अकोला : राज्यात सत्तेच्या सारीपाटावर एकत्र असलेल्या भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये वादाचे नवे राजकीय समीकरण बुलढाणा जिल्ह्यात आकारास आले. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वादाने टोक गाठले असून सत्तेच्या वर्तुळातच संघर्षाचा भडका उडाला. या आमदारांची एकमेकांवरील शाब्दिक युद्धे चर्चेत आहेत. राजकीय वादाने हीन पातळी गाठली. दुष्काळात बळीराजा होरपळत असतांना दोन्ही आमदार मात्र आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडवण्यातच धन्यता मानत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राजकारण म्हटले की मतभेद, वाद आलेच. ते किती ताणायचे, कुठे थांबायचे आणि एकमेकांवर टीका-टिप्पणी करतांना पातळी सोडायची नाही, याचे भान लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ठेवणे अपेक्षित असते. मात्र, वादग्रस्त, खळबळजनक, हीन, वायफळ विधान करून स्वस्त प्रसिद्धी मिळवत चर्चेत राहण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधी, नेत्यांकडून केला जातो. अनेकांना याचे व्यसनच जडले. एकमेकांविषयी बोलतांना आदर, स्नेहभाव ठेवणे तर दूरच, पण खालच्या पातळीवर टीका करून शाब्दिक हल्ले चढवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात याचा प्रत्यय वारंवार येतो. बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चिखलीच्या आ.श्वेता महाले आणि आ. संजय गायकवाड यांच्यातील वाकयुद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गट हे दोन्ही पक्ष खुर्चीला खुर्ची लावून सत्तेत एकत्र बसले आहेत. याच दोन्ही मित्रपक्षांच्या बुलढाणा जिल्ह्यातील आमदारांमधून विस्तव देखील जात नसल्याचे चित्र आहे. चिखली आणि बुलढाणा या दोन्ही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांमध्ये एकमेकांच्या मतदारसंघात ढवळाढवळ केली जात असल्याच्या आरोपावरून वादाला तोंड फुटले. त्यानंतर सुरू झालेल्या वादाने थांबण्याचे नाव घेतले नाही. महायुतीतील दोन्ही आमदारांमध्ये संघर्ष पेटलाय. आ.गायकवाड यांनी चिखलीमध्ये स्वत:चा पक्ष वाढवण्याचे काम करतोय, असे म्हटले होते. खऱ्या शिवसैनिकांना सोडून शिवसेना वाढवत आहात की स्वतःचा परिवार वाढवत आहात? अशा शब्दात आ.श्वेता महाले यांनी आ.गायकवाडांना चिमटा काढला.

मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आणि भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या बुलढाण्यातील कार्यक्रमादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याच्या मुद्द्यावरूनही महाले आणि गायकवाड यांच्यात जुंपली. ‘राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी दाखवून देऊ’ असे खुले आव्हानच आ.महाले यांनी दिले. त्यावर आ.गायकवाड यांनी ‘एखाद्या बाईने म्हटले की, मी बाप आहे तर बापासारखे शरीर कुठून आणणार? हे शोभते का बोलायला’ अशा शब्दात खालच्या पातळीची टीका केली. त्यानंतर हे प्रकरण आणखी तापले. या प्रकरणात आ.गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यावरून संतापलेल्या आ.गायकवाड यांनी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येतात आणि गुन्हे दाखल होतात, असा गंभीर आरोप केला. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले.

आमदारांमधील वाद शमण्याऐवजी तो आणखी पेटला

या सर्व वादातच काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या फसलेल्या भाजप प्रवेशावरून आ.गायकवाड यांनी आ.महाले यांच्यावर बोचरी टीका केली. विरोधकांना धमकावणे, त्यांच्या पत्नीला गायब करणे यासारखे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप आ.महाले यांनी करून बुलढाण्याचा बिहार झाल्याचे टीकास्त्र सोडले. आ.गायकवाड यांनी बुलढाण्यात महिलांच्या सुरक्षेचा दावा केला. त्याला प्रत्युत्तर देतांना आ.महाले यांनी ‘बुलढाणा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या घरातील महिला तरी सुरक्षित आहेत का? त्यांना कोण मॅसेज करतो, हे घरातच तपासलं पाहिजे,’ अशी खळबळजनक टीका केली. ‘आ.महाले यांनी पुरावा द्यावा, काही तथ्य नसेल आणि शिवसैनिक बहिणींना आणि महिलांना बदनामीचा प्रयत्न असेल, तर त्यांनी इतक्या नीच पातळीपर्यंत जाऊ नये,’ असे आ.गायकवाड यांनी सुनावले. गुंडांना ताकद देऊन बुलढाण्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चिखलीला गाझियाबाद पेक्षाही भयानक करून लोकांची मालमत्ता हडपणे, त्यांचे जीवन जगणे कठीण केल्याचा घणाघात आ.गायकवाड यांनी केला.

दोन्ही आमदारांमधील शाब्दिक युद्ध चांगलेच भकडले

दुष्काळाची सध्या गंभीर परिस्थिती आहे. खरीप हंगामातील पिके करपली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे विदारक चित्र सर्वत्र दिसून येते. या सर्व गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसणे गरजेचे असतांना सत्ताधारी पक्षाचे दोन्ही आमदार एकमेकांची उणीदुणी काढण्यात व तोंडसुख घेण्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील, मतदारसंघातील मूळ प्रश्न, समस्या बाजूला पडल्या. लोकप्रतिनिधींना खरंच परिस्थितीचे गांभीर्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. सत्तेतील बेबनाव चव्हाट्यावर येत असल्याने सर्वसामान्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.