BJP Bihar ally 7 leaders quit बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले आणि बिहारमध्ये एनडीएची सत्ता स्थापन झाली. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात २६ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. परंतु, बिहारमधील या विजयानंतर एनडीएचा घटक पक्ष अडचणीत सापडला असून पक्षातील सात प्रमुख नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
अनेकदा भाजपा घराणेशाहीच्या राजकारणावरून आपल्या राजकीय प्रतिस्पर्धकांना लक्ष्य करतो, परंतु आता भाजपाचा बिहारमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) या पक्षाला त्याच कारणामुळे बंडाळीचा सामना करावा लागत आहे. पक्षप्रमुख उपेंद्र कुशवाहा यांनी आपला मुलगा दीपक प्रकाश याला नितीश कुमार मंत्रिमंडळात मंत्री केल्यामुळे या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजीनामा देणारे मंत्री नक्की काय म्हणाले? बिहारमध्ये नक्की काय घडतंय? जाणून घेऊयात…
प्रकरण काय?
उपेंद्र कुशवाहा यांचे पुत्र दीपक प्रकाश हे आमदार किंवा विधान परिषद सदस्य नाहीत, मात्र तरीही त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. पक्षाचे चार आमदार निवडून आले असतानाही, त्यांनी मंत्रिपद आपल्या मुलाला दिले. निवडून आलेल्या आमदारांमध्ये कुशवाहा यांच्या पत्नी आणि सासारामच्या आमदार स्नेहलथा यांचाही समावेश आहे. या घडामोडींनंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह सात आरएलएम नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. आपल्या कुटुंबाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने आरएलएमचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार असलेल्या कुशवाहांशी संपर्क साधला, पण ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. राजीनामा देण्यापूर्वी आरएलएमचे प्रमुख नेते जितेंद्र नाथ यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मी गेल्या नऊ वर्षांपासून कुशवाहांजींबरोबर आहे आणि त्यांचे राजकारण मला चांगले माहीत आहे. एकेकाळी नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणून स्वतःकडे पाहणाऱ्या या नेत्याला, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला (तत्कालीन राष्ट्रीय लोक समता पक्ष) एकही जागा न मिळाल्याने पक्षाच्या भविष्याबद्दल अनिश्चितता वाटू लागली होती. त्यांना स्वतःचे भविष्य दिसत नसल्यामुळे ते कुटुंबाला पुढे आणण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. मात्र, आमदार नसलेल्या त्यांच्या मुलाला मंत्री करणे हे उघडपणे पक्षपातीपणाचे उदाहरण आहे.” नाथ यांना शेखुपुरा मतदारसंघातून तिकीट हवे होते, पण ते अखेरीस जेडी(यू)ला मिळाले.
नाथ यांच्याव्यतिरिक्त आरएलएमचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र कुशवाह, राज्य सरचिटणीस आणि प्रवक्ते राहुल कुमार, राज्य सरचिटणीस आणि नालंदा प्रभारी राजेश रंजन सिंह, राज्य सरचिटणीस आणि जमुई प्रभारी बिपीन कुमार चौरसिया, राज्य सरचिटणीस आणि लखीसराय प्रभारी प्रमोद यादव आणि शेखुपुरा जिल्हाध्यक्ष पप्पू मंडल यांनीही राजीनामा दिला आहे.
बिहार निवडणूक आणि आरएलएमची कामगिरी
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या आरएलएमने लढवलेल्या सहापैकी चार जागा जिंकल्या होत्या. एनडीएने राज्याच्या २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकून निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर, आरएलएमच्या वाट्याला एक मंत्रीपद आले होते. महेंद्र कुशवाह यांनी उपेंद्र कुशवाहा यांना समाजवादी राजकारणाचा कोसळलेला आधारस्तंभ म्हटले आहे. महेंद्र कुशवाह म्हणाले, उपेंद्र कुशवाह मूळ समाजवादी विचारसरणी विसरले आहेत. “ते नैतिक मूल्यांविषयी बोलतात, पण स्वतः त्यांचे पालन करत नाहीत,” असे ते म्हणाले.
राजीनामा दिलेले आणखी एक नेते राहुल कुमार यांनी आरएलएम प्रमुख ‘घराणेशाहीच्या राजकारणाच्या जाळ्यात अडकले आहेत, असे म्हटले. ते म्हणाले, “आता त्यांच्यात आणि केवळ आपल्या कुटुंबाला प्रोत्साहन देणाऱ्या इतर नेत्यांमध्ये कोणताही फरक राहिलेला नाही. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आरएलएममध्ये आता स्थान नाही.”
राजेश रंजन म्हणाले की, त्यांनी अशा पक्षाची विचारधारा स्वीकारली आहे, जो आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्व देत नाही आणि सर्व काही कुटुंबाला देतो. त्यामुळे आम्ही राजीनामा दिला. दुसरीकडे, मंडल यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता शेखुपुरा युनिट बरखास्त करण्याच्या उपेंद्र कुशवाहांनी घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुलाला मंत्रीपद दिल्याच्या वादावर कुशवाहा काय म्हणाले?
२१ नोव्हेंबर रोजी ‘एक्स’वर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये कुशवाहांनी आपल्या मुलाला राज्याचे पंचायत राज मंत्री केल्यामुळे त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर दिले. त्यांनी लिहिले, “तुम्ही आमच्या निर्णयाला घराणेशाहीच्या श्रेणीत ठेवत असाल तर कृपया माझी काहीशी मजबुरी समजून घ्या. पक्षाचे अस्तित्व आणि भविष्य वाचवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी हे पाऊल अतिशय महत्त्वाचे होते.”
ते पुढे म्हणाले, “तुम्हा सर्वांना माहीत आहे की, भूतकाळात आम्हाला पक्ष विलीन करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता, ज्यावर संपूर्ण बिहारमध्ये तीव्र टीका झाली होती. तेव्हाही खूप संघर्षानंतर तुमच्या आशीर्वादाने पक्षाचेच खासदार, आमदार निवडून आले. लोक जिंकले आणि मग सोडून गेले. तिजोरी रिकामी राहिली, आम्ही शून्यावर पोहोचलो. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून विचार करणे आवश्यक होते.”
यापूर्वी, उपेंद्र कुशवाहा यांनी आरजेडी आणि त्याचे संस्थापक लालू प्रसाद यांच्यावर घराणेशाहीच्या राजकारणावरून टीका केली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या बिहारमधील पोटनिवडणुकीदरम्यान ते म्हणाले होते की आरजेडी संपूर्णपणे वारशावर चालतो, योग्यतेवर नाही.
