भाजप नेत्यांच्या विरोधावर मात करत राधाकृष्ण विखे मंत्रीपदी!

राज्यातील सत्ता परिवर्तनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विखे यांचे मोठे सहकार्य लाभले, त्याचे फळ त्यांना मिळाले.

भाजप नेत्यांच्या विरोधावर मात करत राधाकृष्ण विखे मंत्रीपदी!
राधाकृष्ण विखे- कॅबिनेट मंत्री

मोहनीराज लहाडे

काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि भाजप असा प्रवास करत आलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राज्यातील सत्ता परिवर्तनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विखे यांचे मोठे सहकार्य लाभले, त्याचे फळ त्यांना मिळाले. पक्ष कोणताही असो राधाकृष्ण विखे कायम मंत्रीपदी राहिले आहेत. त्यांच्या आताच्या मंत्रीपदाला जिल्ह्यातील प्रमुख भाजप नेत्यांनी बराच विरोध केला, तरीही विखे यांची वर्णी लागली यातच सर्व काही आले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि पवार घराणे यांचे प्रमुख विरोधक म्हणून राज्यात विखे घराणे ओळखले जाते. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वाढलेले वर्चस्व कमी करण्याची जबाबदारी आता विखेंकडे सोपवली जाईल.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि विखे हे परंपरागत विरोधक. या विरोधाला विखे यांच्या मंत्रीपदामुळे आता अधिक धार चढेल. महाविकास आघाडीच्या काळात थोरात यांच्याकडे महसूल मंत्रीपद असताना विखे यांनी प्रामुख्याने याच विभागाला सातत्याने लक्ष्य केले होते. त्यामुळे आगामी काळात ही लढाई अधिक रंगेल. काँग्रेस-राष्ट्रवादीमधून पूर्वी शिवसेनेत गेलेल्या आमदार-खासदारांना सत्ता परिवर्तनाच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे करण्यासाठी फडणवीस यांना विखे यांचे बरेच सहकार्य लाभल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. विखे यांना मिळालेले मंत्रीपद म्हणजे त्याचाच परिपाक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

हेही वाचा- संजय राठोड : मतदारांसाठी धडपडणारा पण वादग्रस्त चेहरा

विधान परिषदेवर राम शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर मंत्रीपदी राम शिंदे की राधाकृष्ण विखे याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता होती. मात्र या स्पर्धेत मूळ भाजपचे असलेल्या राम शिंदे यांच्यावर काँग्रेसमधून आलेल्या विखे यांनी मात केली. काही दिवसांपूर्वी भाजपमधील पराभूत आमदारांच्या शिष्टमंडळाने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विखे यांच्या मंत्रीपदाच्या विरोधासाठी त्याचप्रमाणे त्यांच्याकडे किमान पालकमंत्रीपद तरी सोपवले जाऊ नये, यासाठी फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आता विखे यांच्याकडे पालकमंत्रीपदही ओघाने येईलच.

विखे काँग्रेस किंवा शिवसेनेत असतानाही `ते विरुद्ध पक्षातील इतर सर्व’ अशीच परिस्थिती होती. आता ते भाजपमध्ये आहेत आणि परिस्थिती पुन्हा एकदा तशीच आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांनी आगामी जिल्हा परिषद व पालिका निवडणुकांचा वेध घेत जिल्हा विकास आघाडी पुन्हा एकदा कार्यरत करण्याचा मनसुबा जाहीर केला. त्यांचे आजोबा, दिवंगत नेते बाळासाहेब विखे यांनी पूर्वी काँग्रेस सोडताना हा प्रयोग राबवला होता आणि जिल्ह्यात आपल्या गटाचे अस्तित्व कायम ठेवले होते. खासदार विखे त्याच प्रयत्नात दिसतात. वडील राधाकृष्ण यांना मंत्रीपद मिळाल्यावर त्यांचा आघाडीचा हा प्रयोग पुढे रेटला जाणार का, याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

सन १९९५ पासून राधाकृष्ण विखे विधानसभेत सातत्याने प्रतिनिधित्व करत आहेत. शिक्षण, कृषी, परिवहन अशा विविध विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी सांभाळली आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील ते सर्वात ज्येष्ठ मंत्री ठरतात. संपूर्ण जिल्ह्यात विखे, शिंदे, मोनिका राजळे आणि बबनराव पाचपुते असे भाजपचे एकूण चार आमदार आहेत.

हेही वाचा- सुरेश खाडे : सांगलीत कमळ पुरवणारा भाजपचा चेहरा 

विखे यांचे चिरंजीव खासदार सुजय विखे यांची व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची नगर शहरातील राजकीय मैत्री सध्या मोठ्या चर्चेचा विषय झाली आहे.  सत्ता परिवर्तनावेळी विधिमंडळातील मतदानप्रसंगी राष्ट्रवादीचे दोन आमदार जगताप आणि निलेश लंके यांच्या अनुपस्थितीकडे संशयाने पाहिले जात होते. त्यातूनच खासदार विखे- आमदार जगताप यांची मैत्री आगामी काळात कोणता राजकीय चमत्कार घडवणार आणि त्यातून भाजपला जिल्ह्यात नेमका कोणता फायदा होणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संजय राठोड : मतदारांसाठी धडपडणारा पण वादग्रस्त चेहरा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी