Bihar Vidhan Sabha Election Results 2025 बिहार विधानसभा निवडणुकीची आज सकाळपासून मतमोजणी पार पडली. यामध्ये संयुक्त जनता दलाचे मोकामा विधानसभा मतदार संघातील उमेदवार अनंत सिंह हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांनी ९१४१६ मतांसह तब्बल २८२०६ मतांनी विजय मिळवला. अनंत सिंह सध्या एका हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून बिहार विधानसभा लढवलेल्या अनंत सिंह यांना जनसुराज पक्षाचे समर्थक दुलार चंद यादव यांच्या हत्येप्रकरणी २ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, आता तुरुंगातून निवडून आलेल्या उमेदवारालान आमदारकी मिळणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याविषयी नियम काय सांगतो? कोण आहेत अनंत सिंह? त्यांच्यावर कोणकोणते आरोप? जाणून घेऊयात…
मोकामाचे ‘बाहुबली’
‘छोटे सरकार’ या नावाने प्रसिद्ध असलेले अनंत सिंग हे बिहारमधील सर्वात कुख्यात पण लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाला त्यांच्या प्रदीर्घ गुन्हेगारी इतिहासापासून वेगळे करता येत नाही. १९७९ पासून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जमीन बळकावणे आणि शस्त्र कायद्याच्या उल्लंघनाचे ५० हून अधिक खटले दाखल आहेत. इतके गुन्हे दाखल असूनही, सिंह यांना मोकामामध्ये जोरदार पाठिंबा आहे. या क्षेत्रात अनेक लोक त्यांना त्यांच्या जात आणि समुदायाचे संरक्षक मानतात.
सिंह यांना राष्ट्रीय स्तरावर पहिली कुप्रसिद्धी २००७ मध्ये मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या सरकारी बंगल्यावर कथितरित्या पत्रकारांना ओलीस ठेवण्यात आले होते. रेष्मा खातून हिच्या कथित खून आणि हल्ल्याप्रकरणी त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ते पत्रकार त्यांच्या बंगल्यावर गेले होते. रेष्मा खातूनचा मृतदेह पोत्यात भरलेला आढळला होता.
एके-४७ प्रकरण
२०१९ मधील प्रकरणाचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. पोलिसांनी अनंत सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावर छापा टाकला आणि एक एके-४७ रायफल, दारुगोळा आणि मॅगझीन जप्त केली. याप्रकरणी त्यांना २०२२ मध्ये दोषी ठरवण्यात आले आणि शस्त्र कायदा (Arms Act) तसेच युएपीए (UAPA) अंतर्गत १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर, पटना उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याचे वृत्त आहे. त्यात पुरावे आणि या प्रकरणाभोवतीच्या राजकीय हेतूंसंदर्भात प्रश्न उपस्थित केले गेले होते.
जमीन बळकावल्याचे आरोप
अनंत सिंह यांच्यावर वारंवार जमीन बळकावल्याचा आरोप झाला आहे. त्यांच्यावर त्यांच्या आलिशान हॉटेल ‘बुद्धा हेरिटेज’जवळ असलेल्या पाटलीपुत्र कॉलनीमधील १०,००० चौरस फुटांपेक्षा जास्त जागेवरून अनेक आरोप झाले आहेत. लोकांचा दबाव आणि एका राज्यमंत्र्याच्या हस्तक्षेपानंतर, सिंह यांनी अखेरीस ती जागा रिकामी केली.
दुलारचंद यादव खून प्रकरण
मतदानाच्या काही दिवस आधी म्हणजेच ३० ऑक्टोबर २०२५ रोजी, मोकामामध्ये एका राजकीय संघर्षादरम्यान जन सुराज पक्षाचे कार्यकर्ते दुलारचंद यादव यांचा रहस्यमयी परिस्थितीत मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात असे उघड झाले की, हृदय आणि फुफ्फुसांना एका बोथट वस्तूने झालेल्या आघातामुळे कार्डिओरेस्पिरेटरी फेल्युअर (हृदय आणि श्वसनसंस्थेचे कार्य थांबणे) मुळे त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी आणि प्राथमिक तपासणीच्या आधारे अनंत सिंह यांना २ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. आपण घटनास्थळापासून खूप दूर होतो, असे त्यांनी स्पष्ट केले आणि याला राजकीय कटकारस्थान म्हटले. या प्रकरणाने जातीय तणाव वाढवला. सिंह हे भूमीहार आहेत, तर यादव हे ओबीसी यादव समुदायाचे होते. या प्रकरणात ते अजूनही तुरुंगात आहेत.
४ तरुणांचे अपहरण आणि खून
एका साथीदाराशी संबंधित मुलीला त्रास दिल्याचा आरोप असलेल्या चार तरुणांचे अपहरण केल्याचा आरोप सिंह यांच्यावर होता. त्यापैकी पुट्टूस यादव नावाच्या तरुणाचा कथितरित्या खून करण्यात आला होता. या प्रकरणी अनंत सिंह यांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी पटना सिटी एसपी चंदन कुशवाहा यांच्याशी त्यांची झटापट झाली होती.
अनंत सिंह तुरुंगात असताना आमदार होऊ शकतात का?
अनंत सिंह कायदेशीररित्या तुरुंगात असतानाही आमदार होऊ शकतात. भारतीय कायद्यानुसार, ज्यांना दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यांनाच निवडणूक लढवण्यास प्रतिबंध आहे. अनंत सिंह हे सध्या न्यायलयीन कोठडीत (Judicial custody) आहेत म्हणजेच अंडरट्रायल आहेत, दोषी नाहीत.
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार अंडरट्रायल लोकांना निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याची परवानगी आहे आणि न्यायालयाच्या परवानगीने ते आमदार म्हणून शपथही घेऊ शकतात. सिंह विजयी झाले असल्यामुळे त्यांना शपथविधी समारंभासाठी पॅरोल किंवा अंतरिम दिलासा दिला जाऊ शकतो. जोपर्यंत त्यांना दोषी ठरवले जात नाहीत आणि त्यांना दोन वर्षे किंवा त्याहून अधिकची शिक्षा होत नाही, तोपर्यंत ते आमदार म्हणून काम करण्यास पूर्णपणे पात्र राहतील.
