महेश सरलष्कर

राजस्थान, छत्तीसगढ, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, ओदिशा आदी विविध राज्यांतील प्रदेश काँग्रेसमध्ये, ‘राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळावी’, अशी विनंती करणारे ठराव संमत झाले असून या प्रस्तावामागे केंद्रीय काँग्रेसमधील कोणाचे ‘आशीर्वाद’ आहेत, असा सवाल बंडखोर गटातील नेत्यांनी विचारला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेते शशी थरूर यांना पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी हिरवा कंदील दिला. त्यामुळे सोनियांना खरोखरच काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शी आणि मुक्तपणे व्हावी असे प्रामाणिकपणे वाटते असे बोलले जात आहे. पण मग, प्रदेश काँग्रेसमध्ये राहुल गांधींना पाठिंबा देणारे ठराव का संमत केले जात आहेत? हे ठराव संमत होत असल्याचे सोनिया गांधी वा राहुल गांधी यांना माहिती नाही का? पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक होण्याआधी पक्षाच्या निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हे ठराव कसे संमत होतात? निवडणूक पारदर्शी व्हायची असेल तर, सोनिया वा राहुल यांच्यापैकी एकानेही हे ठराव संमत करू नयेत, असे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना का सांगितले नाही? सोनिया-राहुल यांनी एखादे ट्वीट करूनही या ठरावांसंदर्भातील भूमिका जाहीर करायला हवी होती. मग, दोघांनीही उघडपणे ठरावांवर भाष्य का केले नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांनी केली.

सध्या राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभागी झाले असून २३ सप्टेंबर रोजी या यात्रेचा विश्रांतीचा दिवस आहे. त्यामुळे राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीत असून पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता आहे. पण, केरळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणार की नाही, यावर थेट भाष्य केले नाही. राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाध्यक्ष पद स्वीकारायचे नसेल तर, ठराव का मंजूर केले जात आहेत? राहुल गांधी उमेदवार होणार नसतील तर, त्यांनी तसे स्पष्टपणे का सांगितले नाही?, अशा शब्दांत राहुल गांधी यांच्या संदिग्धतेवर ‘जी-२३’ गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी पक्षाध्यक्ष होणार असतील तर, बंडखोर गटही विरोध करणार नाही पण, तसे नसेल तर राहुल गांधींचे निष्ठावान कोणी तरी ‘होयबा’ नेता अध्यक्ष पदावर बसवतील, त्यासाठी संदिग्धता निर्माण केली जात असल्याचा आरोप बंडखोर नेत्यांनी केला. काँग्रेसमधील सोनियानिष्ठावान ज्येष्ठ नेत्यांनी अशोक गेहलोत यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र, अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद कुठल्याही परिस्थितीत सचिन पायलट यांना द्यायचे नाही, अशी अट घातली आहे. गेहलोत यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपवायचे असेल तर सोनियांना अशोक गेहलोत यांची अट मान्य करावी लागेल. गेहलोत यांच्या नावाला बंडखोर गटातील नेत्यांनीही मान्यता दिली आहे. शशी थरूर यांच्यापेक्षा गेहलोत अधिक सक्षम असून त्यांना विरोध केला जाणार नाही, असे बंडखोर गटातील नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली.

सोनिया गांधी यांचाही गेहलोत यांनाच पाठिंबा आहे. मात्र, गेहलोत यांच्याकडे सूत्रे गेली तर पक्षावरील पकड ढिली होईल. गेहलोत हे स्वतंत्र विचारांचे असून राहुल गांधी वा त्यांच्या निष्ठावानांच्या आदेशावरून कारभार करतीलच असे नाही. शिवाय, ते पक्षाध्यक्ष झाल्यावर त्यांचे नवे सत्तेचे वर्तुळ निर्माण करू शकतील, अशी भीती वाटू लागल्याने राहुल गांधी यांचे निष्ठावान गेहलोत यांनाही छुपा विरोध करत आहेत. त्यामुळे हे निष्ठावान मुकुल वासनिक यांच्यासारख्या एखाद्या ‘होयबा’ नेत्याची पक्षाध्यक्ष पदी वर्णी लावण्यासाठी धडपड करत असल्याचा आरोपही काही बंडखोर नेत्यांनी केला. पुढील तीन-चार दिवसांमध्ये बंडखोर गटातील नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असून आगामी रणनिती निश्चित केली जाणार आहे.