सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार पुढील रणनीती ; कायदेशीर अडथळे नसले तरी मंत्रिमंडळ विस्तार ११ जुलैनंतर ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेले असले तरी त्याची घाई न करता सर्वोच्च न्यायालयाच्या ११ जुलैच्या सुनावणीनंतर तो करावा, असा विचार मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप करीत आहे.

CM eknath shinde
( प्रतिनिधिक छायाचित्र )

उमाकांत देशपांडे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेले असले तरी त्याची घाई न करता सर्वोच्च न्यायालयाच्या ११ जुलैच्या सुनावणीनंतर तो करावा, असा विचार मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप करीत आहे. शिवसेनेचा गटनेता कोण आणि मूळ शिवसेना कोणाची, या मुद्दयावर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिंदे गटाचे भवितव्य अवलंबून आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कायदेशीर अडथळे नसले तरी न्यायालयातील सुनावणीनंतर आणि राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निवळल्यावर विस्तार होईल, अशी शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत सिध्द केल्यावर मंत्रिमंडळ विस्तार कधी याची चर्चा सुरु झाली. शिवसेनेने बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका सादर केल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदी नियुक्तीस आणि भरत गोगावले यांच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्तीस मान्यता दिली आहे. या निर्णयास शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर शिंदे गटाने मूळ शिवसेनेतील आमदारांनी पक्षादेश किंवा व्हीपचे पालन न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यासाठी अध्यक्षांकडे याचिका सादर केल्या असून त्याविरुध्द शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. या विविध मुद्द्यांवरील याचिका ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असली तरी मंत्रिमंडळ विस्तारात कोणताही कायदेशीर अडथळा किंवा प्रतिबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून तातडीने अंतरिम आदेश दिला जाणार का, हा मुद्दा शिंदे गट व शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्याने आमदार अपात्रतेविषयीच्या याचिकांवर त्यांच्याकडे सुनावणी व्हावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालय देऊ शकते. मूळ शिवसेना कोणाची किंवा गटनेता कोण, हा मुद्दा अंतिम सुनावणी नंतरच निकाली काढला जाईल. मात्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लक्षात घेता गटनेता कोण आणि व्हीप कोण जारी करु शकेल, या मुद्द्यावर शिवसेना किंवा शिंदे गटाने आग्रह धरल्यास न्यायालयाकडून अंतरिम आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने कायदेशीर लढाईत त्यांचे पारडे वरचढ असले तरी दहाव्या परिशिष्टानुसार दोन तृतीयांशहून अधिक गटाने फुटल्यावर दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन तृतीयांशहून अधिक आमदारांचा गट फुटला तरी मूळ पक्ष एक तृतीयांश गटाचा राहू शकतो. शिंदे गटात दोन तृतीयांशहून अधिक आमदार असले तरी तो गट म्हणजे मूळ पक्ष की उध्दव ठाकरे यांचा एक तृतीयांश आमदारांचा गट हा मूळ पक्ष या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून दिशादर्शक व महत्वपूर्ण निकाल दिला जाईल.

हे मुद्दे अंतिम सुनावणीत निकाली निघण्याची शक्यता अधिक असल्याने त्यास किती कालावधी लागेल, यावर शिंदे गटाचे भवितव्य अवलंबून आहे. अंतरिम आदेश शिंदे गटाच्या विरोधात न गेल्यास आणि न्यायालयीन लढाईस पुढील दोन वर्षे-अडीच वर्षे लागल्यास ते शिंदे गटाच्या व भाजपच्या पथ्थ्यावर पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदे गटाविरोधात अंतरिम आदेश जारी केला जाण्याची शक्यता कमी असली तरी सावधगिरी म्हणून ११ जुलैच्या सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्तार करावा, असा विचार मुख्यमंत्री शिंदे व भाजप नेत्यांकडून होत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार असून या भेटीत विस्ताराबाबत चर्चा होईल. सध्या राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती असून पुढील चार-पाच दिवसांमध्ये विस्तार करणे योग्य होणार नाही. त्यामुळे ही परिस्थिती निवळल्यावर आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cabinet expansion is depend on supreme court result expansions will take place only after 11 july print politics news amy 95

Next Story
विधान परिषदेनंतर आता राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना खासदारांची मते फुटण्याचा धोका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी