाण्याचा सल्ला नवनीत राणा यांना भरसभेत दिला, पण राणा तलवार म्यान करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
भाजप-युवा स्वाभिमान संघर्ष अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये संघर्ष आहे. युवा स्वाभिमान पक्षाला मत म्हणजे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन असे भाजपचे नेते आपल्या भाषणांमधून बजावून सांगत आहेत. पण, त्याचा कितपत फायदा भाजपला होईल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातील काही लोकांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्याचे काय, असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते विचारत आहेत.
