सोलापूर : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने फारुख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागेल. दुसरीकडे महायुतीत भाजप हा मतदारसंघ शिंदे गटाकडून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्हे आहेत.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात ३५ टक्के मुस्लीम मतदार आहेत. त्या पाठोपाठ तेलुगु भाषक पद्मशाली विणकर समाजही मोठा आहे. या समाजावर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव दिसून येतो. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्याच हक्काच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातून जेमतेम ७९६ मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी एमआयएम तटस्थ होता.
हेही वाचा – कारण राजकारण : मुलीच्या बंडामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर दुहेरी आव्हान !
यापूर्वी २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना एमआयएमने तगडे आव्हान दिले होते. प्रणिती शिंदे खासदार झाल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या विधानसभेच्या जागेवर स्थानिक मुस्लीम नेत्यांनी दावा केला आहे. तर माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाविकास आघाडीत शहर मध्यची ही जागा मिळेल, हे गृहीत धरून प्रचारही सुरू केला आहे.
हेही वाचा – धनगर समाजाला आरक्षण अशक्य?
या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाने फारूख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपचे आव्हान परतावून लावण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्याचे बोलले जाते. यात खासदार प्रणिती शिंदे यांची कसोटी पणाला लागणार आहे. दुसरीकडे, महायुतीअंतर्गत सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा कायम राहण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत हे सक्रिय झाले आहेत. हा दावा सोडण्यासाठी शिवसेना शिंदे गटावर भाजपकडून दबाव येऊ शकतो, असे म्हटले जाते.
© The Indian Express (P) Ltd