भाजपाकडून देशभरातील नेते व कार्यकर्त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रशिक्षण दिले जात आहे. एआय व चॅटजीपीटीचा वापर करताना काय करावे व काय करू नये याबाबत नेते व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मागील आठवड्यापासून देशभरात भाजपाकडून कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीन दयाळ उपाध्याय प्रशिक्षण कार्यक्रम, २०२६ अंतर्गत देशभरात ७ मार्च पासून भाजपाकडून कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. मंडळ पातळीवरील कार्यकर्त्यांची कार्यशाळा १४ एप्रिल पासून, तर जिल्हा पातळीवरील कार्यशाळा १५ एप्रिल ते २० मे दरम्यान आयोजित केली जाणार आहे. या कार्यशाळांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना भाजपाचा इतिहास तसेच भाजपाच्या प्रगतीविषयीचे धडे दिले जाणार आहेत.
एआय व चॅटजीपीटीचे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण
भाजपाकडून नवीन सदस्यांना तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ‘नवाचार’ प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यकर्त्यांनी एआय एप्लिकेशन व चॅटजीपीटीचा वापर कसा करावा याबाबतचे धडे दिले जाणार आहेत. तसेच त्यांना एआय एप्लिकेशन, व्हर्च्युअल मिटिंग व पावर पॉइंट प्रेझेंटेशन कसे द्यावे याबाबत शिकवले जाणार आहे. “कमीतकमी वेळेत एआयचा वापर करून रिपोर्ट व ग्राफिक्स कसे बनवावे, माहिती व डेटाचे विश्लेषण करण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर कसा करावा हे कार्यकर्त्यांना शिकवले जाणार आहे. तसेच त्यांनी एआयच्या आधारे बनवलेले कुठलेही फोटो अथवा व्हिडीओ पोस्ट करू नये किंवा पोस्ट करण्याआधी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घ्यावी, कारण त्यामुळे पक्ष वादात अडकू शकतो, याबाबत कार्यकर्त्यांना जागृत केले जाणार आहे”, अशी माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
कार्यशाळेत मंत्री, खासदार, आमदार मुक्कामी?
भाजपा नेते व कार्यकर्ते भाषण करण्यासाठी हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा वापर करायचे, आता मात्र त्याऐवजी पावर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर करून भाषण देणे त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे वक्तृत्व अधिक प्रभावी होईल, असा विश्वास भाजपाला आहे. दरम्यान, या कार्यशाळांमध्ये भाजपाचे मंत्री, खासदार व आमदार मुक्कामी असणार आहेत. कार्यकर्त्यांची व नेत्यांची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. तसेच कार्यशाळेत सहभागींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील शतक हा चित्रपट दाखवला जाणार आहे. “कार्यकर्ते व नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याने त्यांच्यातील संबंध अधिक दृढ होतात. त्याचा फायदा आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये होईल”, असा विश्वास एका वरिष्ठ भाजपा नेत्याने व्यक्त केला आहे.
नॅरेटिव्हबाबत प्रशिक्षण
“जनतेवर प्रभाव पाडणारे मुद्दे कोणते याबाबत एक सेशन आयोजित केले जाणार आहे. विरोधक अनेकदा खोटे कथानक (नॅरेटिव्ह) पसरवतात. तथ्यहीन आरोप करतात. तथ्य मांडून खोट्या कथानकांना कसे उघडे पाडायचे व भाजपाच्या समर्थनात लोकांना उभे राहण्यासाठी काय करायचे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रश्नोत्तराच्या सत्रात कार्यकर्त्यांना भाजपाची सध्या सुरू असलेल्या सामाजिक व राजकीय विषयांवर नेमकी भूमिका काय हे जाणून घेता येणार आहे.”, अशी माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
सहभागींना भाजपा विचारधारेवरील पुस्तक वाचावे लागणार
मंडळ पातळीवर होणाऱ्या प्रत्येक कार्यशाळेत साधारणत: १०० ते १२५ भाजपाचे कार्यकर्ते व नेते सहभागी होतील असा अंदाज आहे. त्यांना कार्यशाळेत येण्याआधी भाजपाच्या विचारधारेवर आधारीत किमान एक पुस्तक वाचणे आवश्यक आहे. ते पुस्तक कार्यशाळेत येताना घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कार्यशाळा सुरू होण्याआधी वंदे मातरम या गीताचे सगळे कडवे गायन केले जाणार आहेत. दरम्यान, भाजपा मोर्चा, विभाग, आयटी सेल्स, नवीन सदस्य यांच्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
राहुल गांधींकडून काँग्रेस नेत्यांना ‘जिउ जित्सु’चे धडे
काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या अंतर्गत बैठकीत राहुल गांधी हे मार्शल आर्ट्ससाठीचे वस्त्र परिधान करून आले होते. तसेच त्यांनी त्यांच्याबरोबर ‘जिउ जित्सु’ या जपानी मार्शल आर्ट (युद्धकला) प्रकारातील प्रशिक्षकालाही बैठकीसाठी नेले होते. ‘जिउ जित्सु’ ही एक युद्धकला असून ती प्रामुख्याने आत्मसंरक्षणासाठी वापरली जाते. यात प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर पाडून नियंत्रणात आणण्यावर भर दिला जातो. काँग्रेसच्या तरूण नेत्यांना ‘जिउ जित्सु’चे प्रशिक्षण देण्यावर राहुल गांधी यांनी बैठकीत भर दिला. तब्बल पाच तास काँग्रेस नेत्यांना या मार्शल आर्ट्स प्रकाराबाबत माहिती तसेच प्रात्यक्षिक देण्यात आले. “चर्चासत्रातील काही भाग हा तत्वज्ञानाशी संबंधित होता. तसेच आपण कुठे लक्ष केंद्रीत करायला हवे व आपल्याला कसे लक्ष्य केले जाऊ शकते, आपण आयुष्याबद्दल कसा विचार करायला हवा याबाबत माहिती देण्यात आली”, असे बैठकीत उपस्थित एका काँग्रेस नेत्याने सांगितले.
राहुल गांधी यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्याचे कारण काय?
राजकारणात शाब्दिक बुक्के मारले जातात. त्यांपासून राजकारण्यांना स्वत:चा बचाव करावा लागतो. राजकीय नेत्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी आरोप-प्रत्यारोप केले जातात. राहुल गांधी यांच्या पक्षावर भाजपाकडून सातत्याने हल्लाबोल केला जातो. काँग्रेसला लक्ष्य केले जाते. तसेच मागील काही वर्षात काँग्रेसला भाजपामुळे अनेकदा पराभवाचा सामना देखील करावा लागला आहे. या सगळ्याचा सामना करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना राहुल गांधी यांनी मार्शल आर्ट्सबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, काँग्रेसमधील काही नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर याबाबत टीकादेखील केली आहे.
