महेश सरलष्कर

शिवसेनेत बंडाळी माजवणारे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांना सुरतमध्ये आणि त्यानंतर आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये नेण्यात आले. गुजरात आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून तिथल्या भाजप नेत्यांच्या देखरेखीखाली शिवसेनेतील बंडखोरांची ‘’काळजी’’ घेतली जात आहे. राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींवर दिल्लीतून लक्ष ठेवले जात असले तरी, भाजपचे केंद्रीय नेतृत्व ‘’नामानिराळे’’ असल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील बंडखोरीला मंगळवारी पहाटेपासून सुरुवात झाली होती. मात्र, दिल्लीत भाजपच्या गोटात पूर्ण शांतता होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नड्डांच्या निवासस्थानी भेट झाली असली तरी, ती प्रामुख्याने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी असल्याचे दाखवले गेले. अर्धा तासाच्या चर्चेनंतर दोन्ही नेते थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या घरी गेले होते. मंगळवारी रात्री राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांचे नाव घोषित करण्यात आले. त्याची पूर्वकल्पना नायडूंना देण्यासाठी शहा आणि नड्डा यांनी त्यांची भेट घेतली होती. मंगळवारी दिवसभर सुरतमध्ये राज्यातील राजकीय नाट्य उलगडत असताना दिल्लीत शहा व नड्डा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली नव्हती. मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता तीनही नेते भाजपच्या मुख्यालयात संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी आले. महाराष्ट्रासंदर्भात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये चर्चा झाल्याचे व दिल्लीतून नव्या संभाव्य सरकार स्थापनेसंदर्भातील कोणत्याही हालचालींचा मागमूसही नव्हता.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याची खात्री झाल्याशिवाय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून प्रत्यक्ष हस्तक्षेपाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीत येऊन शहा आणि नड्डा यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर ते अहमदाबादला निघून गेले. फडणवीस थेट एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याने सुरतमधील बदलत्या परिस्थितीची माहिती शहांपर्यंत पोहोचवली जात होती. वास्तविक शिंदेच्या बंडाळीची सूत्रे दिल्लीतील अमित शहांच्या कार्यालयातून हलवली जात असल्याचे समजते. शहांच्या कार्यालयातील एका व्यक्तीकडे भाजप अंतर्गत संपर्काची जबाबदारी सोपवण्यात आली. याशिवाय, केंद्रीयमंत्री व शहा यांचे विश्वासू भूपेंद्र यादव हेही दिल्लीतून सातत्याने राज्यातील भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. शिंदेची बंडाळी शमणार नाही याची ‘’दक्षता’’ दिल्लीतून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली होती. मात्र, हा राजकीय खेळ फक्त एकनाथ शिंदे यांनीच घडवून आणल्याचे चित्र दिल्लीतून उभे करण्यात येत आहे. 

दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसचे तत्कालीन नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करून प्रदेश काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली होती. या फोडाफोडीत भाजपचे केंद्रीय नेतृत्व थेट सहभागी झाल्याचे दिसले होते. दिल्लीमध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे स्वतः कार चालवत अमित शहांच्या घरी गेले होते व त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या वीसहून अधिक समर्थकांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे कमलनाथ यांचे सरकार कोसळले होते. त्यावेळी करोना काळात मध्य प्रदेशमध्ये सरकारच्या पाडापाडीचा ‘’उद्योग’’ केल्याबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका झाली होती. राजस्थानमध्येही अशोक गेहलोत सरकारला खाली खेचण्याचे प्रयत्न भाजपने केले होते. सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारून भाजपशी संवादही साधला होता. सचिन पायलट यांना भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी भाजप नेतृत्वाने केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत व अन्य प्रदेश भाजप नेत्यांवर सोपवली होती. पण, पायलट यांना ३० समर्थक जमवता न आल्याने भाजपचे राजस्थानातील सत्तांतराचे मनसुबे बारगळले. आता महाराष्ट्रामध्ये सत्तांतराची शक्यता दिसत असून एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांचे परतीचे दोर पूर्णपणे कापले जातील याची खात्री झाल्याशिवाय भाजपचे केंद्रीय नेतृत्व थेट राजकीय हस्तक्षेप करणार नाही. तसे कोणतेही वातावरण दिल्लीमध्ये निर्माण होणार नाही याची काळजी गेल्या दोन दिवसांमध्ये घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले.