Mumbai Municipal Corporation Election मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी) मतदान होत आहे. जवळपास चार वर्षांच्या खंडानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुका पार पडत आहेत. या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महापालिका दैनंदिन कामकाज आणि शहराच्या दीर्घकालीन विकासाचे नियोजन करते. १८६५ मध्ये स्थापन झालेली बीएमसी ही देशातील सर्वांत श्रीमंत आणि प्रभावशाली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बीएमसी नेमके काय काम करते? ती महत्त्वाची महानगरपालिका का आहे? महानगरपालिकेंचे अधिकार काय असतात, कार्य आणि जबाबदाऱ्या काय असतात? सविस्तर जाणून घेऊयात….

महापालिकेची कामे काय असतात?

शहरांचं नियोजन आणि व्यवस्थापन करणे, शहरात पाणीपुरवठा करणे, शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, शहरातील वाहतूक आदी कामे महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जातात. प्रत्येक शहरातील लोकसंख्येनुसार महापालिका ठरते, म्हणजे काही शहरांत महानगरपालिका तर काही शहरांत नगर परिषद असते.

बीएमसीची रचना आणि बजेट

बीएमसी ही तिच्या अवाढव्य विस्तारामुळे इतर महापालिकांपेक्षा वेगळी ठरते. सुमारे ७४ हजार कोटी रुपयांच्या वार्षिक बजेटसह या महापालिकेकडे गोवा, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांच्या तुलनेत अधिक निधी उपलब्ध असतो. बीएमसीमध्ये कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचारी मिळून सुमारे १.१५ लाख लोक काम करतात. त्यामुळे ही देशातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक नियोक्त्यांपैकी एक आहे.

महापालिकेचे प्रशासन ‘महानगरपालिका आयुक्त’ यांच्या नेतृत्वाखाली चालते. महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते आणि त्यांच्याकडे कार्यकारी अधिकार असतात. त्यांना मदत करण्यासाठी चार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आणि एक संयुक्त महानगरपालिका आयुक्त असतात. दुसरीकडे निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या गटाचे नेतृत्व ‘महापौर’ करतात. महापौर हे पद प्रामुख्याने औपचारिक असते. कारण- बहुतेक निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांकडे असतात.

महापालिकेच्या जबाबदाऱ्या काय असतात?

सर्वसामान्य व्यक्ती दररोज ज्या सेवांवर अवलंबून असतात, त्या पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची असते. या सेवा खालीलप्रमाणे :

  • रस्ते : मुंबईतील २,०५० किलोमीटर रस्त्यांच्या जाळ्याची बांधणी आणि देखभाल महापालिका करते. खराब रस्ते दुरुस्त करणे, खड्डे भरणे, नवीन रस्ते बांधणे आणि वाहतूक सुरळीत राहील याची खात्री करणे ही महापालिकेची कामे आहेत. सध्या बीएमसी १७ हजार कोटी रुपये खर्चून सुमारे ७०० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट-काँक्रीटीकरण करीत आहे. खड्डे कमी करणे आणि विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांची टिकवण क्षमता सुधारणे हा त्यामागचा उद्देश आहे.
  • पाणीपुरवठा : मुंबईला पिण्याच्या पाण्यासाठी तुळशी, विहार, भातसा, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा व मोडकसागर या सात तलावांवर अवलंबून राहावे लागते. त्यापैकी केवळ दोन तलाव शहराच्या हद्दीत आहेत. बीएमसी या तलावांचे व्यवस्थापन करते, त्यातून पुरवले जाणारे पाणी गाळून शुद्ध करते आणि पाइपलाइनच्या विस्तीर्ण जाळ्याद्वारे ते घरे आणि उद्योगांना पुरवते. तसेच पाणीगळती दुरुस्त करणे आणि वाढत्या शहराची गरज ओळखून पाणीपुरवठा यंत्रणेचा विस्तार करणे ही कामेही महापालिकाच करते.
  • कचरा व्यवस्थापन : मुंबईत दररोज ८,००० ते १०,००० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. घराघरातून आणि सार्वजनिक ठिकाणांहून कचरा गोळा करणे, तो प्रक्रिया प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेणे आणि रस्ते स्वच्छ ठेवणे ही बीएमसीची जबाबदारी आहे. त्याशिवाय सार्वजनिक शौचालयांची देखभाल करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते समुद्र किंवा खाडीत सोडण्याचे कामही महापालिका करते.
  • सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण : बीएमसी देशातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक आरोग्य सेवांपैकी एक चालवते. महापालिका चार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये, १६ सामान्य रुग्णालये, चार विशेष रुग्णालये, तसेच दवाखाने आणि प्रसूतिगृहे चालवते. मुंबईतील लोकसंख्येचा मोठा भाग स्वस्त उपचारांसाठी या सुविधांवर अवलंबून असतो. कोविड-१९ महामारीच्या काळात, क्वारंटाईन सेंटर्स आणि जम्बो कोविड केअर सेंटर्स उभारून बीएमसीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिक्षणाच्या क्षेत्रात बीएमसी १,१०० हून अधिक शाळा चालवते. त्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिले जाते. त्यापैकी अनेक शाळा आता सीबीएसई बोर्डाशी संलग्न आहेत आणि तेथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना अत्यल्प दरात शिक्षण दिले जाते.
  • पायाभूत सुविधांची बांधणी : उड्डाणपूल, पूल, भुयारी मार्ग आणि महत्त्वाचे जोडरस्ते यांसारखे मोठे प्रकल्प बीएमसी उभारते. त्याचे एक प्रमुख उदाहरण म्हणजे ‘मुंबई कोस्टल रोड’. हा रस्ता २०२४ मध्ये खुला करण्यात आला. त्यामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रेदरम्यानच्या प्रवासाचा वेळ १० मिनिटांपेक्षा कमी झाला आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि वर्सोवा ते भाईंदरला जोडणारा कोस्टल रोडचा पुढचा टप्पा यांसारखे इतर मोठे प्रकल्प सध्या सुरू आहेत. बीएमसी शहरातील ३४० हून अधिक पूल आणि स्कायवॉकची देखभालदेखील करते.
  • सार्वजनिक वाहतूक : बीएमसी ही ‘बेस्ट’ची मूळ संस्था आहे, जी मुंबई आणि उपनगरात २,५०० हून अधिक बस चालवते. बेस्टला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी बीएमसी नियमितपणे आर्थिक मदत पुरवते. चालू वर्षासाठी महापालिकेने बेस्टसाठी १,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याव्यतिरिक्त, बीएमसी शहरात २६ ऑफ-स्ट्रीट पार्किंग लॉट्स आणि ३५० हून अधिक ऑन-स्ट्रीट पार्किंग जागांचे व्यवस्थापन करते. तसेच शहरातील ८०० हून अधिक उद्याने आणि मोकळ्या जागांची देखभालही पालिकेकडेच आहे.

महापालिकेचा महसूल आणि निधी

बीएमसी ही भारतातील सर्वांत जास्त कर गोळा करणाऱ्या स्थानिक संस्थांपैकी एक आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत ‘मालमत्ता कर’ हा आहे. हा कर निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांवर आकारला जातो. त्याशिवाय पाणीपट्टी, सांडपाणी शुल्क, इमारतींच्या बांधकामाच्या परवानग्यांचे शुल्क, पार्किंग शुल्क आणि दंडात्मक शुल्क यांतूनही महापालिकेला उत्पन्न मिळते. विकास शुल्क, जाहिरात शुल्क आणि राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान हेदेखील पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. या महसूल आधारामुळे बीएमसीला राज्य सरकारवर जास्त अवलंबून न राहता, मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सार्वजनिक सेवा राबविता येतात.

निवडणुकीचे महत्त्व काय?

आर्थिक संसाधने आणि व्यापक जबाबदाऱ्यांमुळे बीएमसीचा मुंबईकरांच्या जीवनमानावर थेट परिणाम होतो. या महापालिका निवडणुका महत्त्वाच्या आहेत. कारण- त्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या पायाभूत सुविधा आणि सेवांसाठी महत्त्वाच्या आहेत. महापालिकेच्या निकालातून आगामी वर्षांत प्रशासन आणि विकास कसा असेल, हे ठरेल.