scorecardresearch

भांडी, कुंडी, साडीच्या माध्यमातून महिला मतांची पेरणी

ज्या प्रमाणे शेतीमध्ये पेरणीचा हंगाम सुरू होण्यापुर्वी उन्हाळी मशागतीच्या कामासाठी शेतकर्‍याची धांदल सुरू असते, त्याच पध्दतीने विद्यमान नगरसेवकापासून भावी नगरसेवकापर्यंत ही धांदल सुरू आहे.

Sangli district, clothes, saree, groceries, municipal corporation, election
भांडी, कुंडी, साडीच्या माध्यमातून महिला मतांची पेरणी ( Image – लोकसत्ता टीम )

दिगंबर शिंदे

सांगली : महापालिका निवडणुका सहा महिन्यावर आल्यामुळे संक्राती व रथसप्तमीचे औचित्य साधून महिलासांठी हळदी कुंकूच्या निमित्ताने राजकीय कार्यकर्त्यांची मतपेरणीची धांदल सुरू झाली आहे. यासाठी रूपेरी पडद्यावरील एखाद्या अभिनेत्याला, तर कधी होम मिनीस्टरच्या रूपाने महिला मतदार संघटित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या निमित्ताने महिलांना भांडी, साडी, गूळाची लहान ढेप देउन आपलेसे करण्याचा प्रयत्न घरच्या महिलांना पुढे करून केले जात आहेत.

निवडणुका जवळ आल्या की, राजकीय कार्यकर्त्यांना सार्वजनिक कार्यक्रमाचे वेध लागतात. आता महापालिका निवडणुका सहा महिन्यावर येउन ठेपल्या असल्याने राजकीय कार्यकर्त्यांची मतपेरणीसाठी धांदल सुरू आहे. ज्या प्रमाणे शेतीमध्ये पेरणीचा हंगाम सुरू होण्यापुर्वी उन्हाळी मशागतीच्या कामासाठी शेतकर्‍याची धांदल सुरू असते, त्याच पध्दतीने विद्यमान नगरसेवकापासून भावी नगरसेवकापर्यंत ही धांदल सुरू आहे. यामध्ये भाजपचे जसे कार्यकर्ते पुढे आहेत, तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही कार्यकर्ते पुढे आले आहेत.

हेही वाचा… ना आढावा ना चर्चा, मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा केवळ सत्संगासाठी?

मकर संक्रांतीच्या निमित्ताने वाण वाटप करण्यात आले. आता पुन्हा रथसप्तमीचे औचित्य साधून हळदीकुंकू समारंभाचे कार्यक्रम सायंकाळी पाच ते नउ या वेळेत सुरू झाले आहेत. यावेळी महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजनही करण्यात येत असून हळदीकुंकूचा विधी पार पाडत असताना कधी एखादी कापडी पिशवीपासून, एखादे स्टीलचे भांडे, गूळाची लहान ढेप, तर कधी कधी साडीही भेटीच्या स्वरूपात दिली जात आहे.

हेही वाचा… ठाकरेंना ‘हिरे’ गवसल्याने शिंदे गटात अस्वस्थता

एकूण मतदारामध्ये पन्नास टक्के महिला असल्याने या महिला मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. महिलांच्या कार्यक्रमाचे आयोजन राजकीय पुरूष कार्यकर्त्यांकडून प्रामुख्याने होत असले तरी मुख्य आयोजक घरातीलच प्रमुख म्हणून पत्नी, आई यांना पुढे केले जात आहे. यासाठी महापालिकेत कार्यरत असलेल्या महिला पदाधिकार्‍यांनाही विशेष आमंत्रित करून त्यांच्याकरवी प्रभागात केेलेल्या कामाचा पाढा वाचून यापुढे असलेल्या समस्या, अडचणींचा उहापोह केला जात आहे. प्रभागाचे हे प्रश्‍न सोडविण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे महिलांच्या तोंडातूनच वदवून घेउन मतांचा गठ्ठा तयार करण्याचे काम या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जात आहे.

हेही वाचा… मुंबईत भाजपची मदार मोदींवरच

महिलांना आकर्षित करण्यासाठी दूरचित्रवाणीवरील मालिकामधून घरा-घरामध्ये पोहचेलला एखादा अभिनेता याला पाचारण केले जाते. त्याच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष खेळाचेही आयोजन केले जात आहे. काही प्रभागात होम मिनीस्टर, वन मिनिट शो, खेळ पैठणीचा यासारखे स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यासाठी व्यावसायिकांची मदत घेतली जात आहे.संगीत खुर्ची, प्रश्‍नोत्तरे यामाध्यमातून महिलासाठी स्पर्धात्मकतेला आव्हान देत राजकीय अजेंडा राबविण्याचा प्रयोग महापालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:25 IST