येत्या २८ मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घान होणार आहे. या उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्याच हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करावे, अशी मागणी काँग्रेससह इतर २० विरोधी पक्षांनी केली आहे. विशेष म्हणजे याच मागणीला घेऊन त्यांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. असे असताना विरोधी पक्षातील बीएसपी, टीडीपी, जेडीएस या पक्षांनी मात्र आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. देशातील या तीन महत्त्वाच्या पक्षांनी इतर विरोधी पक्षांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे भाजपाला बळ मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएसपी पक्षाची काय भूमिका?

बीएसपी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासंदर्भात ट्विट्स करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांनी घेतलाला बहिष्काराचा निर्णय चुकीचा आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. “काँग्रेसची सत्ता असो की भाजपाची आम्ही देशाच्या तसेच लोकांच्या हिताच्या निर्णयाला कायम पाठिंबा दिलेला आहे. पक्षाच्या भूमिकेच्या समोर जाऊन आम्ही निर्णय घेत आलेलो आहोत. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचे आम्ही स्वागत करतो,” असे मायावती ट्वीटमध्ये म्हणाल्या.

हेही वाचा >> महाविकास आघाडीची पुण्यात वज्रमूठ सभेची तयारी सुरू

उद्घाटनाचा अधिकार हा सरकारलाच- मायावती

“संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होत नसल्यामुळे विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. मात्र हा निर्णय चुकीचा आहे. केंद्र सरकारने या इमारतीची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे उद्घाटनाचाही अधिकार हा सरकारलाच आहे. या कार्यक्रमाचा संबंध महिलांचा आदर आणि प्रतिष्ठेशी लावणे चुकीचे आहे. हाच विचार विरोधकांनी द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात उमेदवार देताना करायला हवा होता,” असेही मायावती म्हणाल्या आहेत.

मायावती उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत

बीएसपी पक्षाची २८ मे रोजी बैठक असल्यामुळे मायावती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र त्या या कार्यक्रमाला पक्षाचा प्रतिनिधी पाठवणार आहेत. याबाबत बीएसपी पक्षाचे लोकसभेचे नेते गिरिश चंद्रा यांनी अधिक माहिती दिली आहे. “आमच्या पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या पक्षाचे खासदार उपस्थित राहणार आहेत. मायावती यांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही या कार्यक्रमाला जाऊ,” असे चंद्रा यांनी सांगितले.

हेही वाचा >> भाजपचे मंत्री महिनाभर व्यस्त

संसद भवन हे भाजपा, संघाचे कार्यालय नाही- देवेगौडा

जेडीएस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनीदेखील मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, असे सांगितले आहे. “मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. कारण संसदेची नवी इमारत ही देशाची संपत्ती आहे. ही नवी इमारत लोकांनी दिलेल्या काराच्या पैशातून उभारण्यात आलेली आहे. हे काही भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय नाही. मी संवैधानिक मूल्ये जपण्याचे काम करत आलो आहे. मी संवैधानिक कामामध्ये राजकारण आणत नाही,” अशी प्रतिक्रिया देवेगौडा यांनी दिली. टीडीपी पक्षाचे नेते एन चंद्राबाबू नायडू यांनीदेखील राज्यसभेचे खासदार कनकमेडला रवींद्र कुमार यांना उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

अमित शाहांची काँग्रेसवर सडकून टीका

आसाम दौऱ्यावर असताना अमित शाह यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. “राष्ट्रपतींनी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करावे, असे विरोधक म्हणत आहेत. छत्तीसगडमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी विधानभवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी केली होती. तेव्हा राज्याचे प्रमुख असलेले राज्यपाल कोठे होते. झारखंड विधानभवनाची पायाभरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली होती. तेव्हादेखील राज्यपालांना बोलवण्यात आले नव्हते. आसाममध्येही तरुण गोगोई यांनी राज्यपालांना बोलावले नव्हते. मणिपूरच्या विधानसभा संकुलाचे डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी उद्घाटन केले होते. तेव्हादेखील राज्यपाल उपस्थित नव्हते. आंध्रप्रदेशमध्ये विधानसभवनाच्या नव्या इमारतीचे चंद्राबाबू नायडू यांनी उद्घाटन केले होते. तामिळनाडूमध्ये सोनिया गांधी, मनमोहन सिंग तसेच मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाच्या इमारतीचे उद्घाटन केले होते,” अशी उदाहरणं अमित शाह यांनी दिली.

हेही वाचा >> कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये ‘पैशांचा पाऊस’

काँग्रेस मोदींना पंतप्रधान मानण्यास तयार नाही- अमित शाह

“काँग्रेसने केलेले सर्वकाही योग्य असते. मात्र भाजपाने काही केले तर ते चुकीचे ठरवले जाते. तुम्ही कार्यक्रमांवर बहिष्कार टाकता. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून दोन वेळा निवड केली आहे. हा जनतेचा निर्णय आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. काँग्रेस तसेच गांधी घराणे मोदी यांना पंतप्रधान मानण्यास अद्याप तयार नाही. मोदी यांना संसदेत बोलू दिले जात नाही. विरोधक कार्यक्रमांवर बहिष्कार टाकतात,” अशी टीका अमित शाह यांनी काँग्रेसवर केली.

मोदी दिसऱ्यांदा पंतप्रधान होणार- अमित शाह

“तुम्ही कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने काहीही बदलणार नाही. आगामी निवडणुकीत तुम्ही लोकांना मतं मागायला जाल. मात्र तुम्हाला आता जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, तेवढ्यादेखील मिळणार नाहीत. भाजपाचा ३०० जागांवर विजय होईल आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील,” असा दावाही अमित शाह यांनी केला.

हेही वाचा >> अशोक गेहलोत यांचा सचिन पायलट यांच्यावर हल्लाबोल, पेपरफुटी प्रकरणावर बोलताना म्हणाले “…ही तर बौद्धिक दिवाळखोरी”

निर्मला सीतारामन काँग्रेसविरोधात आक्रमक

दुसरीकडे निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसने मोठे मन करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती केली आहे. “काँग्रेसने केलेल्या आरोपामुळे मी चकित झाले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात उमेदवार उभा केला होता. त्यांच्यावर टीका केली होती. मुर्मू या फक्त रबरी शिक्का ठरतील, असे तेव्हा काँग्रेस पक्ष म्हणत होता. मात्र पंतप्रधानांनी मुर्मू यांना योग्य तो आदर दिलेला आहे. ज्यांनी कधीकाळी मुर्मू यांच्याविरोधात प्रचार केला, आज ते त्यांच्यांवर अन्याय होत असल्याचे म्हणत आहेत,” अशी टीका सीतारामन यांनी केली.

मोदींमुळे संसदीय लोकशाही मोडीत निघाली- काँग्रेस

दरम्यान, विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. “देशाची संसद ही लोकशाहीतील मंदीर आहे, हे मोदी यांनी समजून घ्यावे. राष्ट्रपतींचे कार्यालय हे संसदेचा प्रमुख आणि महत्त्वाचा भाग आहे. मोदी यांच्या मी पणामुळे देशातील संसदीय प्रणाली मोडीत निघाली आहे,” असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच “द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच रांची येथे झारखंड उच्च न्यायालयाच्या संकुलाचे उद्घाटन केले. एका माणसाच्या मी पणामुळे देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतींना संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करू दिले जात नाहीये. राष्ट्रपतींना हा संवैधानिक अधिकार असूनही तो नाकारला जात आहे,” अशी टीका काँग्रेसचे संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनी केला.

हेही वाचा >>महाविकास आघाडीची पुण्यात वज्रमूठ सभेची तयारी सुरू

काँग्रेससह इतर २० विरोधी पक्षांनी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आक्रमक झाले आहेत. काँग्रेसकडून घाणरेडे राजकारण केले जात आहे. ते जनतेने दिलेल्या निर्णयाचा अनादर करत आहेत, असा आरोप अमित शाह यांनी केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsp tdp jds party will present for parliament new building inauguration programme prd