जून २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. त्यावेळी भाजपाने धक्कातंत्राचा वापर करीत जुन्या नेत्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदावर संधी दिली. यादरम्यान मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला जवळपास दोन वर्ष पूर्ण होत असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पडद्याआड गुप्त बैठका आणि राजकीय हालचाली सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने त्या संदर्भातील वृत्त दिले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी गुरुवारी पंजाब, हरियाणा आणि त्रिपुरामध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली. तसेच राजधानी दिल्लीतही भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणारे नितीन नबीन हे लवकरच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मोठे फेरबदल करणार असल्याचे संकेत मिळत आहे. या कार्यकारणीत पक्षातील अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलांमुळे भाजपाच्या संसदीय मंडळाची पुनर्रचना, तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातही काही महत्वाचे बदल होऊ शकतात, असे भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ खासदार व केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्ली भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने ७६ वर्षीय खासदार केवल सिंग ढिल्लो यांच्याकडे राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहे. हरियाणात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाच्या प्रदेशाध्यपदाची धुरा ५८ वर्षीय अर्चना गुप्ता यांच्याकडे सोपवली आहे, तर त्रिपुरात ४४ वर्षीय अभिषेक देबरॉय यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाच्या नियमांनुसार, नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी किमान ५० टक्के राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंतर्गत निवडणुका होणे आवश्यक असते, तर उर्वरित राज्यांमध्ये नवीन अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच निवडणुका घेतल्या जातात. नितीन नबीन यांनी संघटनात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच पक्षात आवश्यक ते बदल पाहायला मिळतील.
४६ वर्षीय नितीन नवीन यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर भाजपाशासित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या घोषणेवरून मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलात अनुभवी आणि तरुण अशा दोन्ही नेत्यांचा ताळमेळ असणाचे संकेत मिळत आहे. भाजपामधील एका अंतर्गत सूत्राने सांगितले की, या नियुक्त्यांमध्ये मल्होत्रा आणि गुप्ता यांची संघटनात्मक आणि वैचारिक पार्श्वभूमी अत्यंत मजबूत आहे. मल्होत्रा हे शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जातात; तर गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले असल्याने त्यांची पार्श्वभूमी खूपच मजबूत आहे.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने तिथे भाजपाने केवल सिंग ढिल्लो यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या राज्यात भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. या पराभवाचा बदला आगामी निवडणुकीत घेण्यासाठी पक्षाने आतापासूनच जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनुसार, या नियुक्त्यांवरून आगामी काळात केद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, जागतिक पातळीवरील अनपेक्षित परिस्थिती आणि आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. अशा वेळी सत्ताविरोधी लाट रोखण्यासाठी आणि पक्षातील काहींचा असंतोष दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची दाट शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक मास संपल्यानंतर म्हणजेच १५ जूननंतर भाजपामध्ये आणखी काही बदल आणि नियुक्त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. हिंदू परंपरेनुसार अधिक मासात सरकार किंवा प्रशासनाशी संबंधित मोठे निर्णय आणि नियुक्त्या टाळल्या जातात, त्यामुळे हा महिना संपल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील. भाजपाच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, पुढील महिन्याच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीत भाजपाशासित राज्यांतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सोहळ्याचे आयोजनही केले जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमानंतरच केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलांबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जून आणि नोव्हेंबरमध्ये राज्यसभेतील ३४ सदस्यांचा कार्यकाळ संपणार असल्याने या रिक्त होणाऱ्या जागांसाठी भाजपा कोणाला संधी देते, याचाही संबंध संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाशी जोडला जात आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सध्या महिलांचे राजकीय प्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे राज्यसभेच्या बहुतांश जागांवर महिलांनाच संधी मिळू शकते. तसेच, मंत्रिमंडळातून बाहेर पडणाऱ्या भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करून त्यांचे पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या संभाव्य फेरबदलाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
